महात्मा गांधी आपल्या विचारामुळे अजरामर झाले. त्यांचे तत्वज्ञान जगात वापरले जाते. त्यांच्या विचाराने अनेक तत्वज्ञानी घडले आणि आज ही घडत आहेत. गांधीवाद हा सत्य आणि अहिंसेवर अवलंबून आहे. गांधींचे विचार आत्मसात करायचे म्हटलं तर त्याला मोठा त्यागच करावा लागेल. गांधीचे विचार असचं कुणी आचारणात आणू शकत नाही, मात्र गांधीच्या विचाराची नक्कल केली जावू लागली. गांधी विचाराची नक्कल करणारे हे काही गांधीवादी होवू शकत नाही. आजचे राजकारणी कधीच गांधी विचारावर चालू शकत नाहीत. गांधीचं नाव घेवून राजकारण करु शकतील, तसा आव आणतील पण प्रत्यक्षात गांधीचे विचार आचरणात आणु शकणार नाहीत. अनेकांनी गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आजही करत आहेत. इतकी बदनामी करुन ही गांधी बदनाम होत नाही हे विशेष म्हणायचं, संसदेतच गांधींच्या विचाराला विरोध करणारे आहेत, ते ही भाजपाचे खासदार आहेत. साध्वी प्रज्ञासिंह सारखे खासदार नथुराम गोडसे याचा उदो-उदो करत असतात व गांधीच्या नावाने बोटे मोडत असतात. तरी पंतप्रधान मोदी ब्र शब्द बोलत नाहीत. १९१५ साली महात्मा गांधींचा राजकारणात उदय झाला. ब्रिटीशाविरुध्द लढण्यासाठी त्यांनी अहिंसेचा मार्ग निवडला. गांधी याचं हे अहिेंसेचं हत्यार प्रभावी ठरलं. त्यांच्या अहिंसेच्या हत्याराला ब्रिटीश प्रचंड प्रमाणात घाबरत होते. गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून देशात ब्रिटीशाच्या विरोधात जनमत एकवटलं होतं, त्यामुळे गांधीचे अहिंसेचे तत्व किती प्रभावी होते हे जगाने पाहिले आहे. गांधीच्या विचाराने भारावलेली पिढी स्वातंत्र्यपुर्व काळात होती. आज ती दिसत नाही. गांधी हे एक विचार म्हणुनच जगा समोर आलेले आहेत.
दांडी यात्रा
इंग्रजांनी मिठावर कर लावला. या कराच्या विरोधात आंदोलन करण्याची मोहिम गांधी यांनी हाती घेतली. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाची आपली योजना जाहीर केली. त्यानुसार ते १२ मार्च १९३० रोजी ७८ सहकार्यासह साबरमती आश्रमातून निघून दांडी येथील समुद्र किनार्यापर्यंत सुमारे दोनशे एकेचाळीस मैल चालत जाणार होते, आणि तेथे मिठाचा सत्याग्रह करणार होते. सत्याग्रहाच्या या स्वरुपाने संपुर्ण देश हेलावून गेला. दांडी यात्रेला शुभेच्छा व सत्याग्रहणींना निरोप देण्यासाठी अहमदाबाद परिसरातील जवळजवळ पाऊन लाख लोक साबरमती आश्रमात जमले. जगातील विविध देशांचे पत्रकार दांडी यात्रेसाठी भारतात दाखल झाले. महात्मा गांधी व त्यांचे ७८ सहकारी पदयात्रा करत साबरमती आश्रमातून दांडीच्या दिशेने कुच करु लागले. वाटेत प्रत्येक खेड्यात लोकांनी अपुर्व उत्साहाने त्यांचे स्वागत केले. गांधीजींनी स्वागतासाठी जमलेल्या लोकांपुढे छोटीशी भाषणे केली. या भाषणातून त्यांनी लोकांना निर्भय बनून कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. दांडी यात्रेने संपुर्ण देशात एक नवचैतन्य निर्माण झाले. ६ एप्रिल १९३० रोजी महत्मा गांधी व त्यांचे सहकारी यांनी दांडी येथील समुद्र किनार्यावर मिठाचा सत्याग्रह करुन कायदेभंगाची चळवळ सुरु केली. सरकारने कोणालाच अटक केली नाही. त्यानंतर गांधीजींनी पत्रक काढून लोकांनी मिठाचा कायदा मोडून सरकारचा आदेश पायदळी तुडवावा असे आवाहन केले. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने लोक ठिकठिकाणी जमले व त्यांनी मिठाचा कायदा तोडला. मिठाचा सत्याग्रह ही एक प्रतिकात्मक कृती होती. तरीसुध्दा ब्रिटीश सरकारने आपल्या साम्राज्याच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी ही चळवळ दडपून टाकायचे ठरवले व राष्ट्रीय सभेच्या अनेक नेत्यांना सरकारने अटक केली. दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहानंतर म. गांधींनी सुरत जिल्हयात धारासणा येथे मिठागारावर २१ मे १९३० रोजी कायदेभंग करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतू ४ मे १९३० रोजी त्यांना अटक झाली पण त्यामुळे धारासणा येथील नियोजीत सत्याग्रह बारगळला नाही. गांधींजीच्या गैरहजरीत त्यांच्या सहकारी व स्वातंत्र्य लढ्यातील एक विख्यात नेत्या सरोजिनी नायडू यांनी धारासणा सत्याग्रहास मार्गदर्शन केले. अशा सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी देशातील लोकात जागृती करण्याचं काम केलं. चिमुटभर मिठ उचलून गांधींनी ब्रिटीशांना घाम फोडला होता. इतकी ताकद गांधींच्या आंदोलनात होती.
साबरमतीहून निघाली यात्रा
भाजपा आणि गांधी विचार तशी विरुध्द भुमिका म्हणायची, तरी ही मोदी गांधी यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतांना दिसतात. मोदी कधी चरख्यावर सुत काततात, कधी स्वदेशीचा नारा देत असतात. त्यांना गांधी बद्दल किती प्रेम आहे हे त्यांनाच ठावूक? १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वातंत्र्याची ७५ वर्ष पुर्ण करत आहेत. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी ‘आझादी अमृत महोत्सव’ आयोजित केला. १२ मार्च १९३० रोजी गांधी यांनी दांडी यात्रा काढून इतिहास घडला होता. त्याच दिवशी म्हणजे १२ मार्च २०२१ रोजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढण्यात आली. यात्रेला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेत ८१ जण आहेत. ही पदयात्रा नवसारीतील दांडी येथे ५ एप्रिलला पोहचणार असून यात्रेची सांगता त्याठिकाणी होणार आहे. यात्रेच्या शुभारंभी प्रसंगी मोदी म्हणाले की, साबरमती आश्रमात आल्यानंतर बापुमुळे देश घडवण्याचा माझा निर्धार अधिक पक्का होतो. गांधींनी आत्मनिर्भरतेची शिकवण दिली होती. असं ही त्यांनी सांगितलं. गेल्या सहा वर्षापासून मोदी यांच्या हातात देशाची सत्ता आहे. आता पर्यंत ते किती लोकांना आत्मनिर्भर करण्यास यशस्वी झाले? देश घडवण्याची संधी दिल्या नंतर वर्षभरात बदल घडवून दाखवेल असं ही त्यांनी देशाला सांगितले होते. एका वर्षाचं सोडून द्या, सहा वर्षात नेमकं झालं काय? आणि मोदी यांच्यामुळे देशातील जनतेला किती फायदा झाला? गांधीची शिकवण हे सर्वधर्माची आहे. आज जाती, धर्माचे राजकारण वाढले. जाती,धर्माच्या राजकारणाला जाणीव पुर्वक हवा देण्याचे काम होत आहे. अहिंसेपेक्षा हिेसेला महत्व प्राप्त झाले. गांधी विचारातून भाजपाने नेमकं काय घेतलं याचं आत्मचितंन त्यांनीच करावं?
सत्याचा मार्ग
सत्याचा, अहिेंसेचा मार्ग जितका सरळ तितकाच बिकट आहे. तो तलवारीच्या धारेवर चालण्यासारखा आहे. डोंबारी ज्या दोरीवरुन सरळ नजर ठेवून चालत जातो. त्या दोरीपेक्षा सत्य, अहिेसेची दोरी बारीक आहे. जराशी गलफल झाली की, आपण खाली कोसळोेलच समजा. प्रतिक्षणी साधना केल्यानेच त्याचे दर्शन घडणार. प्रत्येक वाईट विचार म्हणजे हिंसा होय, उतावळेपणा म्हणजे हिंसा, द्वेष म्हणजे हिंसा होय, कोणाचे वाईट चितणे म्हणजे सुध्दा हिंसाच, ज्याची लोकांना गरज आहे ते आपल्या ताब्यात ठेवणे ही सुध्दा हिंसाच आहे. अहिंसेविना सत्याचा शोध अशक्य आहे. अहिंसा व सत्य ही एकमेकांशी इतकी जखडलेली आहेत की, जशा काही नाण्याच्या दोन बाजु, किंवा गुळगुळीत चकतीच्या दोन्ही बाजू, त्यापैकी सुलटी कोणती आणि उलटी कोणती? तरीपण अहिंसेला आपण साधन म्हणावे व सत्याला साध्य. साधन आपल्या हातातील गोष्टी आहे,म्हणुन अिंंहंसा परम-धर्म झाली. सत्य म्हणजे तर परमेश्वर, साधनाची काळजी घेतली तर कधी काळी तरी साध्याचे दर्शन घडेलच. एवढी प्रचिती पटली की, जग जिंकलेच असे गांधी यांनी सत्य, अहिंसेबाबत म्हटले आहे.
गरीबांचे कैवारी होते गांधी
सत्तेचा मार्ग हा समाजाचा विकास करण्यासाठी असला पाहिजे. तसं तत्वज्ञान गांधीचं आहे. शेतकर्यांच्या हिताचा नेहमीच गांधीनी विचार केलेला आहे. अहिंसेचं जे तत्वज्ञान गांधींनी घालून दिलेलं आहे. त्यानूसार आज ही लोक आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. गेल्या चार महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहे, मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही, हे आंदोलन अहिंसेच्याच मार्गाने सुरु आहे. गांधीच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार्या पंतप्रधान मोदींना या आंदोलनात बाबत काही निर्णय घ्यावा असं का वाटत नाही? गांधी यांनी समाजातील सर्वच घटकाबाबत आपली मते व्यक्त केलेली आहेत. उद्योग, शेती,शिक्षण,ग्रामीण भाग यांचा विकास करण्याची भुमिका गांधी यांची होती. विशेष करुन गरीबांच्या बाबतीत त्यांना प्रचंड कळवळा असायचा. महात्मा गांधीच्या कल्पनेचं स्वराज्य सर्वांना समावून घेणारं आहे. गांधी म्हणायचे जो पर्यंत गरीबांच्या कमीत कमी आवश्यकता भागविण्याची परिपुर्ण सोय होत नाही. तो पर्यंत त्याला खर्या अर्थाने स्वराज्य म्हणता येणार नाही. दहा-वीस व्यक्ती एखाद्या केद्रस्थानी बसून खरी लोकशाही चालवू शकत नाही, पण आज देशात काय होत आहे? काही ठरावीक लोकच देशात मनमानीपणा चालवून आपली हुकूमशाही गाजवत आहेत. गांधींचा विचार आत्मसात करुन खर्या अर्थाने देशाचा कारभार चालवण्याची सदबुध्दी राज्यकर्त्यांना येणार की नुसताच गांधी विचाराचा पुळका दाखवणार?