३२ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
बीड / गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळुचे एकही टेंडर नसताना स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे वाळुचा उपसा होत आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून वाळू माफियांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असून आज सकाळी गोदावरी नदी पात्रातून वाळू भरत असताना चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले. तर चार चालक व त्यांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संगम जळगाव येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सकाळी साडेआठ वाजता धाड टाकली. या वेळी मजुरांच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरताना चार ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त करून गेवराई पोलिस ठाण्यात कारवाईसाठी आणले. चार ट्रॅक्टर व वाळू असा एकूण ३२ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. गेवराई पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात कलम ३७९, १०९, ५११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये सुनिल गिरीजा मगरे, बाबासाहेब नारायण शिंदे, श्याम भानुदास देवकते, नारायण अशोक पारेकर (सर्व रा. रेवकी-देवकी ता. गेवराई) असे आहेत. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे.