Friday, May 20, 2022
No menu items!
Homeशेतीनवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चौदा शेतकर्‍यांची आत्महत्या

नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चौदा शेतकर्‍यांची आत्महत्या

मराठवाड्यात ५७ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले
बीड (रिपोर्टर):- शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना दरवर्षी बीड जिल्ह्यामध्ये २०० पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात. दिल्लीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची केंद्र सरकारने अद्यापही दखल घेतलेली नाही. आंदोलनकर्त्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने देशभरातील शेतकर्‍यात केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे कर्जबाजारी, नापिकी आणि शेती मालाला नसलेल्या हमी भावामुळे शेतकरी मरणाला जवळ करत आहेत. बीड जिल्ह्यात जानेवारी महिन्यात चौदा शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकार दप्तरी करण्यात आली. मराठवाड्यात ५७ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले आहे.

कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्या थांबेल असा पोकळ दावा राज्यकर्ते करत आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र यातून शेतकर्‍यांच्या आत्महत्येमध्ये कसल्याही प्रकारची घट झाली नाही. उलट आत्महत्या होतच राहिल्या. २०१९ साली राज्यात सत्तांतर झालं. सत्तेत महाआघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दोन लाखापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला. मात्र ही कर्जमाफी फक्त पीक कर्जा पुरती मर्यादीत होती. इतर शेतीवरचा बोजा उतरण्यात आला नसल्याने शेतकरी संकटातच आहेत. शेतकर्‍यांचा आर्थिक भास कमी झालेला नाही. शेतकरी कर्जबाजारी, नापिकी, सावकाराचा छळ आणि मालाला नसलेला हमीभाव यामुळे त्रस्त होवून शेवटी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. महाराष्ट्रात मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यात जिल्ह्यातल्या १४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. एकीकडे केंद्र सरकारने आणलेले काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. शेतकरी आंदोलनकर्त्याची दखल केंद्र सरकारने अद्यापही घेतली नसल्याने देशभरातील शेतकर्‍यात केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. यावर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सर्वात जास्त आत्महत्या या बीड जिल्ह्यात झाल्या. मराठवाड्यात एकूण ५७ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!