Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडसलेक्टेड पोस्ट मास्तरांनी नोकरी केली रिजेक्ट

सलेक्टेड पोस्ट मास्तरांनी नोकरी केली रिजेक्ट

राज्यात कोरोना काळात झाली होती दहावी पास विद्यार्थ्यांची भरती, फक्त दहावी मार्कच्या आधारावर राज्यातील ३ हजार ६४१ मुलांना मिळाला होता रोजगार

यात दहावीत ९२ टक्क्यापेक्षा जास्त टक्केवारी घेणार्‍या विद्यार्थ्यांना मिळाली संधी, दहावीत ९० व ९१ टक्के घेवून जिल्ह्याचे नाव उंचावणारे विद्यार्थी झाले रिजेक्ट

बीड जिल्ह्यातील ७९ उमेदवारांची झाली होती निवड, भरती झालेले अनेक उमेदवार अद्यापही जॉईन झाले नसल्याने वेटींगमधील उमेदवारांची लॉटरी लागण्याचे चिन्ह

बीड जिल्ह्यात भयंकर बेरोजगारी असतांना ज्या उमेदवारांना दहा पास टक्केवारीवर केंद्र शासनाच्या आधीन नोकरी मिळालेली असतांना या उमेदवारांनी माघार का घेतली?

डाक विभागाच्या एक्स्ट्रा डिपार्टमेंटल अंतर्गत ब्रँच पोस्ट मास्तर व सहाय्यक ब्रँच पोस्ट मास्तर या पदासाठी झाली होती २०१९ ला भरती

विशेष म्हणजे नोव्हेंबर २०१९ साली राज्यातील निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली, त्या यादीतील अनेक उमेदवारांनी नोकरी नाकारली; दिलेल्या ठिकाणी अद्यापही काही उमेदवार हजर झाले नाहीत, एकट्या बीड जिल्ह्यात १० उमेदवार गैरहजर तर राज्यात किती?

भरती झालेल्या उमेदवारांचे दहावी बोर्डचे प्रमाणपत्र बोर्डमार्फत तपासून घेतात संबंधित डाक विभाग, एका प्रमाणपत्राची तपासणी फिस २०० रूपये भरून सर्व पडताळणी करूनच उमेदवाराला रूजू करून घेतात

दहावी पास असलेल्या उमेदवारांची मिरीट लिस्टप्रमाणे होणार होती निवड, कमी टक्केवारी असलेल्या काही उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरत असतांना जास्त टक्केवारी दाखवून फॉर्म भरल्याची चर्चा

दहावी बोर्ड प्रामणपत्रावरील टक्केवारी वाढवून प्रमाणपत्रावरील मार्क सोबत छेडछाड केल्याची मिळाली माहिती, त्या भरतीच्या वेळी दहावी प्रमाणपत्रावर छेडछाड करून टक्केवारी वाढवून देणारी टोळी सक्रीय असल्याचेही मिळाली माहिती

रिपोर्टरच्या हाती लागले कमी व जास्त टक्केवारी असलेले दहावीचे प्रमाणपत्र, त्या प्रमाणपत्रात छेडछाड करून ओरिजनल प्रमाणपत्र असल्याचे दाखविण्यात आल्याचे दिसून येत आहे

काही उमेदवारांनी ऑनलाईन चुकीची माहिती भरून जास्त टक्केवारी दाखवून भरती तर झाले नाही, परंतू कागदपत्रे पडताळणीत भांडा फुटेल या भितीने तर भरती होवूनही जॉईन झाले नसावे काही उमेदवार; सखोल चौकशीची गरज

विशेष म्हणजे डाक विभागाने प्रथम नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या निवड यादीतील उमेदवारांचे दहावी बोर्डचे प्रमाणपत्र तपासणी केले तर अनेक बाबी समोर येण्याची शक्यता; जर प्रमाणपत्रातून गोंधळ झाला असेल तर अनेक होतकरू उमेदवारांचे झाले नुकसान

बोर्डाकडे प्रमाणपत्र तपासणीसाठी आले असता बोर्ड कर्मचारी पुर्ण दक्षता घेवूनच तपासणी करतात, प्रमाणपत्रावर एखाद्या साध्या अक्षराचीही चुक असेल तर निर्गम उतार्‍याच्या आधारावरच दुरूस्ती करून घेतात; अशा प्रकारे प्रमाणपत्रात छेडछाड बाहेरच झाली असावी अशी माहिती माजी बोर्ड मेंबर समीर शेख यांनी दिली
राज्यात वाढती बेरोजगारी त्यानुषंगाने राज्य शासन व केंद्र शासन प्रत्येकवेळी बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्नात असतात. विविध योजनाच्या माध्यमाने किमान बेरोजगारांना मजुरी तरी मिळावी या उद्देशाने विविध कामांना प्राधान्य देतात. विशेष म्हणजे बीडसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील होतकरू तरूण इतर जिल्ह्यात जावून रोजगार शोधतांना दिसत आहेत. बीड जिल्ह्यात रेल्वे, विमानतळ अशा प्रकारचे व्यवसाय नसल्याने रोजगारीचा मोठा प्रश्‍न बीडकरांसमोर दररोज उभा असतो. यासाठी केंद्र शासनाने दहावी पास विद्यार्थ्यांना संधी मिळावी या दृष्टीकोनातून कोणतीही लेखी, तोंडी परीक्षा न घेता फक्त दहावीच्या मिरीट लिस्टच्या आधारावर राज्यातील बेरोजगार तरूणांना आधार देण्याचा प्रयत्न केला.

ground reporting

देशात कोरोनाने हाहाकार माजवलेला असतांना केंद्र शासनाने डाक विभागाच्या माध्यमाने वरील भरती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने राज्यभरातून हजारो दहावी पास उमेदवारांनी या भरतीत सहभाग घेवून आपल्या भविष्य आजमावले. परंतू या भरतीतही काटेकोर टक्कर झाली आणि जिल्ह्यात ९० व ९१ टक्के मार्क घेवून पास झालेले दहावीचे विद्यार्थी ज्यांनी जिल्ह्याची मान उंचावली होती असे विद्यार्थीही या भरतीत रिजेक्ट झाले. मिरीट लिस्टच्या आधारावर ९२ टक्के घेवून पास झालेले विद्यार्थी या भरतीचे मानकरी ठरलेे. नोव्हेंबर २०१९ रोजी डाक विभागाने सलेक्शन झालेल्या उमेदवारांची यादी जाहिर केली. राज्यातील ३ हजार ६४१ उमेदवारांची या भरतीत निवड झाली. कोरोना काळात केंद्र शासनाने राज्यातील बेरोजगारांना मोठा दिलासा दिला. केंद्र शासनाच्या आधीन राहून काम करण्याची संधी या निवड झालेल्या पोस्ट मास्तरांना मिळाली. सलेक्शन यादी जाहिर झाल्यानंतर काही उमेदवार तात्काळ आपल्या ठिकाणी जॉईन झाले. बीड जिल्ह्यातील ७९ उमेदवारांची या भरतीत निवड झाली. बीड जिल्ह्यात असलेल्या विविध डाक विभागात या ७९ उमेदवारांना जबाबदारी देणार असल्याने आपल्याला आपल्या आवडीचे ठिकाण मिळावे यासाठी निवड झालेले उमेदवार प्रयत्न करू लागले. केंद्र शासनाचा या भरतीचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील डाक सेवा सुरळीत करणे. म्हणून या मुलांना ग्रामीण भागातच राहून काम करणे बंधनकारक होते. भरती झालेले उमेदवार उत्साहाने कामाला लागले. परंतू बीड जिल्ह्यातील निवड झालेल्या ७९ उमेदवारांपैकी ६९ उमेदवारच नोकरीवर हजर झाले. इतर १० उमेदवार गेल्या एक वर्षापासून आत्तापर्यंत हजरच झाले नाही. कदाचित या उमेदवारांना दुसर्‍या नोकरीचे मोठे ऑफर आले असतील किंवा भविष्यात त्यांना दुसरी नोकरी निवडायची असेल असेही कारण असू शकते. यानुषंगाने डाक विभाग कर्मचार्‍यांनी वेळोवेळी पाठपुरावा ही केला. परंतू अद्यापही वरील दहा उमेदवार बीड जिल्ह्यात कोणत्याही विभागात जॉईन झाले नाही. बीडसारख्या जिल्ह्यात साधी २०० रूपये रोज प्रमाणे नोकरी मिळत नाही. तर मग मिळालेल्या नोकरीकडे या उमेदवारांनी पाठ का फिरवली? हा चौकशीचा भाग असून या संदर्भात रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला असता भरती झालेल्या काही उमेदवारांनी दहावीच्या प्रमाणपत्राच्या मार्कामध्ये छेडछाड करून ऑनलाईन चुकीची माहिती भरून नोकरी तर मिळवली परंतू नोकरी मिळाल्यानंतर कागदपत्राची पडताळणी होणार या भितीने तर नव्हे हे उमेदवार हजर झाले असावे असाही अंदाज व्यक्त केला जात असून प्रशासनाने आपल्यास्तरावर याची पडताळणी करावी. विशेष म्हणजे रिपोर्टरच्या हाती लागलेले दहावी बोर्डचे प्रमाणपत्र, या प्रमाणपत्रात उमेदवाराने मार्कमेमोत छेडछाड केल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीकोनातून गेल्या आठ दिवसापासून रिपोर्टर पाठपुरावा करत आहे. परंतू प्रशासकीय सहकार्य मिळत नसल्याने या प्रमाणपत्रात छेडछाड झाली का? या मागे मोठे रॅकेट आहे का? एकट्या बीड जिल्ह्यातच हे प्रकरण आहे की राज्यभरात अशा प्रकारे प्रमाणपत्रात छेडछाड झालेली आहे का? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. याबाबत बोर्डचे माजी मेंबर समीर शेख यांच्याशी संपर्क करून त्यांना छेडछाड झालेल्या प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रति दाखवण्यात आले. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली की, बोर्डाकडे प्रमाणपत्र तपासणीसाठी आले असता बोर्ड कर्मचारी पुर्ण दक्षता घेवूनच तपासणी करतात, प्रमाणपत्रावर एखाद्या साध्या अक्षराचीही चुक असेल तर निर्गम उतार्‍याच्या आधारावरच दुरूस्ती करून घेतात. बोर्ड कर्मचारी प्रमाणपत्रासंदर्भात कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करत नाहीत. कदाचित प्रमाणपत्रात छेडछाड करून असे कार्य केले असावे.
डाक विभागात दहावी पासच्या आधारावर मिरीटमध्ये मार्क घेणार्‍या ७९ उमेदवारांची निवड झाली. ही सलेक्शन यादी नोव्हेंबर २०१९ रोजी जाहिर करण्यात आली. पहिल्या यादीतील उमेदवार गैरहजर असल्यास वेटींग यादीतील उमेदवारांना संधी मिळते. त्या प्रमाणे डाक विभागाने जे उमेदवार वेळेवर हजर झाले नाहीत अशांना सूचना देवून इतर उमेदवारांना नोकरीची संधी दिली. अशा प्रकारे पहिल्या यादीतील अनेक उमेदवार गैरहजर राहून नोकरीवर हजरच झाले नाहीत अशी माहिती मिळाली. बीडसारख्या जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्‍न समोर असतांना केंद्र शासनाच्या मिळालेल्या नोकरीकडे या उमेदवाराने पाठ का फिरवली हा चौकशीचा भाग आहे. यानुषंगाने रिपोर्टरच्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला, भरती झालेल्या काही उमेदवारांचे दहावीचे प्रमाणपत्र जे की कमी टक्केवारीची व जास्त टक्केवारी असलेले आहेत. हे प्रमाणपत्र खरे आहे की खोटे या उमेदवारांनी याच प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली का? किंवा या उमेदवारांना फसवण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे? या सर्व बाबी प्रशासनाने आपल्यास्तरावर तपासून घ्यावेत. जर प्रमाणपत्रात छेडछाड करून नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्या विद्यार्थ्यांना ९०-९१ टक्के मार्क मिळालेले आहेत ते उमेदवार या भरतीतून रिजेक्ट झाले. जर प्रमाणपत्रात छेडछाड झाली नसती तर वरील होतकरू उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली असती. म्हणूनच ९२ टक्के मिळविणार्‍या उमेदवारांनाच नोकरीची संधी मिळाली. ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली त्यापैकी अनेक उमेदवार गैरहजर आहेत, एकट्या बीड जिल्ह्यात १० उमेदवार नोकरीवर अद्यापही हजर झाले नाहीत. डाक विभाग नियमाने पुढील कार्यवाही करून वेटींग लिस्टमधील उमेदवाराला नोकरी देतील परंतू जे उमेदवार नोकरीवर हजर झाले नाहीत, त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घ्यावे की, ते नोकरीवर हजर का होवू शकत नाहीत किंवा पहिल्या सलेक्शन यादीतील उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी केली तर अनेक रहस्यांचा उलगडा होईल. या भरतीत डाक विभागाकडून गोंधळ झालेला नसला तरी भरतीत कुठे तरी माशी शिंखली म्हणूनच प्रमाणपत्राविषयी चर्चेला उधान अलेले आहे.

एक्स्ट्रा डिपार्टमेंटल भरती
डाक विभागातून यापुर्वीही अशा प्रकारे एक्स्ट्रा डिपार्टमेंट अंतर्गत भरती झाली असावी. यात फक्त दहावी मिरीट पास विद्यार्थ्यांना संधी देण्यात येते. ब्रँच पोस्ट मास्तर व सहाय्यक ब्रँच पोस्ट मास्तर अशा प्रकारे निवड झालेल्या उमेदवारांना पद देण्यात येते. या भरती झालेल्या उमेदवारांना सुरूवातीलाच १४ ते १५ हजार रूपये पगार असतो. पुढे शिक्षण घेवून याच डिपार्टमेंटमध्ये त्यांना उच्च पदापर्यंत जाता येते. अत्यंत महत्त्वाची संधी या उमेदवारांना मिळालेली आहे. विशेष म्हणजे ग्रामिण भागातील डाक व्यवस्था कोलमडू नये, ग्रामीण भागातील ग्रामस्थांना डाक विभागाचा लाभ घेता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात ही भरती करण्यात येते. विशेेष म्हणजे केंद्राच्या आधीन राहून काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे. परंतू काही कारणामुळे अशा भरतीलाही ग्रहण लागते. डाक विभाग नोकरी देण्यापुर्वी उमेदवारांच्या कागदपत्राची पुर्ण पडताळणी करूनच पुढील कार्यवाही करते. यात बोर्डाकडून प्रमाणपत्राची तपासणी करण्यात येते. प्रमाणपत्र तपासणीसाठी डाक विभाग एका प्रमाणपत्राचे २०० रूपये प्रमाणे बोर्डला फीस देतात. अशा प्रकारे प्रमाणपत्राची कडक तपासणी होते. या भितीने तर काही उमेदवार गैरहजर आहेत अशीही चर्चा सुरू आहे.


या प्रश्‍नाची उत्तरे निरूत्तरीत
या पोस्ट मास्तरच्या भरतीत प्रमाणपत्रात छेडछाड करून बोगसगिरी झाली का? नोकरी लागलेले उमेदवार नोकरीवर हजर का झाले नाही? पहिल्या सलेक्शन यादीतील उमेदवारांची प्रमाणपत्र तपासणी करून यादी प्रकाशित करण्यात आली होती का? यापुर्वी पण अशा प्रकारे डाक विभागात भरती झालेली आहे, त्यावेळी पण दहावी प्रमाणपत्रात गोंधळ झाला होता का? एकदा डाक विभागाने सध्या कार्यरत असलेल्या व आता नवीन भरती झालेले असे सर्व कर्मचार्‍यांचे बोर्ड प्रमाणपत्र बोर्डाकडून तपासून घेण्याची गरज असून जर प्रमाणपत्रात छेडछाड करून नोकरी मिळवली असेल तर ही बाब समोर येईल. तसेच यानुषंगाने सुरू असलेल्या चर्चेला ही पुर्णविराम लागेल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!