Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeदेश विदेशआज पुन्हा गॅस २५ रुपयांनी महागला बीडमध्ये गॅसची किंमत ८२० झाली

आज पुन्हा गॅस २५ रुपयांनी महागला बीडमध्ये गॅसची किंमत ८२० झाली


तीन आठवड्यात गॅसची तिसर्‍यांदा दरवाढ; २१ दिवसात शंभर रुपये वाढले
बीड (रिपोर्टर)- पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा पडत असतानाच आज गॅस २५ रुपयाने महागल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातल्या किचनमधील अर्थव्यवस्था पुन्हा ढासळली आहे. गेल्या महिनाभराच्या कालखंडात तब्बल तीन वेळेस दरवाढ होऊन गॅस शंभर रुपयाने वाढला तर गेल्या दोन महिन्यात गॅस दोनशे रुपयांनी वाढल्याचे दिसून येत असल्याने महागाईचा आगडोंब सर्वसामान्यांच्या घराघरात उसळत आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटून टाकले आहे. पेट्रोल शंभरी पार केल्याने आणि डिझेलही शंभरीच्या जवळ येत असल्याने सर्वच क्षेत्रात याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत. आता गॅस दरवाढीने सर्वसामान्य माणसांच्या घराघरात महागाईचे चटके बसणार आहेत. गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडात सातत्याने गॅसची दरवाढ झाली. तब्बल दोनशे रुपयांपर्यंत गॅसचा भाव वाढला. फेब्रुवारी महिन्यात तिसर्‍यांदा गॅसची दरवाढ झाली आहे. चार फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा एकदा एका सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरगुती सिलेंडर ७७९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर जावून पोहचली आहे तर बीडमध्ये याच सिलेंडरची किंमत ८२० वर जावून पोहचली आहे. चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत आता ८१० रुपये, कोलकात्यात सर्वाधिक ८२० रुपये झाली आहे. या महिन्यात तिसर्‍यांदा वाढ झाल्याने केवळ तीन आठवड्यात सिलेंडरच्या किमतीत शंभरची वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैरान झालेल्या सामान्यांना गॅस दरवाढीमुळे धक्का बसला आहे. या दरवाढीमुळे मध्यवर्गीयांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.

भीक नको कुत्रा आवरा
एकीकडे इंधनाचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सबसिडीची अपेक्षा असते परंतु ज्या वेळेस ७२० रुपये गॅसची टाकी होती त्या वेळेस ९ रु.९५ पैसे सबसिडी यायची, आता ८२० ला गॅसची टाकी झाली तरीही सबसिडी ही केवळ ९.९५ पैशेच असल्याने केंद्र सरकारने भीक देण्यापेक्षा महागाईचं कुत्रं आवरावं.

Most Popular

error: Content is protected !!