१५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान सरपंचांच्या निवडीसाठी विशेष सभा
बीड (रिपोर्टर)- अखेर जिल्हा प्रशासनाला मुहूर्त सापडला असून येत्या १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील १२९ सरपंच निवडीसाठी तहसीलदारांनी विशेष सभा लावून ही प्रक्रिया पार पाडावी, असे आदेश रात्री उशिरा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सहा महिने प्रशासक होते. अखेर ग्रामविकास विभागाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेतल्या. मात्र निवडणूक प्रक्रिया पार पडून महिनाभराचा कालावधी लोटला तरी सरपंचाच्या निवडी होत नव्हत्या. गेल्या सरकारचा निर्णय बदलून ग्रामपंचायत सदस्यातून सरपंच निवडी करायच्या असल्यामुळे ज्या ठिकाणी काटावर बहुमत मिळालेल्या ग्रामपंचायती आहेत अशा गटांनी किंवा पक्षांनी गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत सदस्य सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकीनऊ आले होते. त्यामुळे सरपंच निवडीच्या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील राजकीय पुढार्यांचे लक्ष लागले होते. प्रशासनावरही सरपंचाच्या निवडी लवकर कराव्यात, असा दबाव विविध राजकीय पक्षांकडून होता. काल अखेर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी १२९ निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीसाठी विशेष सभा आखाव्यात आणि या सभेमध्ये सरपंचाची निवड करावी, असे आदेश संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. ग्रामपंचायतींमध्ये गेवराई २२, माजलगाव ५, वडवणी २, धारूर ५, केज २३, अंबाजोगाई ७, परळी ७, बीड २९, आष्टी १२ आणि शिरूर ८ अशी सदस्य संख्या आहे.