मुंबई (रिपोर्टर) पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज अखेर आपला राजीनामा दिला आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व आपला राजीनामा त्यांच्याकडे दिला. राठोड यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजपाने मागणी केली होती त्यासाठी राज्यभरात आंदोलन देखील केले होते.
परळी येथील पुजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्याप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे वादात अडकलेले आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाच्यावतीने करण्यात येत होती. भाजपाने याबाबत चांगलीच आक्रमक भुमिका घेत आंदोलनही केले होते. आज राठोड यांनी वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनामध्ये राठोड यांची चर्चा होवू नये यासाठी त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी सुचक ट्विट केले होते त्यानुसार राठोड यांचा राजीनामा नक्की मानला जात होता तर दुपारी राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे दिला आहे. राठोड यांनी राजीनामा द्यावा म्हणून महाविकासआघाडी सरकारवर दबाव वाढला होता. अवघ्या राज्यामध्ये राठोड यांचीच चर्चा होत होती.