मुंबई (रिपोर्टर):-कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन गृह विभागाने नियमावली तयार केली
राज्य सरकारने माघी गणेशोत्सवाच्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन यंदा शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तारखेनुसार १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होणार आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजून ओसरलेला नाही. कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेऊन गृह विभागाने नियमावली तयार केली आहे.
नव्या नियमावलीत म्हटले आहे की, शिवजयंती गड-किल्ल्यावर साजरी न करता ती घरातच साधेपणाने साजरी करावी. जयंती उत्सवावेळी १०० पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित राहू नये. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. सदर कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करावी, असे गृह विभागाने म्हटले आहे.याशिवाय प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढू नयेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना नियमांचे पालन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसे आवाहन करावे, असे गृह विभागाने नमूद केले आहे.