Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर- नुसतीच फेकाफेकी!!! दरवाढ मानगुटीवर

प्रखर- नुसतीच फेकाफेकी!!! दरवाढ मानगुटीवर


रोज भाव निघावेत त्या प्रमाणे इंधनाचे दर वाढू लागले. आज कितीने पेट्रोल,डिझेल वाढलं हे वाहनधारक रोज पाहतात, रोज वाढत असणारी इंधनाची दरवाढ ही वाहनधारकांच्या र्‍हदयाचे ठोके वाढवणारी आहे. सत्तेत आल्यांनतर हे करु, ते करु,अशी ढीगभर अश्‍वासने पंतप्रधान मोदी यांनी २०१३ साली दिली होती. कॉंग्रेस किती भ्रष्ट आणि महागाई वाढण्यास कॉंग्रेसवाले किती कारणीभूत आहे, हे सांगण्याचं काम भाजपावाले विरोधात असतांना करत होते. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत महागाईच्या नावाने शिमगा केला जात होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपावाल्यांनी महागाईच्या नावाने आणि इंधनाचे दर कमी करण्याचे आश्‍वासन देवून मते पदरात पाडून घेतले. सत्ता आल्यानंतर काय झालं? महागाई कुठं कमी झाली? उलट तिचा आलेख वाढत गेला. विरोधात असतांना काहीही बोलता येतं आणि एकदा सत्तेत बसल्यावर आपण जे काही बोलत होतो त्याचा विसर का पडावा? आज भाजपावाल्यांना महागाई बाबत जे कोणी प्रश्‍न विचारतात, त्यांना ते आपले विरोधक मानतात. कुणी प्रश्‍न विचारु नये असं भाजपावाल्यांना वाटत. आंदोलनाच्या बाबतीतही भाजपावाले तीच भुमिका घेवून आहेत. आंदोलनकर्त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. इतकी राजकारणाची पातळी घसरली आहे. भाजपा जेव्हा विरोधात होता, तेव्हा भाजपावाले आंदोलन करत होते. तेव्हा भाजपावाल्यांना कुणी देशद्रोही म्हटलं नाही किंवा अन्य काही म्हणुन त्यांची अवहेलना केली नाही. आंदोलन करणं हा सगळ्यांचा हक्क आहे. आज तोच हक्क हिकवण्याचा प्रयत्न होवू लागला.


आता समर्थन!

दहा वर्ष मनमोहनसिंग पंतप्रधान होते. सिंग हे अर्थतज्ञ होते. जेव्हा जगात मंदी होती, तेव्हा आपल्याकडे मंदीची झळ पोहचली नाही. त्याचे कारण म्हणजे मनमोहनसिंग यांची हुशारी कामी आली होती, एवढचं की, ते बोलत कमी होते, मात्र काम जास्त करत होते. कमी बोलणारे माणसं जास्त काम करत असले तरी त्यांचं काम दिसत नसतं. मात्र आज जास्त बोलणारे आणि कमी काम करणारे लोक सत्तेवर बसले पण त्यांच्या जास्त बोलण्यातून देशाला किती फायदा झाला याचा विचार केला पाहिजे. फक्त बोलून लोकांची किती दिवस दिशाभूल केली जाणार? बोलण्याने विकास होत नसतो. त्याला प्रत्यक्षात काम करावे लागते. जात,पात,धर्मंाच्या नावाने किती दिवस लोकांची बनवा-बनवी करणार? आज लोकांना काम हवं आहे, विकास हवा आहे, पोटाला भाकर हवी आहे. या सर्व मुद्यांना बाजुला सारुन राजकारण केलं जात आहे. महत्वाच्या मुद्यापासून सध्याचं सरकार पळ काढत आहे. ज्या वेळी इंधनाचे दर वाढत होते. त्यावेळी भाजपाचे लोक गाड्या हातात घेवून रस्त्यावर उतरत होते. आज तेच भाजपाचे लोक पेट्रोल डिझेलच्या महागाई बाबत काही न बोलता निमुटपणे चढ्या भावाने इंधन भरत आहेत. पुर्वी महागाईचा विरोध करणारे भाजपाचे नेते इंधनाच्या दरवाढीचं समर्थन करत आहेत. राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंधन दरवाढ गरजेची आहे असं म्हटलेलं आहे, मग आज इंधन दर वाढ गरजेची होती तर काल जे भाजपावाले आंदोलन करत होते ते काय होतं? त्यावेळी दरवाढ गरजेची नव्हती का?


अण्णा,रामदेव बाबा कुठे गेले?
२०१२ साली दिल्लीत आंदोलन झालं होतं. या आंदोलनाची चर्चा देशात झाली होती. कॉंग्रेस सरकार किती नालायक आहे. याचे रोजच पाढे वाचले जात होते. बाबा रामदेव हे ही आंदोलनात उतरले होते, ते त्यावेळच्या सरकारवर प्रचंड टिका करत होते. आपल्या देशातील काही बड्या लोकांनी बाहेरील देशात मोठ्या प्रमाणात पैसे नेवून ठेवले आहेत, तो पैसा आपण आणला तर देशाचा मोठा फायदा होईल. आपल्याला इंधन फक्त ४० ते ५० रुपयातच मिळेल, असा दावा बाबा रामेदव करत होते. इंधनाच्या दरवाढीबाबत ते ज्या ठिकाणी जात होते तेेथे भाषण ठोकत होते. जसंच भाजपाचं सरकार आलं तसं देशात अनेक घटना,घडामोडी घडल्या. याबाबत साधं ‘ब्र‘ शब्द आता पर्यंत बाबा रामदेव बोलले नाहीत. आता ते का बोलत नाही हे त्यांनाच माहित? ते जर आज भाजपाच्या विरोधात बोलले तर त्यांना ही देशद्रोही ठरवले जाईल याची भीती रामदेव बाबा यांना नाही ना? बाबा रामेदव यांनी सध्याच्या परस्थितीवर बोललं पाहिजे, पण ते पुर्णंता मुग गिळून गप्प बसलेले आहेत. त्यांची गाडी पेट्रोल,डिझेलवर चालत नसेल म्हणुन त्यांना इंधनाच्या दरवाढीचं देणं घेणं नाही की काय? दुसरे म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, त्यांनी ही २०१२ साली देशात मोठं आंदोलन केलं होतं. त्यांचीही भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी लढाई होती. अण्णा नही आंधी है! देश के दुसरे गांधी है! अशा गगनभेदी घोषणा त्यावेळी दिल्या जात होत्या. हजारे यांच्या आंदोलनामुळे मोठा बदल झाला होता. २०१४ च्या निवडणुकीत देशात राजकारणात बदल झाला आणि मोठं परिवर्तन झालं. सत्ता आल्यानंतर भाजपावाल्यांनी नंतर हजारे यांना काही पुर्वीसारखा प्रतिसाद दिला नाही. आज देशाचं वातावरण कसं आहे याचा अंदाज अण्णा यांना येत नाही असं थोडचं आहे? मध्यंतरी त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. भाजपाच्या नेत्यांनी राळेगणसिध्दीला जावून त्यांच्याशी चर्चा केली व अण्णा यांनी आंदोलन मागे घेतले. भाजपाने चर्चा करताच अण्णा कसे काय आंदोलन मागे घेतात? अण्णा यांनी आंदोलन न करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा जो काही संदेश जायचा होता तो गेला?


सबसिडी बंद झाली
चुला जलाने से महिलाओ की, ऑखे खराब होती है, प्रदुषण होता है! मोदी सरकार सबको मोफत मे गॅस दे रही है! अशी घोषणा आपले पंतप्रधान करत होते, गॅस मोफत दिला खरा, पण गॅसचे पुढचे संकट काय आहेत हे कुणाला माहिती? गॅसची सबसिडी खात्यावर जमा होणार असे घोषीत केले होते, काही महिने सबसिडी खात्यावर जमा झाली, मात्र गेल्या सहा महिन्यापासून लोकांची सबसिडी खात्यावर जमा होत नाही. सबसिडी सरकार खावून टाकू लागलं? काहींची दहा रुपये तर काहींची आठ रुपये अशी सबसिडी जमा होवू लागल्याने आश्यर्च व्यक्त केले जावू लागले. ज्या प्रमाणे इंधनाचे दर वाढू लागले, त्या प्रमाणे गॅसचे दर वाढत आहे. वाढते गॅसचे दर गोर-गरीबांना परवडणारे नाही. वाढत्या गॅस दरवाढीमुळे गरीबांचे जगणे मुश्किल झाले, आधीच महागाईचा आगडोंब असतांना गॅसवाढीचा जबरदस्त फटका बसू लागला. लॉकडाऊनमुळे हजारो कामगारांच्या नौकर्‍यावर नांगर फिरला. अर्थव्यवस्थेची वाट लागली. अजून परस्थिती सुधारली नाही. लोकांच्या हाताला काम नाही. स्थलांतरामुळे मजुरांना आपला आहे तो रोजगार गमवावा लागला. बेरोजगारी हाटवण्याचा जो की वायदा केला होता. त्याचा सपशेल चुराडा झाला. गॅसचे वाढते दर पाहता. ग्रामीण भागातील महिला आपली चुलचं बरी असं म्हणु लागल्या, खेड्यात सरपण असतं. शहरातील गरीबांनी काय करायच? त्यांना तर गॅसचे दर कितीही वाढले तरी गॅस भरुन आणल्याशिवाय पर्याय नाही. गरीबांचे तुटपुंज्या पैशात घर चालत असतं. महिन्यातून दोन वेळा गॅसचे दर वाढल्यावर कसं होणार? गरीबांनी कसं करायचं आणि कुठे जायचं याचं उत्तर भाजपावाले का देत नाहीत?


उत्पन्न वाढवण्यास अपयश
देश समृध्द करु, इतके महिने द्या, तितके महिने द्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्याआधी सांगितले होते. सत्ता येवून सहा वर्ष झाली. या सहा वर्षात काय चमत्कार केले? उलट उलटया दिशेने विकासाची वाटचाल सुरु झाली. २०१२ -२०१३ ते आज पर्यंत दुपटीने इंधनाचे दर वाढले. ५५ रुपयाने मिळणारे पेट्रोल शंभर रुपया पर्यंत गेले. इंधनाचे इतके दर वाढण्या मागे इतर उत्पन्नातून कर न मिळाल्याने केंद्राने इंधनावर जास्तीचा कर लावण्यास सुुरवात केली. फक्त इंधनावरच एवढा कर लावणं हे अर्थव्यवस्थेसाठी चांगलं नाही. देश चालवायचा म्हटलं की, त्याला विकासाची जोड द्यावी लागते. विकासाची जोड देण्यास भाजपावाले सहा वर्षात अपयशी ठरले, उलट भाजपावालेच सतत म्हणत असतात की, सहा वर्षात सर्व काही बदललं, नेमकं काय बदललं हे भाजपावाले स्पष्ट करुन सांगत नाही. फक्त बदललं असचं म्हणत असतात. कोरोनाच्या आधी पंतप्रधान मोदी यांनी अनेक देशाचे दौरे केले. या दौर्‍यातून देशाला किती फायदा झाला? देशात नवीन उद्योगांना तितकी चालना मिळाली नाही. सतत अंतर्गत-वादा-वादी होत असल्याने विकासाला खिळ बसत गेली. विकासाला खिल बसली की, उत्पन्नात घट होते आणि शासनाला जो काही महसूल मिळायचा आहे तो मिळत नाही. केंद्राने नुसताच अर्थसंकल्प सादर केला. यात समाजहिताचा एक ही निर्णय दिसून आला नाही. फक्त अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा असल्याची नेहमी प्रमाणे बोंब केंद्रातील सत्ताधारी मारत राहिले. अर्थसंकल्पानंतर रोेज इंधनाचे दर वाढत आहेत. जागतीक बाजारात इंधनाचे इतके दर वाढत नाहीत ते भारतात वाढू लागले. वाहनधारकांकडूनच सगळा कर वसूल करण्याच्या विचारात सत्ताधारी दिसतात. इंधनाचे वाढते दर पाहता वाहन धारकांना घरी गाड्या उभ्या करण्याची वेळ आली. महंगाई यह ‘डायन’ है उसे हम भगायेगें म्हणणारेच आज महंगाईच्या ‘डायनला’ देशातील जनतेच्या मानगुटीवर बसवत आहेत. शब्दाची फेकाफेक करणं सोपं असतं. मात्र विकास करुन दाखवणं हे मोठं अवघड काम आहे हे केंद्राने लक्षात घ्यायला हवं.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!