Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडग्राउंड रिपोर्टींग- उघड्या खदानीचे जाळे

ग्राउंड रिपोर्टींग- उघड्या खदानीचे जाळे

अनेक वर्षापासून ईटीएस मशिनने तपासणी झाली नसल्याने खदानीतून बेसुमार दगडाचे उत्खनन, अनेक उघड्या खदानीत पाणी साचलेले; उत्खनन करून खदानी उघड्या सोडणार्‍यांवर कारवाई कोण करणार?
काही खदान चालकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन, प्रशासनाचे दुर्लक्ष, पर्यावरणासह ग्रामस्थांच्या मुळावर; नियमाने खदान किती खोल उत्खनन करावे?
खदानीतून उत्खनन केल्यानंतर उघड्या खदानी वेस्ट मटेरियलने भरून घेवून त्या जागेवर वृक्षरोपन करून झाडे लावणे हे नियमात असतांना या खदानी उघड्या का?
उघड्या खदानी प्रशासनाच्या निदर्शनास का आल्या नाही? खदानी तब्बल २५ ते ३० फुट खोल खांदलेल्या ही बाब अत्यंत गंभीर, परवाना धारक खदान चालकांकडून त्याच वेळी उघडे खदान भरून का घेतले नाही?
बीड तहसील प्रशासनाने त्यांच्यासोबत पत्र व्यवहार केला का? त्यांच्या परवान्याचा कार्यकाळ संपला त्याचवेळी ईटीएस मशिनने तपासणी करून कॉंटेटी का घेतली नाही? एकदा खानीचा परवाना घेवून पुन्हा परवाना नुतनीकरण न करणारे अनेक विना परवाना खदान धारक; एकट्या बीड तालुक्यात १० तर जिल्ह्यात किती?
बीड तहसीलदार यांनी केली भूमि अभिलेख कार्यालयाकडे दगड खदानीची ईटीएस मोजणी करून देण्याची मागणी, यादीतील अनेक खदानी चालक विना परवाना असल्याचे नमुद,
आता पाण्याने भरलेल्या खदानाची ईटीएस मोजणी कोण करणार? भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी विना परवाना खदानीच्या शोधात; यादीतील खदानी सापडून येत नसल्याने खदान नेमकी केली कुठे? भूमापक यांच्यासमोर मोठे आव्हान,
गेल्या अनेक वर्षापुर्वी ज्या खदान धारकांनी खदानीचा परवाना घेवून उत्खनन केले त्यांचे ऍग्रीमेंटही संपले, अशांचा आता घेतायत प्रशासन शोध
प्रशासनाने त्यांच्यासोबत पत्र व्यवहार केला नसल्याने खदानी दुर्लक्षित, यात माजी खदान चालकांचा काय दोष?
सध्या बीड जिल्ह्यात ५२ खदानी कार्यरत, या खदानी २०१८ पासून परवाना धारकांच्या ताब्यात, या चालू खदानीची ईटीएस तपासणी करण्याची गरज; सर्वाधिक १७ खदानी बीड तालुक्यात
कचरा डंपींग ग्राऊंड करण्यासाठी उघडी खदान दिल्याने स्वच्छता गुत्तेदाराने अवघ्या सहा महिन्यात भरली खदानीची एक बाजू; अशा उघड्या खदानी डंपींग ग्राऊंडसाठी देवून भरून घेण्याची गरज

गौण खनिज ही आजची दोन्ही बाजुची गरज आहे. गौण खनिज नसेल तर बांधकामापासून ते पर्यावरणापर्यंत असंतुलीत वातावरण होवून जाईल म्हणूनच प्रशासन गौण खनिजाकडे विशेष लक्ष देवून असते. परंतु काही प्रशासन फक्त वाळूलाच गौण खनिजाचा महत्त्वाचा भाग समजून फक्त वाळुकडेच लक्ष देवून वाळू सारखे गौण खनिजाचे रक्षण करतांना दिसून येते. परंतू गौण खनिज म्हणजे जमिनीच्या तीन फुटानंतर जे काही निघेल त्यालाच गौण खनिज म्हणतात. विशेष म्हणजे जमिन कोणाचीही असो जमिनीखाली ३ फुट खोल जे मटेरियल निघेल त्याची रक्षा करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. परंतू प्रशासन वाळु आणि मुरूम वगळता इतर कोणत्याच गौण खनिजाकडे लक्ष देतांना दिसत नाही. म्हणूनच इतर गौण खनिजांचा बेसुमार उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून गौण खनिज दुर्लक्षित होतांना दिसते. गौण खनिजातील महत्त्वाचा घटक म्हणजे दगड होय. यासाठी दगड खदानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कार्यरत आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सध्या ५२ खदानी परवाना घेवून सुरू आहेत. या खादानीत २०१८ पासून सुरू असून संबंधित खदान चालक या खदानीतून उत्खनन करून दगडाचा व्यवसाय करतात. परंतू काही खदानी विना परवानाही असल्याच्या प्रशासनाच्या निदर्शनास आले असून या खदानीत पुर्वी परवाना घेवून सुरू असाव्यात परंतू नंतर परवान्याचे नुतनीकरण न केल्याने किंवा संबंधित खदान धारकांचा ऍग्रीमेंट संपल्याने त्यांनी त्या खदानी तशाच सोडल्या. विशेष म्हणजे प्रशासनाने ही त्यांच्या सोबत पत्र व्यवहार केला नसावा म्हणून या खदानी उघड्या आणि दुर्लक्षित झाल्या असाव्यात. या उघड्या खदानी पर्यावरणासह ग्रामस्थांच्या मुळावर उठत असून या उघड्या खदानी चक्क पाण्याने भरून तलावाचे रूप धारण केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून उघड्या खदानी आता प्रशासनाच्या निदर्शनास आले असून बीड तहसील कार्यालयाने भूमिअखिलेख कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार करून खदानीची ईटीएस तपासणी करण्याची मागणी केली आहे. विशेषत: ही ईटीएस तपासणीची मागणी पहिल्यांदाच करण्यात आली असून आतापर्यंत अशा उघड्या खदानीतून बेसुमार उपसा झालेला दिसून येत आहे. यात बीड तालुक्यात १७ खदानी परवाना घेवून असल्या तरी अनेक खदानी (ज्या खदानी बंद पडलेल्या आहेत) विनापरवानाही असल्याचे दिसून येत आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांनी बीड तालुक्यातील काही खदानीची पाहणी केली असता खदानीत पाणी असल्याने आता या खदानीची ईटीएस तपासणी कशी करायची? हा मोठा प्रश्‍न संबंधित कर्मचार्‍यांसमोर उभा असून आता जरी ईटीएस तपासणी झाली तरी पुर्वी झालेल्या जास्तीच्या उत्खनननाला जबाबदार कोण राहणार? प्रशासनाने ज्या वेळी सुरूवातीलाच खदानीचे परवाने देवून त्या खदानीकडे लक्ष दिले असते किंवा वेळोवेळी खदान धारकांसोबत पत्र व्यवहार केला असता तर आज त्या खदानी दुर्लक्षित झाल्या नसत्या परंतू प्रशासनाने जबाबदारपणाने लक्ष न दिल्याने या खदानी उघड्या पडल्या असून अनेक नियमाचे उल्लंघन करून खदानी त्यावेळीही सुरू होत्या आणि आजही सुरू आहेत. यासाठी प्रशासनाने स्वत: जबाबदारी स्विकारून प्रशासनाच्या कोणत्या अधिकार्‍याने किंवा कर्मचार्‍याने खदानीच्या कामकाजाकडे कधी लक्ष दिले का? याचे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे.

ground reporting


बीड जिल्ह्यात सध्या ५२ खदानी सुरू आहेत. त्यापैकी १७ खदान बीड तालुक्यात असून बीड शहरापासून जवळच असलेल्या नाळवंडी परिसरात खदानीचे मोठे जाळे पसरलेले दिसून येत आहे. यात काही खदानी परवाना धारकांच्या ताब्यात असल्या तरी काही खदानी जुन्या आणि दगड काढुन उघड्याच ठेवण्यात आलेल्या आहेत. या उघड्या खदानीचे जाळे एवढे भयंकर आहे की, या खदानीत पाणी साचून त्याचे तलावात रूपांतर झाल्याचे दिसून येते. रिपोर्टरच्या प्रतिनिधीने अशा उघड्या खदानीत उतरण्याचे प्रयत्नही केले परंतू कोणत्याही प्रकारे नियमाने खदानीत उत्खनन न झाल्याने तसेच नियमाने उत्खनन करतांना पायर्‍या तयार करून त्या पायर्‍याची लांबी, रूंदी, उंची किती ठेवावी असे पथ्य पाळण्यात आलेले नाही. तसेच खदानीची प्रशासनाने ईटीएस तपासणी आतापर्यंत केली नसल्याने खदानीतून बेसुमार उपसाही झाला असावा परंतू संबंधित तहसील विभागातील कर्मचार्‍याने कोणत्याही प्रकारचे लक्ष दिले नसल्यानेच या खदानी उघड्या पडलेल्या दिसून येतात विशेेष म्हणजे उघड्या खदानी भरून घेवून त्या ठिकाणी वृक्षरोपन करून तसेच खदान उत्खनन करतांना शेजारी पर्यावरणाचे नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई करून देणे. असे अनेक कडक नियम असतांनाही खदान धारकांनी कधी वृक्षारोपण केले का? याची संबंधित विभागाने कधी पाहणी करून त्यांच्याकडून दंड वसुल केला का? अशा अनेक बाबी जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्षित झाल्या असल्यानेच खदान धारकांनीही दुर्लक्षित केले असावे. विशेष म्हणजे भूमिअभिलेख कार्यालयात जी यादी तहसील कार्यालयातून प्राप्त झाली त्यातील काही खदानी भूमापक यांना सापडत नसल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली असून संबंधित विभागाचे कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून यादीतील खदान चालकाचा शोध घेतांना दिसत आहे. खर्‍या अर्थाने ईटीएस मशिनद्वारा मोजमाप करण्याची पद्धत २०१२ पासून सुरू आहे. परंतू २०१२ पासून ते आजतागायत संबंधित विभागाने ईटीएस मोजणी का करून घेतली नाही? हा महत्त्वाचा प्रश्‍न असून पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष भविष्यात धोकादायक ठरतील यात काही शंका नाही.

संबंधित विभागाने कधी या तपासण्या केल्या का?
खदान धारकांनी उत्खनन सुरू करण्यापुर्वी भूमि अभिलेख कार्यालयामार्फत खदानी सिमांकीत करून खदानीच्या बाजुने स्तंभ लावून खदानीची सिमा ठरवून घेतली का? अनेक नियमांचे उल्लंघन, एकही खदानीला सिमा ठरल्याचे दिसून येत नाही; भूमि अभिलेख कार्यालयाने आपल्यास्तरावर कधी पाहणी केली का? प्रशासनाने खदानीतील गौण खनिज नमुणे तपासणीसाठी घेणे आवश्यक आहे, आत्तापर्यंत अशा तपासण्या झाल्या का? खदानीतील उत्खनन करतांना उघड्या खदानीतील पायर्‍यांची उंची, लांबी, रूंदी योग्य आहे का? याची कधी पाहणी झाली का? अशा अनेक तपासण्या गुलदस्त्यात खदान धारक यांनी खाणकाम केलेला खर्च लेखे, खोदून काढलेले सर्व प्रकारच्या गौण खनिजाचे प्रमाण, खरेदीदारांचे नावे, मिळवलेल्या पैशांच्या पावत्या, खाणीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या, कर्मचार्‍यांची सुरक्षा व संपूर्ण खाणीचा नकाशा कधी जबाबदार अधिकार्‍यांनी तपासला का? अशा अनेक तपासण्या गुलदस्त्यात असून संबंधित विभागाने कधी या तपासण्या केल्या का? स्वत:च विचार करावा.

डंपींग ग्राऊंड खदानीसाठी जीवदान
बीड शहरातील कचरा उचलून बिंदूसरा नदीच्या पात्रात टाकण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगर पालिकेने कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र डंपींग ग्राऊंड तयार करून कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. यात सर्वप्रथम नाळवंडी नाका परिसरात डंपींग ग्राऊंडसाठी जागा देण्यात आली. डंपींग ग्राऊंडसाठी उघडी खदान देवून कचर्‍याची विल्हेवाट लावता-लावता ती उघडी खदान चक्क भरत आली आहे. गेल्या सहा महिन्यात संबंधित स्वच्छता गुत्तेदाराने डंपींग ग्राऊंडचा योग्य वापर करून उघडी खदान भरून गेल्याने आता उघड्या खदानीला डंपींग ग्राऊंडच एक पर्याय असून या डंपींग ग्राऊंडमुळे उघड्या खदानांना जीवदान मिळतांना दिसून येत आहे.

पाण्याने भरलेल्या खदानी
बीड तहसील विभागाने भूमि अभिलेख कार्यालयाकडे तालुक्यातील सुरू असलेल्या १७ खदानी व विना परवाना असलेल्या दहा खदानी अशा २७ खदानी तपासून घेण्यासाठी अर्ज केला आहे. या अनुषंगाने उपअधिक्षक भूमिअखिलेख यांच्या आदेशाने भूमापक कर्मचारी यादीतील खदानीचा शोध घेत आहेत. परंतू अनेक खदानीत पाणी भरलेले असल्याने या खदानीची ईटीएस तपासणी कशी करणार? हा प्रश्‍न समोर उभा असून पाणी काढुन तपासणी करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. तसेच एक गुप्त माहिती अशी मिळाली की, यादीतील काही खदानी मिळून येत नसल्याने त्या कर्मचार्‍यांची पंचाईत झाली आहे. या विषयी उपअधिक्षक भूमि अभिलेख यांच्याशी विचारना केली असता खदानी विषयीचे काही नियम त्यांच्यापर्यंत पोहचलेले दिसून आले नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!