Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडपरमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो

तहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघड
ग्रामस्थांनाच धमकावलं तहसीलदारांनी
खमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबला

बीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर येत असून बीड तालुक्यातील बोरफडीत एका राशन दुकानदाराचा माल पुरवठा विभागाच्या मर्जीने काळ्या बाजारात नेण्यासाठी त्याच गावातल्या दुसर्‍या दुकानात उतरवला जात असल्याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर गावकर्‍यांनी याला विरोध केला. तेव्हा तहसीलदारांसह अन्य अधिकार्‍यांनी गावकर्‍यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी आमचा माल आमच्याच राशन दुकानदाराकडून घ्यावयाचा आहे, असं म्हणत टेम्पो अडवला. तेव्हा कुठं आज सकाळी ते धान्य संबंधित राशन दुकानदाराला देण्यात आले. सदरची घटना ही बोरफडी येथे घडली.

बीड तालुक्यातील बोरफडी येथील गायकवाड वाडा या ठिकाणी बजगुडे यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. १३१ कार्ड धारकांसाठी या ठिकाणी राशन येते. तशी परमिटही बजगुडे यांना देण्यात आले होते. मात्र महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, पेशकार यांच्या आशीर्वादाने जो राशनचा माल बजगुडे यांच्या राशन दुकानावर उतरायला हवा होता तो त्या ठिकाणी न उतरवता थेट दुसरा दुकानदार रोहीदास घुगे यांच्या दुकानात उतरवला जात असल्याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर त्यांनी काल तात्काळ सदरची गाडी अडवली. याबाबत तहसीलदार यांना माहिती दिली. तहसीलदार वामणे यांनी रात्री साडेनऊ वाजता घटनास्थळ गाठले. तेव्हा गावकर्‍यांनी राशनच्या काळ्या बाजाराची माहिती तहसीलदारांना दिली. परंतु वामणे यांनी संबंधित राशन दुकानदार अथवा काळा बाजार करण्याचा हेतु ज्यांचा होता त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा टेम्पो अडवणार्‍या उपस्थित ग्रामस्थांना दम देण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकावले. असा आरोप गावकर्‍यांनी केला. परंतु तहसीलदारांच्यादाबदडपीलाही गावकरी भिले नाही, आम्ही धान्याचा काळाबाजार होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा आज सकाळी रोहीदास घुगे यांच्या दुकानात अवैधरित्या उतरवलेला माल पुरवठा विभागाने पुन्हा टेम्पोत भरून बजगुडे यांच्या दुकानात आणून टाकावा लागला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा काळा बाजार थांबला. विशेष म्हणजे धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती येथील सामाजीक कार्यकर्ते सुनील कुटे यांनी जेव्हा तहसीलदारांना दिली तेव्हा तहसलदारांनी हे चालायचेच, तुम्हीच ऍडजेस्ट करून घ्या, असं म्हणत संबंधित सामाजिक कार्यकर्त्यालाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. काळ्या बाजारात जाणारा माल गावकर्‍यांनी पकडल्यानंतर या घटनेचा पंचनामा व्हायला हवा, दोषींवर गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हायला हवी, परंतु अशी कुठलीही कारवाई संबंधितांवर झाली नाही. पुरवठा विभागाच्या संगनमतानेच छोट्या-मोठ्या गावांमधील राशन धान्याचा काळाबाजार होतो हे पुन्हा एकदा स्पष्ट होते.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!