Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeसंपादकीयप्रखर - ज्येष्ठांची कुरकुर

प्रखर – ज्येष्ठांची कुरकुर


भारतातील राजकारण्यांना कधी पर्यंत ही राजकारण करता येतं. त्याला वयाची कुठलीही मर्यादा नाही. पिढ्या न पिढ्या राजकारण करणारे आणि त्यांचा वंशवेल पुढे वाढवणारे राजकारणी देशात मोठ्या प्रमाणात आहेत. काँग्रेस पक्ष तसा घराणेशाही जोपासणारा, काँग्रेसच्या घराणेशाहीवर भाजपावाले सतत आरोप करत आले. भाजपातही घराणेशाही बळकट करणारे नेते कमी नाहीत हे मान्य करावे लागणार. आता सगळ्याच पक्षात कुठे ना कुठे घराणेशाहीला पोसले जावू लागले. काँग्रेसमध्ये पुर्वीपासून गांधी घराण्याचा करिष्मा आहे व तो आजही कायम असून  गांधी घराण्यामुळेच देशातील काँग्रेस जिवंत आहे. स्व. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये अनेक वर्ष गांधी घराण्याचं नेतृत्व नव्हतं. काँग्रेस सावरण्यासाठी सोनिया गांधी यांना तत्कालीन काही नेत्यांनी राजकारणात आणलं. सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्यावर विरोधकांनी अनेक वर्ष राजकारण केलं. याच विदेशी मुद्दयावरुन शरद पवार, पी. ए संगमा, तारीक अन्वर यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिलेली आहे. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करुन ही सोनिया गांधी डगमगल्या नाहीत. 2004 साली केंद्रात युपीएचं सरकार आलं, हे सरकार सोनिया गांधी यांच्यामुळेच आलं. सोनिया गांधी पंतप्रधान होतात की काय याची अनेकांना धास्ती होती. अधिक धास्ती भाजपावाल्यांनी घेतली होती. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर देशात आंदोलन करु, मुंडन करु असा इशारा भाजपावाल्यांनी दिला होता. सोनिया गांधी पंतप्रधान न होता. त्यांनी मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी निवड केली. सिंग दहा वर्ष पंतप्रधान होते. दहा वर्षात जो पक्षाचा विस्तार वाढायला हवा होता तो वाढला नाही. काँग्रेसवर सत्तेच्या काळात अनेक आरोप झाले. आरोपामुळे काँग्रेस बदनाम झाली.  2013 साली नरेंद्र मोंदी यांचा उदय झाला. 2014 ची लोकसभा निवडणुक काँग्रेस पक्ष मोठ्या फरकाने हारला. देशात बदल हवा म्हणुन लोकांनी भाजपाला साथ दिली. काँग्रेसला फक्त 40 जागा मिळाल्या. त्यानंतर 2019 ची निवडणुकही काँग्रेस हारली. सहा वर्ष झालं भाजपा सत्तेवर आहे. या सहा वर्षात काँग्रेसचा दोन लोकसभा आणि देशातील विविध राज्यातील निवडणुकीत दारुण पराभव झालेला आहे. अशा संकट काळात पक्षाला सावरण्याची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची असते. सध्या पक्षाचं नेतृत्व राहूल गांधी यांच्या खांद्यावर आहे. राहुल गांधी यांना अजुन सुर सापडलेला नाही. काही ज्येष्ठ मंडळी त्यांच्यावर नाराज आहे. ज्येष्ठांची नाराजी यापुर्वी समोर आलेली होती. तोच पुन्हा एकदा ज्येष्ठंानी बाह्या सारल्या आहेत.
काश्मीरमधून संदेश
राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मु काश्मीरमध्ये शांती संमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनाला आनंद शर्मा, कपिल शिब्बल,भुपिंदरसिंह हुडा, राज बब्बर,विवेक तनखा यांची उपस्थिती होती. भगवे फेटे घालून या ज्येष्ठांनी शांती संमेलनात हजेरी लावली. काँग्रेस पक्ष दुबळा होत आहे. पक्षाच्या बळकटीकरणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. असे गुलाब नबी आझाद यानी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष दुबळा होत आहे याची जाण आझाद यांना आताच का व्हावी? जम्मु काश्मीरमध्ये शंाती संमेलन आताच का घ्यावे असं आझाद यांना वाटलं? आझाद हे गेल्या काही महिन्यापासून पक्षावर नाराज आहेत. आझादसह इतर काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना पक्षाच्या संदर्भात पत्र पाठवले होते. त्यावरुन बराच गदारोळ झाला होता. आता आझाद यांनी राज्यसभेची निवृत्ती घेतल्यानंतर थेट संमेलन घेवून पक्षालाच आव्हान दिले असचं म्हणावं लागेल? आझाद यांच्यासोबत जी काही ज्येष्ठ मंडळी आहे ते सगळेच नाराज आहेत. त्यांना पक्षश्रष्ठेंनी योग्य भाव’ दिला नाही. आझाद याच्या जागी आनंद शर्मा यांची राज्यसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली असती तर शर्मा हे संमेलनाला उपस्थित राहिले असते का? एकीकडे पाच राज्यातील निवडणुकीची घोषणा होणे आणि आझाद यांनी काही नेत्यांना सोबत घेवून संमेलन घेणं हा काही योगयोग नाही का?  
राजकारणातून निवृत्ती नाही
गुलाम नबी आझाद गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात आहेत. जम्मु काश्मिरचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलेलं आहे. केंद्रात त्यांनी अनेक पदं भोगले, ते एक अभ्यासू आणि अनुभवी नेते असून त्यांना राजकारणाचा खडा न खडा माहित आहे. काँग्रसेच्या निष्ठावंतामध्ये त्यांचे नाव होते, मात्र मध्यंतरीच्या पत्रव्यवहारामुळे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होवू लागले. राज्यसभेचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेस पक्ष आपल्याला पुन्हा संधी देईन असं त्यांना वाटत होतं पण तसं काही झालं नाही. आझाद यांच्या निवृत्तीच्या वेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले त्यांनी जुन्या काही घटनाबाबत भाष्य केले. जुन्या आठवणीं सांगतांना त्यांना अश्रू आवरता आले नाही. मोदी यांचे अश्रू पाहता आझाद यांचे संबंध इतर पक्षासोबत किती चांगले आहे हे दिसून आले. आझाद यांचे फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सोबतच नव्हे तर इतर पक्षातील नेत्यासोबत चांगले संबंध राहिलेले आहेत. जसे मोदी यांना अश्रू आवरता आले नाही तसेच आझाद हे ही भाषण करतांना भावूक झाले. मोदी, आझाद यांच्या मैत्रीची आणि त्यांच्या भाषणाची देशात चांगलीच चर्चा झाली. काँग्रेसमधून निवृत्त झालेल्या आझाद यांना भाजपाकडून राज्यसभा मिळणार का ? अशी चर्चा  सुरु झाली. मोदी आणि आझाद यांचे इतके सलोख्याचे संबंध असतील असं कुणाला वाटलं नाही. तसा कुणी विचार केला नाही. आपण राज्यसभेतून निवृत्त झालो आहोत राजकारणातून नव्हे असं आझाद यांनी संमेलनात म्हटले आहे. आता त्याचं पुढचं राजकारण नेमकं कसं असेल याची उत्सूकता लागून राहिली. जम्मु काश्मीरचं त्यांनी मुख्यमंत्रीपद भुषवलेलं आहे ते पुन्हा राज्यातून राजकारणाला सुरुवात करणार की, लोकसभा निवडणुक लढवणार? जम्मु काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यापासून बरेच बदल झाले. जम्मू काश्मीरच्या विकासाची  त्यांनी संमेलनातून हाक दिली. आता पर्यंत  जम्मू काश्मीरचा विकास का झाला नाही किंवा केला नाही, असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे.
आपली चुणूक दाखवावी
राजकारणात ज्या नेत्याचा करिष्मा आहे तो नेता कधी पर्यंतही राजकारण करु शकतो, पण ज्यांचं काही अस्तित्व राहिलं नाही त्यांनी किती ही दंडाच्या बेडकुळ्या दाखवल्या तरी काही फायदा होत नसतो. निवडणुका जिंकण्यासाठी ग्रांउडवर काम करावं लागतं, तेव्हा निवडणुका जिंकता येतात. फक्त भाषण ठोकून आणि आरोप-प्रत्यारोप करुन निवडणुका जिंकता येत नाही. आझाद यांच्यासह त्यांच्या सहकार्याने संमेलन घेवून जे काही शक्तीप्रदर्शन दाखवलं, त्यामुळे कॉग्रेंस पक्षात चांगलीच चर्चा होत आहे. पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही एकत्रीत आलो आहोत असं आझाद यांनी म्हटलं. त्यांना खरचं पक्ष बळकट करायचा आहे तर त्यांनी नुकत्याच पाच राज्यातील निवडणुका घोषीत झालेल्या आहेत तेथे आपली ताकद दाखवायला हवी. त्यांना ही चांगली संधी आहे. यापेक्षा त्यांना दुसरी चांगली संधी मिळणार नाही. पक्ष वाढण्यावण्या बाबत बोलायचं झालं तर आझाद यांच्या राज्यात काँग्रेस पक्षाची खराब अवस्था आहे. आता पर्यंत त्यांनी आपल्या राज्यात पक्षाची वाढ का केली नाही?
आव्हान नेमकं कोणाला?
आझादसह इतर काही ज्येष्ठांची नाराजी आहे पण त्यांची नाराजी नेमकी कोणा बरोबर आहे? राहूल गांधी यांचे नेतृत्व त्यांना मान्य नाही का? काँग्रेसचा अध्यक्ष ऑगस्ट महिन्यात निवडण्यात येणार आहे. अध्यक्षपदावर गांधी कुटूंबा व्यतिरिक्त इतर नेत्यांची निवड व्हायला हवी का? असं तर या ज्येष्ठ नेत्यांचं मत नाही ना? कधी-कधी ज्येष्ठांनी थांबून मार्गदर्शन करायचं असतं, पण भारतीय राजकारणातील ज्येष्ठ थांबायचं नावच घेत नाहीत. आझाद यांच्यासह इतर जे काही नेते मंडळी आहेत. त्यांचे आप-आपल्या राज्यात किती अस्तित्व आहे? या सर्व नेत्यांनी पाच-पाच खासदार निवडून आणले असते तर त्यांची दखल घेण्या योग्य ठरलं असतं. गांधी कुटूंब सोडून काँग्रेस पक्षात गर्दी खेचणारा नेता नाही. काँग्रेसमध्ये ज्येष्ठांना नेहमीच स्थान दिलेलं आहे. इतर पक्षात ज्येष्ठांना बाजुला सारुन नवतरुणांना संधी दिली जाते. तसं कॉग्रेंस पक्षात होत नाही. तरी काँग्रेसच्या ज्येष्ठांना खुर्च्या सोडू वाटत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये ज्येष्ठांच्या खांद्यावर राज्याचा भार दिला होता. मात्र त्याठिकाणी नव्या तरुणांना हे आवडलं नाही. ज्योतिरादित्य सिधिंया यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातून विस्तव जात नाही. त्याठिकाणी  अधुन-मधून फुटीची चर्चा होत असते. निवडणुकीच्या तोंडावर पोद्दुचेरीमध्ये काँग्रेस फुटली असं असतांना  राज्यसभेवरील ज्येष्ठांनी उचल खाल्ली. नको त्या वयात नको त्या कवावती केल्या की, नुकसान कवायती करणारचं होत असतं हा निर्सग नियम आहे. राजकारणाच्या कवायतीत कोण कोणाला भारी पडतयं हे पहायचं असतं. आधीच काँग्रेसचं जहाज खोलात असतांना पुन्हा काहींनी त्याला पाण्यात ओडीत घेवून जावं म्हणजे जहाजला जास्तच हेलकावे बसू शकतात, पण मजबुत जहाज बुडत नाही हे खरं आहे. आज फक्त राहूल गांधीच कॉग्रेसमध्ये सक्रीय दिसतात. इतर एक ही नेता इतका सक्रीय नाही. आझाद यांनी शांती संमेलन घेतलं खरं पण त्यांना शांती संमेलनातून पक्षात अशांतीचा प्रयत्न करायचा की काय असा कयास काढला जावू लागला. राजकारणात पक्षापेक्षा कुणी ही मोठा नसतो. मग तो कोणताही नेता का असेना? काँग्रेसला आज चोहीकडून छिद्र पडलेले आहेत. त्यात ज्ये्ष्ठांचा ही हातभार लागू लागला. धुळधाण झालेली कॉग्रेस पुन्हा उभा राहिलेली आहे हा इतिहास आहे. वय झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ नेहमीच कुरकुर करत असतात. ज्येष्ठांच्या अशा सततच्या कुरकुरीकडे घरातील लोक दुर्लक्ष करत असतात. काँग्रेस पक्षातही ज्येष्ठांची कुरकुर सुरु आहे, ही कुरकुर खुप काही परिवर्तन घडवेल असं वाटत नाही.

Most Popular

error: Content is protected !!