Sunday, April 18, 2021
No menu items!
Home कोरोना रोख-ठोक- बुडते है जन, न देखे डोळा लॉकडाऊनची आणिबाणी

रोख-ठोक- बुडते है जन, न देखे डोळा लॉकडाऊनची आणिबाणी

२० जानेवारी २०२० साली जागतिक आरोग्य संघटनेची बैठक झाली. आणि या बैठकीत सार्वजनिक आरोग्य आणिबाणी जाहिर केली. चीनमध्ये निपजलेल्या कोरोना व्हायरसचे परिणाम कुठल्या देशात अधिक जाणतील याचे चिंतन आणि मनन या बैठकीत करण्यात आले होते. तेथून पुढे जे घडले ते उभ्या जगाने पाहिले. अखंड भुतलावरचा असा एक देश नाही की त्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. परंतू काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढला की न भुतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण होत अवघ्या जगााला घर बंद रहावं लागलं. त्यामुळे जगाच्या पाठीवर ज्या आर्थिक कोंडीचा रोग मोठ्या प्रमाणावर पसरला तो आजतागायत घराच्या बाहेर निघायला तयार नाही. अशा स्थितीत अखंड विश्‍वातले लोक परिस्थितीचा सामना करत असले तरी त्यांची परिस्थिती आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सुधारलीच असेल असे नाही. ज्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या देशात तर कोरोना महामारीने जेवढा हैदोस घातला तेवढाच आर्थिक कोंडीच्या रोगानेही थयथयाट मांडला. कोरोना प्रादुर्भाव आणि आर्थिक कोंडी ही मोठ्या प्रमाणावर भारतात पहावयास मिळाली. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये कोरोनामुळे जे लॉकडाऊन करण्यात आले त्या लॉकडॉऊनमुळे कोरोनाची महामारी संपुष्टात आली नाही मात्र आर्थिक कोंडीचा रोग मात्र घराघरात जडला गेला. आर्थिक कोंडीने अक्षरश: सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे यांचे हालहाल झाले नव्हे आजही होत आहेत. या स्थितीत कोरोना होवून मेलेलं बरं मात्र आता लॉकडाऊन नकोे असं स्पष्टपणे सर्वसामान्य बोलून दाखवू लागला. या सर्व घडामोडी पाहिल्या आणि वर्षभरातल्या काही महिन्याचं लॉकडाऊन अनुभवलं तर कोरोना लॉकडाऊनमुळे जातोच का? या प्रश्‍नावर स्पष्टपणे उत्तर नाही असच येईल. मात्र तरीही आज देशातल्या काही राज्यात आणि प्रामुख्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा शासन प्रशासन व्यवस्थेकडून लॉकडाऊनचं हत्यार उपसण्यात येवू लागलं. आधीच पाच-सहा महिन्याच्या लॉकडाऊनने घरातली जमा पुंजी संपुष्टात आली आणि आता पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याचं धाडस लोकात उरलं नाही. अशा परिस्थितीमध्ये

rok thok


कोरोना महामारीशी सामना
करायचा तो कसा?

हा प्रश्‍न जेंव्हा उपस्थित होतो तेंव्हा नक्कीच कोरोना हा आजार जिवघेणा आहे यात दुमत असण्याचे कारण नाही. कोरोनावर लस उपलब्ध झाली त्यामुळे आता जास्त भितीचे ही कारण नाही असा विश्‍वास भारतीय जनतेत निर्माण झाला. त्यामुळे कोरोनावरचा उपाय हा लॉकडाऊन असू शकत नाही असे ठाम मत लोकांचे झाले. त्यामुळे जेंव्हा केंव्हा लॉकडाऊनचा विषय शासन प्रशासन व्यवस्थेकडून चर्चेला जातो त्यावेळेस लॉकडाऊनला प्रामुख्याने कष्टकरी, कामगार, हातावर पोट असणारे आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून त्याला विरोध होतो. जेंव्हा हे लोक आपल्या पोटापाण्यामुळे याला विरोध करतात तेंव्हा शासन प्रशासन व्यवस्थेकडून कोरोना महामारीशी सामना करायचा तरी कसा? असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. या प्रश्‍नाचं उत्तर सर्व सामान्यांकडून घेण्यापेक्षा व्यवस्थेने ते शोधायला हवं. नव्हे-नव्हे तर ते उत्तर शोधण्याचं कर्तव्य हे त्या व्यवस्थेचंच आहे. हे उघड सत्य असतांना प्रशासन केवळ कोरोनाचे रूग्ण वाढू लागले की, लॉकडाऊन हा एकमेव पर्याय म्हणून त्या महामारीवर उपचार करत असतील तर कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर हातावर पोट असणार्‍या ५० टक्क्यापेक्षा जास्त देशवासियांनी नेमके खायचे काय? हा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही आणि जेंव्हा पोटाचा प्रश्‍न उपस्थित होईल तेंव्हा व्यवस्थेला पळता भुई झाल्याशिवाय राहणार नाही. देशातल्या ५ रूग्णापैकी तीन रूग्ण हे महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याचे सांगण्यात येते आणि यालाच जबाबदार राज्य शासन असल्याचेही सांगण्यात येते. कोरोना महामारीसारख्या संसर्ग पसरणार्‍या आजारावर आरोप प्रत्यारोप करून


राजकारण करण्याचं पाप
राज्यकर्त्यांकडून होत असेल मग ते केंद्र असो की राज्य असो हे पाप म्हणजे त्या जनतेवरचा अन्याय म्हणावा लागेल. केवळ केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कर्तबगार पंतप्रधानांचं देशात अधिराज्य आहे आणि त्याच पंतप्रधानांच्या पक्षाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून जर केंद्र सरकार कोरोना सारख्या संसर्ग पसरवणार्‍या आजाराला आटकाव करण्यात मदत करण्यापेक्षा कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाबाबत स्थानिक सरकारला अडचणीत आणण्याचा धंदा करून कोरोना रोखण्यासाठी कुठल्याही स्थितीत लॉकडाऊन पर्याय समोर मांडत असेेल तर हा जनतेवरचा केंद्राने केलेला अप्रत्यक्ष अन्याय आहे. केंद्र सरकारचा त्यामागचा शुद्ध हेतू हा केवळ सर्वसामान्य माणुस हा लॉकडाऊनला कंटाळलेला आहे, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसाचे उद्योग-व्यवसाय उद्धवस्त होतात, त्याच्या हाताला काम मिळत नाही, परिणामी त्याच्या घरात चुल पेटत नाही मग अशावेळी स्थानिक सरकार बदनाम करायचे आणि त्या आडून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची या भूमिकेत जर भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व काम करत असेल तर ते महाराष्ट्रातील जनतेचं दुर्दैवं असेल. गेल्या चौदा-पंधरा महिन्यापासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या भाजपाने कोरोना रोखण्यासाठी सरकारला नेमकी काय मदत केली? या प्रश्‍नाचं उत्तर शोधूनही सापडणार नाही. अशा वेळी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच पर्याय हा अट्टहास धरणं आता सोडून द्यायला हवं. कोरोना नक्कीच जीवघेणा आहे परंतू

लॉकडाऊन हा विध्वंसक
आहे याची जाणीव आता राज्यातील राज्यकर्त्यांनाही व्हायला हवी. गेल्या महिनाभराच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन सुरू केलं आहे. परंतू गेल्या सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे राज्यातल्या प्रत्येक गावांमध्ये आणि शहरांमध्ये जो विध्वंस झाला आणि त्यातून सर्वसामान्यांची जी आर्थिककोंडी झाली ती आजपावेत आहे. अशास्थितीत पुन्हा दहा दिवसाचे आणि महिनाभराचे लॉकडाऊन सर्वसामान्य माणसांना माणसात आणणारे नव्हे तर माणसाला माणसातून उठवणारे ठरणार आहे. कोरोना संसर्ग हा देशाला आणि राज्याला नवा प्रादुर्भाव असला तरी या पुर्वीही अशा महामारीने देशाला आणि महाराष्ट्राला ग्रासले होते. त्यावेळीही अनेकांचे जीव गेले होते. परंतू त्यातून तुम्ही-आम्ही सावरलोच. तत्कालीन महामारींना सामोरे गेलोच, प्लेग, स्वाईन फ्ल्यु, पटकी यासारखे रोग येवूनही गेले. पोलीओ सारखा आजार गेल्या कित्येक वर्षापासून आजपावेत आहे, क्षयरोग, एडस सारखे समुह संसर्ग पसरणारे नसले तरी ते रोग आहेतच. त्याच्याशीही दोन हात करण्याचं काम आजही देशात आणि राज्यात तुमच्या आमच्याकडून केलं जातयं. अशा वेळी कोरोना नेमका कधी जाईल? याची वाट बघण्यापेक्षा त्याच्यासोबत लढत आता पुढं जावं लागणार आहे. कोरोनामुळे घरात बसून राहणं अथवा लॉकडाऊन करून लोकांना घरात बसवून ठेवणं हे देशाला आणि त्या देशातील सर्वसामान्य माणसाच्या घराला परवडणारं नाही. या उलट कोरोनाबाबत शंका कुशंका निर्माण होतात. राजकीय पक्षांच्या जाहिरसभा, मोठ-मोठ्या नेत्यांच्या परिवारातले लग्न अथवा अन्य काही गोष्टी जेंव्हा गर्दीत दिसून येतात तेंव्हा तिथं कोरोना विध्वंस का करत नाही? हा प्रश्‍न उपस्थित केला जातो तेंव्हा त्यावर कोणालाच उत्तर देता येत नाही. त्यामुळे

कोरोनाबाबत संशय कल्लोळ
निर्माण होतो आणि हा संशयकल्लोळ निर्माण होणे सहाजीक आहे. कोरोना ठाम कशाने जातो हे अद्याप सांगणेही कठीण होवून बसले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छाती ठोकपणे भारताने कोरोनावर लस बनवली असे सांगितले. लसीकरण मोहिमही उत्साहात सुरू आहे. लोकही लस घेत आहेत परंतू गेल्या महिनाभराच्या कालखंडामध्ये कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. २८ ते ३८ दिवसाच्या कालखंडामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढते आणि त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही असे सांगितले जाते. परंतू लस घेतलेल्यांचा हा कालखंड उलटून गेल्यानंतरही संबंधिताला कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाबत संशय कल्लोळ उघडपणे होत आहे. ८ वर्षापूर्वी सब टीव्हीवर लापतागंज नावाची मालिका सुरू होती. त्या मालिकेमधील एका एपिसोडमध्ये अज्ञात परदेशी रोगाचा उल्लेख करून कोरोनाबाबत जे लक्षण आहेत तेच लक्षण दाखवले होते आणि त्यावर उपाय मास्क लावणे हाच सांगितला होता आणि तब्बल आठ वर्षानंतर तिच परिस्थिती जगात आणि देशात निर्माण होते हा योगा योग असू शकतो का? असा प्रश्‍न सोशल मिडियाच्या माध्यमातून विचारला जातो. आज मित्तीला लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही असे उघडपणे लोकांकडून सांगितले जाते.

तरीही बीडमध्ये लॉकडाऊन
ची घोषणा करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या वाढल्या. दोन हजारापेक्षा जास्त चाचण्या घेतल्यानंतर २०० ते २५० कोरोना बाधित रूग्ण आढळून येवू लागले. त्यामुळे बीड जिल्हा प्रशासनाने दहा दिवसाचे लॉकडाऊन केले. परंतू या दहा दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये बीडसारख्या ऊसतोड कामगाराच्या जिल्ह्यात हातावर पोट असणारे मागास असलेल्या जिल्ह्यात दहा दिवसाचे लॉकडाऊन परवडणारे आहे का? हा प्रश्‍न जेंव्हा उपस्थित होतो तेंव्हा लॉकडाऊनला विरोध करत त्या प्रश्‍नाचं उत्तर दिलं जातं. कारण गेल्यावर्षी पाच-सहा महिन्याच्या कालखंडामध्ये लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांना जो त्रास सहन करावा लागला. घरामध्ये ज्या पद्धतीने रहावे लागले तो अनुभव त्यांच्यासाठी मरणादायी होता. त्या स्थितीतही पुन्हा लॉकडाऊनची मानसिकता आज नक्कीच नाही. लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही.
आता कोरोनाला सोबत घेवून जगावं लागेल
गेल्या वर्ष दीडवर्षाचा कोरोनाचा अनुभव पाहिला तर कोरोना हा समुह संसर्ग पसरवणारा रोग आहे. सर्दी, खोकला, धाप लागणे, ताप येणे असे प्रकार घडल्यानंतर त्यावर तात्काळ उपचार केला तर तो कमीत कमी पाच अन् जास्तीत जास्त पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये बरा होतो. डॉक्टरांच्या मते हाच कोरोना घशाच्याखाली गेला अन् त्याने फुफ्फुसावर हल्ला केला तर मग मात्र हा जीवघेणा ठरतो आणि यामध्ये रूग्णाचा मृत्यूही होवू शकतो. आजपर्यंत जिल्ह्यात आणि राज्यात जेवढे काही कोरोनाचे मृत्यू झाले आहे त्यामध्ये ५५ वर्षापुढच्या वृद्ध रूग्णांचे मृत्यू मोठ्या प्रमाणात आहेत. याचाच अर्थ ज्या व्यक्तीमध्ये प्रतिकार शक्ती जास्त आहे तो व्यक्ती कोरोनाला सोबत घेवून त्याच्याशी संघर्ष करत जगू शकतो. आता ती मानसिकता ठेवून कोरोना होणार नाही याची दक्षता आणि उपाय योजना बाळगुन कोरोना सोबत जगावं लागणार आहे. तो आजच जाईल तो आणखी किती दिवस राहिल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा विचार व्यवस्थेने आता सोडायला हवा. या व्यतिरीक्त सर्वकाही सुरळीत ठेवत कोरोनाशी लढाई कशी करता येईल याचा अभ्यास व्यवस्थेबरोबर जानकाराने करून

बुडते हे जन, न देखे डोळा
म्हणूनी येतो कळवळा अस समजून व्यवस्थेसह लोकांची अर्थव्यवस्था बुडणार नाही, हातावर पोट असणार्‍यांची रोज चुल पेटेल, छोट्यामोठ्या व्यावसायिकांना उद्योग, व्यवसायात घाटा येणार नाही, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांना रोजगार मिळेल या अनुषंगाने कोरोना बाबतच्या उपाय योजना आता व्यवस्थेने करायला हव्यात. कोरोनासारख्या महामारीमध्ये पक्षीय संघटनीक राजकारण न करता कोरोनाला हद्दपार करण्या हेतू समाजकारण हाती घ्यायला हवे. लॉकडाऊनची आणिबाणी लादून लोकांच्या डोळ्यात पाणी आणने आता बंद करायला हवे.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...