अंबाजोगाई (जि.बीड) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी शेख सिराज शेख मुन्शी (रा.मियाभाई कॉलनी, अंबाजोगाई) यास बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अॅट्रॉसिटी कलमानुसार एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश एम.बी.पटवारी यांनी गुरुवारी (ता.18 ) ठोठावली. दंडाची रक्कम पीडितेस देण्याचा व शिक्षा एकत्र भोगण्याची आदेश न्यायालयाने दिला.
पीडित मुलगी (वय 9) वही आणण्यासाठी आरोपीच्या दुकानावर गेली असता दुकान बंद असल्याने आरोपीने पीडितेस दुसर्या दरवाज्यातून आत येण्यास सांगितले. त्यावेळी मुलगी वही घेत असता आरोपीने तिचा विनयभंग व लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर सदर घटना मुलीने मावशी व आजीला सांगितली. तिच्या आईने फिर्याद दिल्यावरून येथील शहर पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण सुनावणीसाठी येथील सत्र न्यायालयात पाठविण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात झाली.
फिर्यादी पक्षाच्या वतीने एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आरोपी शेख सिराज शेख मुन्शी यास पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड आणि एक वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश एम.बी. पटवारी यांनी ठोठावली.फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील ड. रामेश्वर मन्मथअप्पा ढेले यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक विशाल आनंद यांनी केला.