पुणे (रिपोर्टर):- देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही, या माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगई यांच्या विधानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना काळजी व्यक्त केली. ’गोगई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे,’ अशी टिप्पणी पवार यांनी केली.
पवार म्हणाले, ’गेल्या आठवड्यात माझ्या वाचनात आले होते की देशातील न्यायव्यवस्था उच्च आहे. न्यायाधीश यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी हा उल्लेख केला होता. त्याबाबत आनंद झाला; पण गोगई यांचे विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला का हे मला ठावूक नाही. त्यांचे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणार आहे.’