Friday, May 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईराजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर काही दिवसांसाठी बंदी; नियम मोडल्यास कडक कारवाई- उद्धव...

राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर काही दिवसांसाठी बंदी; नियम मोडल्यास कडक कारवाई- उद्धव ठाकरे

ऑनलाईन रिपोर्टर– देशासह राज्यातील कोरोना रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोरोना महाराष्ट्रात येऊन आता एक वर्ष पूर्ण होईल. ती जी परिस्थिती होती ती भयानक होती. पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण होईल. या सर्व काळात समाधानाचा क्षण कोणता? तुम्ही मला तुमच्या कुटुंबातला सदस्य मानलं हा समाधानाचा क्षण. हे असं असायला भाग्य लागतं. ते दिवस खूप भयानक होते.’

‘हळूहळू कोरोना हातपाय पसरायला लागला. आता दिलासादायक एवढच की आता व्हॅक्सिन आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 9 लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली गेली आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का अशी भीती आहे. पण ज्या 9 लाख लोकांना लस दिली त्यांच्यात घातक असे साईड इफेक्ट नाहीत. कोरोना योद्ध्यांना सांगतोय, लसीकरण करुन घ्या, बेधडक करुन घ्या’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘तुम्हाला वाटत असेल, लसीकरण कधी तर उपरवाले की मेहरबानी. केंद्र सरकार ठरवतंय की कुठल्या राज्याला किती द्यायच्या. आणखी काही कंपन्यांच्या लस येतील. तोपर्यंत काय काय करायचे. मी नेहमी शिवनेरीवर जातो. पण यावेळेस मुख्यमंत्री म्हणून गेलो. मी तिथेही सांगितले, शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल तर ढाल. कोरोनाचे युद्ध लढताना आपल्या हाती तलवार नाही. पण आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल’,असे ते म्हणाले.

‘मास्क घालायला विसरलो तर हा छुपा शत्रू आपल्यावर वार करू शकतो. मास्क घालणे अनिवार्य आहे, लस घेतल्यानंतर सुद्धा. कोरोना आता पुन्हा डोके वर काढतोय. आपण थोडे फिरायला लागलो. लग्नावरची बंधने अजूनही आहेत. हे उघडा ते उघडा म्हणणारे कोरोनाची शिस्त नाही मोडू शकत. मी तुम्हाला सांगतो की, समजुतदारपणे सूचनांचे पालन करा. सगळ्यांना वाटले कोरोना गेला. कोरोनाची लाट खाली जाते, वर जाते. पण खाली जाते त्याच वेळेस तिला थांबवायचे असते. पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडणे हाच कोरोनावरचा उपाय आहे’, असेही ते म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले की, ‘कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उद्यापासून सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय, आंदोलने, यात्रा यावर पूर्णपणे बंदी असेल. आपण पक्ष वाढवूया, पण कोरोना नाही. पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू. मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्या रात्रीपासून जिथे गरज असेल, तिथे बंधने घालण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!