कृषी कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, बी.टी. कापसाचे बोगस बियाणे देणार्या कंपनीविरोधात कारवाई करा
बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नसून केंद्र सरकारच्या निषेधार्थ व दिल्लीच्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केल्याने नगर रोड परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.

केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करण्यापेक्षा शेतकर्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे आणले. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सदरील कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांची केंद्र सरकारने अद्यापही दखल घेतली नसल्याने देशभरातील शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीच्या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. सदरील मोर्चा भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या वेळी भाई गोले, भीमराव कुटे, मोहन जाधव, संगमेश्वर आंधळकर, भाई दत्त प्रभाळे, ऍड. तुपे यांच्यासह अन्य कायर्कर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान कृषी कायदे रद्द करून स्वामीनाथन आयोग लागू करावा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, बीटी कापसाचे बोगस बियाणे देणार्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला सरसकट ३ हजार रुपये भाव द्यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.