रिपोर्टरची भूमिका
बीड (रिपोर्टर):- आधीच्या चार ते पाच महिन्यांच्या लॉकडाऊनने आर्थिक प्रपंच उद्ध्वस्त केल्याने सर्वसामान्यांसह छोटे-मोठे उद्योग व्यवसायिक लॉकडाऊनला प्रचंड विरोध करत असून आता बस्स झालं, लॉकडाऊनची ही कटकट धुलीवंदनानंतर बंद करा, अशा स्पष्ट प्रतिक्रिया जिल्हाभरातून सर्वसामान्यांनी रिपोर्टरसमोर व्यक्त केल्या.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी दहा दिवसांचे लॉकडाऊन केले. या लॉकडाऊनला जिल्हाभरातून प्रचंड विरोध होत आहे. आधीच्या चार ते पाच महिन्यांच्या लॉकडाऊनने सर्वसामान्यांचे आर्थिक प्रपंच उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनची कटकट नको, असे म्हणत आज जिल्हाभरातून अनेकांनी रिपोर्टरशी संवाद साधला. आमच्या भावना जिल्हाधिकार्यांसमोर मांडा, म्हणत अनेकांनी लॉकडाऊनचे दुरगामी परिणाम कसे होतात हे आपबितीतून सांगितले. म्हणून आम्ही जिल्हाधिकार्यांना आवाहन करत आहोत, धुलीवंदनानंतर बीड जिल्ह्यातलं लॉकडाऊन शिथील करा, ज्या भागात जास्त रुग्ण आढळतात ते भाग कंटेनमेंट झोन करून तिथे काटेकोर उपाययोजना करा.