चोरीचे सोने घेणार्या सराफाच्याही आवळल्या मुसक्या
दैठण फाट्यावर भरदिवसा घडली होती घटना
बीड (रिपोर्टर)- मिरगावचा बाजार करून गेवराईकडे परतणार्या एका सराफाला दैठण फाट्याजवळ अडवून त्याच्याकडील चौदा तोळे सोनेसह ५ किलो चांदी हिसकावून घेऊन पोबारा केलेल्या टोळीचा अखेर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून यातील तिघा जणांच्या मुसक्या आवळल्या तर चार जण फरार आहेत. तर चोरीचे सोने विकत घेणार्या गेवराईतील सोनाराचेही पोलिसांनी मुसक्या बांधल्या.
गेवराई येथील सराफ चंद्रकांत उदावंत हे २७ फेब्रुवारी रोजी मिरगाव येथील आठवडी बाजाराला गेले होते. बाजार उरकून ते गेवराईकडे परतत असताना दैठण फाट्याजवळ दुपारी एक वाजता आरोपी नितीन दत्तात्रय जाधव (वय २८, रा. गेवराई), राहुल कुंडलिक बुधनर (वय २४, रा. खामगाव), दीपक भुसारे (वय २३, रा. शिर्डी) यांनी त्यांच्या इतर चौघांच्या साथीने चंद्रकांत उदावंत यांना थांबवून त्यांच्याकडील १४ तोळे सोने व पाच किलो चांदी बळजबरीने हिसकावून घेतली आणि तेथून पोबारा केला. या प्रकरणी उदावंत यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर काल पोलिस निरीक्षक भारत राऊत यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गेवराईत छापा टाकून आरोपी नितीन, राहुल आणि दीपक यांच्या मुसक्या आवळल्या. या वेळी त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर तो माल गेवराई येथील संदीप जवकर यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी सोनार संदीप जवकर यांनाही ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी नितीन जाधव आणि राहूल कुंडलिक (पान ७ वर)
यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मार्फत ऑगस्ट २०२० मध्ये गेवराई जवळील एका पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला धमकावून त्याच्याकडील ३८ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले होते. या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिली. या चोरट्यांनी या अगोदरही अनेक गुन्हे केले असून ते उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दुल्लत, पोलिस हवालदार तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, बालाजी दराडे, मुन्ना वाघ, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, विक्की सुरवसे, चालक हतुल हराळे आणि जायभाये यांनी केली.