कडा (रिपोर्टर) शेवगाव येथून कांदा भरून निघालेला पिकअप पैठण-बारामती रोडवर कडा नजीक असलेल्या पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालक किरकोल जखमी झाला. रात्री उशीरा कडा पोलिसांनी अपघातग्रस्त पिकअपमध्ये अडकलेल्या वाहन चालकास सुखरुप बाहेर काढले. तो कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत होता.
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील सोमनाथ कचरू जाधव हा मंगळवारी रात्री पिकअप ( क्रमांक एम.एच 20,डी.ई.6899) मध्ये कांदा गोण्या घेऊन कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पैठण बारामती रोडने येत होता. कडा नजीक येताच चालकाला झोप लागल्याने अनियंत्रित पिकअप पुलाच्या खाली गेले. यात चालक वाहनात अडकून पडला. याचवेळी नाईट राऊड पेट्रोलिंग करत असलेले कडा पोलिस चौकीचे हवालदार बाबासाहेब राख, वाहन चालक प्रदिप घोडके यांना हे दृश्य दिसले. त्यांनी लागलीच अपघातग्रस्त वाहनाकडे धाव घेतली. प्रयत्न पूर्वक पोलिसांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले. पोलिसांच्या सतर्कतेने जाधवचे प्राण वाचले. भल्या पहाटे पोलिस देवाच्या रूपात पुढे उभा ठाकल्याने मला जिवदान मिळाल्याची प्रतिक्रिया चालक सोमनाथ जाधव याने दिली.