बीड | रिपोर्टर
गेल्या दोन दिवसापूर्वी बीड शहरातील दोघांचा जालना-चिखली रोडवर विहिरीत कार पडून अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघा तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा त्याच विहिरीत कार पडून अपघात झाल्याची घटना रविवारी सकाळी जालना-चिखली रोडवर घडली असून त्या विहिरी संदर्भात तर्क वितर्क लावून चर्चा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे त्या विहिरीला कठडे असतांनाही एवढे भयंकर दोन अपघात कसे झाले? यासाठी रस्ता प्रशासनाने लक्ष देवून जर त्या विहिरी शेजारी टर्निंग पॉईंट असेल तर तात्काळ सरळ करून घेण्याची मागणी लोकातून होत आहे.
शुक्रवारी बीड शहरातील शेख मन्नान व अझहर कुरेशी हे दोघे तरूण जालना-चिखली रोडवरून स्वत:च्या कारने जात असतांना जालना चिखली रोडवरील विहिरीत कार पडल्याने अपघात झाला. या अपघातात वरील दोघा तरूणांचा दुर्दैवी अंत झाला. हे दोघे तरूण बीड शहरातील शाहुनगर भागात राहत असून त्यांच्या या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना ताजी असतांनाच पुन्हा त्याच घटनास्थळी रविवारी सकाळी एक कार विहिरीत पडल्याने अपघात झाला. या अपघातात मयत झालेल्यांची नावे अद्याप समजली नसून मृतामध्ये आई आणि छोट्या मुलीचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या ४८ तासात त्या ठिकाणी पाठोपाठ २ अपघात झाल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला. नेमके त्याच विहिरीत कार पडून अपघात झाल्याने लोकांमध्ये तर्कवितर्क सुरू असून अंधश्रद्धेसारख्या गोष्टीची ही चर्चा सुरू आहे.