Thursday, August 5, 2021
No menu items!
Homeक्राईमक्राईम डायरी- म्हशीवरच्या करनीने त्यांना जनावर बनवले निष्पाप बालकाला त्यांनी गळा घोटून...

क्राईम डायरी- म्हशीवरच्या करनीने त्यांना जनावर बनवले निष्पाप बालकाला त्यांनी गळा घोटून मारले

जी गोष्ट मुळात खरी नसतांनाही तिच्यावर विश्वास ठवणे, ती मानणे म्हणजे ’अंधश्रध्दा’, अंधश्रध्दा हा एक मानसिक दुबळेपणा आहे. मागास व अशिक्षित समाजाच नाही तर सुशिक्षित आणि श्रीमंतही अंधश्रद्धे पछाडलेले आहेत. त्यातून अंधश्रध्देची अनेक उदाहरणे आहेत काही सौम्य तर काही घातक व भयंकरही आहेत. करणी, अंगात येणे, जणावराला करणी केली म्हणून ते मरतात का?, पायाळू जन्मलेल्या व्यक्तीला खरच जमिनीतले पाणी दिसते?, बालकबळी दिल्यावर गुप्तधन सापडते का? मांजर आडवे जाण्यामुळे काम बिघडते का?, मासिक पाळी अमंगळ असते?, विटाळ होतोच का? अशा अनेक रुढी परंपरा आपण का पाळतो? त्याच्यापाठीमागील भूमिका काय असावी? त्या प्रथमता: का सुरु झाल्या असाव्यात? त्यांचा प्रसार इतक्या झपाट्याने कोण आणि का? करातो याकडे आपण दुर्लक्ष करतो. अन् त्यातूनच समाजाला घातक ठरणार्‍या अन् कोणाचा संसार उध्दस्त होणार्‍या भयंकर घटना समोर येतात. अशीच एक निव्वळ अन् निव्वळ अंधश्रध्देतून एका ६ वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा गळा घोटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

crime dayri logo 2

सकाळी दहा वाजता आपल्या बहिणी सोबत जिल्हा परिषद शाळेच्या अंगणात खेळायला गेलेल्या सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह शाळेच्या बोळीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचा कोणीतरी खून करून मृतदेह शाळेच्या बोळीत टाकला होता. ही हृदय हेलावून टाकणारी घटना दि.३ फेब्रुवारी २०२१ रोजी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नागिरी या गावी घडली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली अन् सहा वर्षाच्या चिमुकल्यांची हत्या झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. नेमका हा खून कोणी आणि का केला? याचं कारण मात्र स्पष्ट झालं नसल्याने नेकनुर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यंाच्यासह नेकनुर पोलिस या घटनेचा बारकाव्याने तपास करत होते. अन २४ तासात हत्या करणार्‍या क्रूरकर्मा पती पत्नीला त्यांनी गजाआड केले. चिमुकल्याची हत्या का केली हे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा प्रत्येकाचीच तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहात नव्हती.


बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रत्नागिरी नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात सपकाळ नावाचं कुटुंब मोठ्या गुण्यागोविंदाने राहत. रावसाहेब भगवान सपकाळ (वय वर्ष ६५, व्यवसाय शेती) हे आपल्या कुटुंबीयांचा गाडा शेती करून सांभाळतात. त्यांना पत्नी सुशीला, एक मुलगा मोतीराम व तीन मुली शोभा, मीरा व मिना अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या तिन्ही मुलींचे लग्न आलेली आहेत. त्यांचा मुलगा मोतीराम याचेदेखील लग्न झाले असून त्याची पत्नी नामे रोहिणी ही आहे. त्यांना एक मुलगी धनश्री (वय वर्ष नऊ) आणि मुलगा शुभम उर्फ राज (वय वर्ष सहा) असे आहेत. हे कुटुंब मोठ्या गुण्यागोविंदानं रत्नागिरी या गावात राहत. आपलं काम भलं अन् आपली शेती भली म्हणून ते सर्व कुटुंब शेतीमध्ये राब राब राबत. रावसाहेब सकाळ यांचा नातू शुभम उर्फ राज हा आजोबांचा लाडका, शेतातून आजोबा आले की त्यांच्या मागेपुढे फिरणारा शुभम रोज त्यांच्या कडून चॉकलेट घेण्यासाठी पैसे मागणारा शुभम एके दिवशी त्यांना कायमचं सोडून जातो. तो दिवस शुभमच्या घरच्यांसाठीच नव्हे तर रत्नागिरी गाव आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी एक धक्कादायक होता. दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी शुभमचे आजोबा रावसाहेब भगवान सपकाळ हे रोजच्याप्रमाणे सकाळी शेतातून घरी आले. घरी आल्यानंतर अंघोळ करून चहा घेऊन सकाळी नऊ वाजता पुन्हा घरातून परत शेतात जाण्यासाठी निघाले. तेव्हा जिल्हा परिषद शाळेच्या अंकुश रसाळ यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानाजवळ ते आले असता त्यांचा नातू शुभम उर्फ राज सोबत त्याचा मित्र विश्वनाथ बालासाहेब नरवडे हा देखील होता. ते दोघे जण शुभमच्या आजोबा जवळ आले अन् चॉकलेटसाठी पैसे मागितले. आजोबा नाहीतर शुभमचा लाड कोण पूर्ण करणार? शुभम ने चॉकलेट साठी पैसे मागितल्या मागितल्या आजोबाने दोघांनाही चॉकलेट साठी पैसे दिले. चॉकलेट साठी पैसे मिळाल्याच्या आनंदात शुभम आणि त्याचा मित्र पुन्हा त्या जिल्हा परिषद शाळेकडे खेळण्यासाठी केले. आपला नातू शुभम हा शाळेकडे गेला तो रोज खेळायला तेथे जातो त्यामुळे आजोबाच्या मनात कसलाही संशय आला नाही. ते सरळ शेतात कामासाठी निघून गेले. त्यानंतर रावसाहेब भगवान सपकाळ यांची पत्नी सुशीला व सून रोहिणी या दोघी शेतात कामासाठी गेल्या आणि त्यांनी जेवणासाठी भाकरी आणल्या होत्या. ते तिघे जण भाकरी खाण्यासाठी बसले असताच गावातील शाळेवर शिक्षक म्हणून असलेले देवगुडे सर व त्यांची नात धनश्री आले अन् देवगुडे सरांनी तुमचा राज शाळेच्या बोळीमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिल्यानेे सपकाळ कुटुंबियांचा काळजाचा ठोका चुकला. आपला चिमुकला राज शाळेच्या आवारात बेशुद्ध पडला हा शब्द कानावर पडताच त्याची आई, आजी आणि आजोबा वार्‍यासारखे धावत-पळत शाळेकडे गेले. शाळेजवळ गेल्यानंतर त्यांना समजले की शुभमचे वडील मोतीराम सपकाळ यांनी शुभमला नेकनूरच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहेत. त्यानंतर शुभम चे आजोबा रावसाहेब सपकाळ आणि देवगुडे सर हे दोघेजण देवगुडे सरांचा मोटरसायकलवर बसवून सरकारी दवाखाना नेकनूर येथे गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना कळाले की डॉक्टरांनी शुभमला तपासून तो दवाखान्यात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याने डॉक्टरांनी सांगितले. शुभम चे आजोबा रावसाहेब सपकाळ यांनी शुभमला दवाखान्यात जाऊन पाहिले असता त्याच्या गळ्याच्या खाली व हनुवटीवर नखे ओरबडलेले अन् गळ्यावर काळेनिळे झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे नातवाला कोणीतरी मारून टाकल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोस्टमार्टम करण्यासाठी प्रेत अंबाजोगाई येथील स्वरातील रुग्णालयात घेऊन गेले आणि त्याच दिवशी रात्री उशिरा गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती माहिती मिळताच नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पो.ह. शरद कदम, पो.ह.मच्छिंद्र खाडे, पो.कॉ.दीपक खांडेकर आणि पो.कॉ.गोविंद राख यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा बारकाईने पंचनामा करुन तपासासाठी गावात कसून चौकशी सुरु केली.

2021 03 12 p3 aplod

अन् नेमका शुभमचा खून कोणी आणि का केला याची इत्यंभूत माहिती पोलीस घेत होते. मात्र खून करणार्‍यांनी त्याचा गळा आवळून खून करून मृतदेह शाळेच्या बोळीत टाकला होता. त्यामुळे हा खून कोणीतरी गावातील व्यक्तीनेच केला असावा असा अंदाज पोलिसांनाही होता. स्वाराती रुग्णालयातून अहवाल आल्यानंतर त्यामध्येही गळ्याभोवती दाब पडल्याने शुभमचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे पालिसांनी सपकाळ कुटुंबीयांचे कुणासोबत काही भांडण आहे का? याही अँगलने तपास सुरु केला होता. शुभमच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व नातेवाईक आले होते त्याच वेळेस मयत शुभम चे आजोबा रावसाहेब भगवान सपकाळ हे आणि त्यांचे नातेवाईक घरी बसले असतांना रावसाहेब यांचा पुतण्या मिलिंद नामदेव सपकाळ व जावई अशोक गोरखनाथ शिंदे यांनी सपकाळ यांना सांगितले की सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास ते दोघे रत्नागिरी या गावातून नेकनूरला मोटरसायकलवरून जात होते यावेळी गावातील शाळेच्या पाठीमागे राहणारे रोहिदास नवनाथ सपकाळ हा त्याच्या घराजवळ उभा असलेला व त्याची पत्नी देवईबाई रोहिदास सपकाळ हिने तिच्या दोन्ही हाताने शुभम उर्फ राज यास धरून यांच्या घरामध्ये घेऊन जात असतांना पाहिले होते. मात्र गावातीलच असून नातेवाईक असल्याने यांना त्यांच्यावर काहीच संशय आला नाही त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करून तसेच निघून गेले अशी माहिती त्या दोघांनी शुभमच्या आजोबांना दिली.
त्यावरुन शुभमच्या आजोबांनी सरळ नेकनुर पोलिस ठाणे गाठून रोहिदास नवनाथ सपकाळ व देवबाई रोहिदास सपकाळ यांनी यांनीच शुभमचा गळा घोटून खून केला असल्याची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन नेकनुर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २५/ २०२१ कलम ३०२, २२१, १२० (ब) ३४ भादवी गुन्हा दाखल करुन घेतला अन् आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्याची पोलिस कोठडी घेतली. सुरुवातीला आम्ही हे केलंच नसल्याचा आव आनला. मात्र गुन्हे उघड करण्यात एक्सपर्ट असलेल्या लक्ष्मण केंद्रे यांच्या नजरेतून आरोपी सहजा सहजी सुटने शक्य नाही. त्यांनी त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात दोघेही पोपटासारखे बोलू लागले. अन् त्यांनी जेव्हा पोलिसांना खून का केला याचे कारण सांगितले तेव्हा. मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्याशीवाय राहत नव्हती. रत्नागिरी येथे राहणारे रोहिदास व देवभाई या दांपत्याची म्हैस काही दिवसापूर्वी गेली होती. ती म्हैस रावसाहेब सपकाळ यानेच करणी करून मारली असे खूळ रोहिदास दाम्पत्याच्या डोक्यात होते. शुभम चा खून होण्याच्या दहा दिवसापूर्वी याच दांपत्याचे आणि शुभमच्या आजोबांचे कडाक्याचे भांडण झाले होते. मात्र भावकी भावकीत वाद होतातच त्यामुळे रावसाहेब यांनी या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र अंधश्रद्धेने झपाटलेल्या अन् सुडाने पेटलेल्या सपकाळ दांपत्यांनी म्हैस मारल्याचा बदला चिमुकल्या शुभमचा गळा घोटून घेतला. आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शाळेच्या बोळीत त्याचा मृतदेह टाकून दिला. या घटनेतील दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिक्षक राजा रामा स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख एपीआय लक्ष्मण केंद्रे हे करत आहेत.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!