Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन

जिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन


बँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;
सकाळी ७ ते १० दूध विक्रीला तर ७ ते १२ फिरत्या भाजीपाला विक्रीला परवानगी

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज अखेर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी बीड जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन घोषीत केले. शंभर टक्के लॉकडाऊन करताना जिल्हाधिकार्‍यांनी सर्व दुकाना, व्यवस्थापन, आस्थापनांसाठी एक नियमावली बनवली असून हे लॉकडाऊन २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. हे लॉकडाऊन कडेकोट असणार असल्याचे सांगत सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी कोरोना रोखण्यासाठी ही उपाययोजना करावी लागली, असे जिल्हाधिकार्‍यांनी या वेळी म्हटले.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनची घोषणा करत नियमावली सादर केली. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक ए. राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार, तहसीलदार वमने हे उपस्थित होते.


गेल्या पंधरवाड्यात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्याअनुषंगाने अखेर बीड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दहा दिवसांचे लॉकडाऊन केले. आज पत्रकार परिषदेमध्ये जिल्हधिकारी म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातले सर्व व्यवहार बंद असणार आहेत. आरोग्यासह अन्य महत्वाच्या अति आवश्यक कामांसाठी संबंधित पुरावे देऊन या लॉकडाऊनमध्ये बाहेर पडता येणार आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मॉर्निंग, इवनिंग वॉकही बंद
जिल्ह्यातील सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे हे संपुर्ण बंद राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक अथवा इवनिंग वॉक प्रतिबंधीत राहणार आहेत.

रुग्णांसाठी जेवण देणार्‍यांना परवानगी
जिल्ह्यातील सर्व हॉटेल, उपहारगृहे, रेस्टॉरंट, लॉज, हॉटेल्स, मॉल, बाजार, मार्केट शंभर टक्के बंद असणार असून कोविड रुग्णांसाठी व इतर रुग्णांची जेवण, नाश्ता, चहा व इतर पुरवठा करण्यासाठी पुर्वपरवानगी दिलेल्यांना लॉकडाऊनमध्ये सवलत असणार आहे.

सर्व दुकाना, आस्थापना बंद
बीड जिल्ह्यातील सर्व दुकाना, आस्थापना, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर यासह सर्व दुकाना या शंभर टक्के बंद राहणार आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालय, शिकवण्या बंद
इयत्ता दहावी-बारावीसाठी शिकवण्या सुरू होत्या. मात्र या दहा दिवसांच्या कालखंडात सर्व शाळा, महाविद्यालये, शिकवण्या या शंभर क्के बंद असणार आहेत. यामध्ये केवळ विद्यापीठाच्या परीक्षांना सवलत दिली आहे.

वाहतूक पुर्णत: बंद
बीड जिल्ह्यातील सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद असणार असून दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी अथवा कुठलेही वाहन या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्वपरवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील. सोबत ओळखपत्र, पुर्वपरवानगी, वैद्यकीय कारण, त्याचा पुरावा अत्यावश्यक आहे.

प्रशासकीय वाहनांना परवानगी
सार्वजनिक व खासगी बससेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादी वाहने पुर्णत: बंद राहणार असून कोरोनाबाबत उपाययोजनांचे काम करणारे बीड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस विभागाचे राज्य व केंद्रीय विभागाचे विनिनिष्ट कर्मचारी, वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणार्‍या कर्मचारी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा, वस्तू याचा पुरवठा करणारी पुर्वपरवानगी असणारे घाऊक वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात आलेली आहेत.

सर्वसामान्यांचे बांधकाम बंद
शासकीय बांधकामे चालू

दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बीड जिल्ह्यात सर्वसामान्य लोकांनी बांधकाम करावयाचे नाही, मात्र कुठे शासकीय बांधकाम चालू असतील त्या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांना संबंधित शाखा अभियंता यांनी तात्पुरते पास उपलब्ध करून देणे बंधनकारक राहिल त्यानंतर ते बांधकाम चालू असेल.

लग्न, स्वागत समारंभ बंद
बीड जिल्ह्यात येत्या दहा दिवसात लग्न समारंभासह स्वागत समारंभांना बंदी घालण्यात आली असून राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रमांसह सभा पुर्णत: बंद असणार आहेत. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थना स्थळे संपुर्णपणे बंद असणार आहेत.

बँकांना शटर लावून सवलत
३१ र्माचच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व खासगी कार्यालये संपुर्णपणे बंद असले तरी बँकेत चलन भरण्याची कामे करण्यास लॉकडाऊनमध्ये परवानगी देण्यात आली असून दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगचे कामे करण्यासाठी केवळ ३ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

किराणा दुकानांबाबतचा निर्णय
बीड जिल्ह्यातील सर्व ठोक किराणा दुकानांना सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली असून किरकोळ विक्रेत्यांना सकाळी सात ते नऊ या वेळेत दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येणार आहे. त्या दरम्यान सोशल डिस्टन्ससह मास्क वापरणे बंधनकारक असेल.

दुध आणि फळभाजी विक्रेत्यांसाठी निर्णय
दूध विक्री व वितरणाला सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच परवानगी देण्यात आली असून दूध संकलन नेहमी प्रमाणे विहित वेळेनुसार सुरू ठेवता येणार आहे. सोशल डिस्टन्स आणि मास्क वापरणे दूध विक्रेत्यास आणि वितरकास बंधनकारक आहे. त्याचबरोबर त्याची अँटीजेन चाचणी आवश्यक असेल. भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते १० या वेळेत किरकोळ विक्रेत्यांना करता येईल, त्याबरोबर किरकोळ विक्रेत्यांनी एका ठिकाणी न थांबता सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत गल्ली-बोळामध्ये जावून फळ विक्री करावी.

रुग्णसेवा नाकारता येणार नाही
सर्व खासगी, सार्वजनिक, वैद्यकीय, पशूचिकित्सक सेवा या नियमित वेळानुसार सुरू राहतील. रुग्णालय व रुग्णालयाशी निगडीत सेवा, आस्थापना, त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू असणार आहेत. लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णसेवा नाकारता येणार नाही. रुग्णसेवा नाकारली तर त्या विरुद्ध कठोर कारवाई होईल. ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्यांशी संबंधित सर्व मेडिकल चोवीस तास सुरू ठेवता येणार आहेत.

शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी
सर्व न्यायालये, राज्य व केंद्र शासनाचे कार्यालये तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक संस्थेची कार्यालये, राष्ट्रीय बँका शासन निर्णयानुसार ५० टक्के उपस्थितीत मर्यादेनुसार सुरू ठेवता येतील. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा फॉर्म्युला वापरावा. कर्मचार्‍यांना पासची आवश्यकता नाही तथापी स्वत:चे ओळखपत्र असणे बंधनकारक राहील.

शहरात केवळ दोन पेट्रोल पंप सुरू
बीड शहरातले सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. त्यामध्ये केवळ पोलीस पेट्रोल पंप नगर रोड बीड, साई पेट्रोल पंप बार्शी रोड बीड हे दोन्ही पंप चोवीस तास सुरू राहणार आहे तर जिल्ह्यातील अन्य पेट्रोल पंपांबाबत संबंधित तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा.

अंत्यविधीसाठी २० लोक
अंत्यविधीसाठी अंत्ययात्रेत केवळ २० लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रवेश करायचाय तर अँटीजेन चाचणी बंधनकारक
बीड जिल्ह्यामध्ये दहा दिवस कडेकोट लॉकडाऊन ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याबाहेरून बीड जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला अँटीजेन अथवा आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक राहणार आहे. ज्या व्यक्तीकडे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र असेल त्यालाच जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!