Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे दार उघडले

आज चौघांचा तर तिन दिवसात सात बाधितांचा मृत्यू
बीड (रिपोर्टर):- बीड शहरासह जिल्ह्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसून येत असून रोज कोरोना बाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्याही वाढत आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यामध्ये तब्बल सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये आज बीड आणि अंबाजोगाई रुग्णालयात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सोशल डिस्टन्ससह मास्कचा वापर करत शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे जनतेला आरोग्य प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

covd 19

गेल्या २० दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. रोज कोरोना बाधीतांचा आकडा वाढत चालला आहे. तसा मृत्यूचा आकडाही वाढताना दिसून येत आहे. २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यात एकूण ७७७ कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आरोग्य विभागाकडे होता मात्र गेल्या तीन दिवसात हा आकडा तब्बल ७८४ वर जावून पोहचला असून अवघ्या ३ दिवसात जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आज आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या जिल्हा रुग्णालयात दोन कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये निपाणीजवळका येथील ७१ वर्षीय इसम तर दुसरा ८० वर्षीय शिरूर येथील वृद्धाचा समावेश आहे. तिकडे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तांब राजुरी येथील ५७ वर्षीय इसमाचा आणि गुट्टेवाडी येथील ७३ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी चौघे जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरवत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात सर्वसामान्यांच्या बेजबाबदारपणाचा मोठा हात असल्याचे दिसून येत असून कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स सह मास्कचा वापर करावा तेव्हाच कोरोना हद्दपार होईल.

बीड तालुक्यात ३७ तर जिल्ह्यात ८० पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर):- नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाच संसर्ग वाढु लागला आहे. काल आरोग्य विभागाने १ हजार ४५ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल ८० जण बाधीत आढळून आले आहे. त्यातील ३७ जण हे बीड तालुक्यातील आहेत.
गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढु लागली आहे. आरोग्य विभागाने काल जिल्हाभरातून १०४५ संशयितांचे स्वॅब पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ९६५ जण निगेटीव्ह तर ८० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अंबाजोगाई १५, आष्टीत ८, बीड ३७, धारूर ३, गेवराई २, केज २, माजलगाव ५, परळी ६ तर शिरूर आणि वडवणी तालुक्यात प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!