बीडमध्ये जल्लोषात स्वागत, सरकारविरोधात घोषणाबाजी
बीड (रिपोर्टर):- मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर संपवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी जालना जिल्ह्यातील साष्टापिंपळगावात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आष्टी, पाटोदा येथून तब्बल २०० गाड्यांचा ताफा आज साष्टापिंपळगाव येथे रवाना झाल्या आहेत. जाताना ते वाटेत गेवराई तालुक्यातील मालेगाव येथील आंदोलनस्थळीही भेट देणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले मात्र ते आरक्षण कोर्टात अडकले. सध्या आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील साष्टापिंळगाव या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. त्याचे लोण बीड जिल्ह्यात येऊन पोहचले आणि मालेगाव येथे आंदोलन सुरू झाले. आज आष्टी तालुक्यातून २०० पेक्षा जास्त वाहनांमधून शेकडो मराठा क्रांतीचे कार्यकर्ते आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी साष्टा पिंपळगावकडे रवाना झाले. आज हे कार्यकर्ते बीडमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचे बीड क्रांती मोर्चाच्या वतीने मोठे स्वागत करण्यात आले. या वेळी या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शासन प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली.