बीड (रिपोर्टर)- कोरोनावर मात केल्यानंतर जिल्ह्यातील अनेकांना अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अशक्तपणा, धाप लागणे, सर्दी यासारखे व अन्य काही लक्षणे जाणवत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा आरोग्य विभागाने बीड जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्र. २३ येथे पोस्ट कोव्हिड ओपिडी सुरू केली असून त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी केले आहे.

आतापर्यंत बीड जिल्ह्यात आढळलेल्या बाधितांपैकी अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे मात्र यातील काही रुग्णांना घरी गेल्यावर विविध त्रास होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांना नेमके कुठे उपचार घ्यावा यासाठी गोंधळ होऊ नये त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांनी जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्र. २३ मध्ये पोस्ट कोविड ओपिडी सुरू केली असून तेथे दररोज सकाळी नऊ ते साडेबारापर्यंत उपचार होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.