हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता
दिल्ली/मुंबई (रिपोर्टर) पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करत प्रचारसभा, रॅल्या घेऊन भारतीय जनता पार्टीला दणदणीत विजय मिळवून दिला आहे तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता उखडून फेकण्यात काँग्रेसला प्रचंड यश प्राप्त झालं आहे. गेल्या दोन दिवसांच्या तीन महत्वाच्या निवडणूक निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्ली आणि हिमाचलमध्ये भाजपाची सत्ता राखता आली नाही. गुजरातमध्ये मात्र ती राखता आली आहे.
अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून यायला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच भाजपा याठिकाणी आघाडी घेत राहिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आपची जेवढी चर्चा झाली तेवढे यश गुजरात निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला मिळाले नाही. तर काँग्रेस या निवडणुकीमध्ये पार घसरून गेल्याचे चित्र पहावयास मिलत आहे. या निवडणुकीमध्ये 182 जागांपैकी भाजपाला 158, काँग्रेसला 16, आपला 5 तर इतर 3 जागांवर आघाडी घेऊन आहेत. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपासोबत काट्याची टक्करीत होती. या वेळेस मात्र काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. दुसरीकडे हिमाचल प्रदेामध्ये भाजपाची सत्ता असताना विधानसभेचे निकाल मात्र काँग्रेसच्या बाजुने आले आहेत. हिमाचलच्या जनतेने भाजपाला पुर्णत: नाकारल्याचे दिसून येत आहे. हिमाचलमध्ये 68 जागांपैकी काँग्रेसला 40, भाजपाला 25 तर इतर 3 जागांवर आघाडी घेऊन राहिले आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार निर्विवादितपणे स्थापन होईल, यामध्ये तिळमात्र शंका नसतानाच भाजप सत्ता स्थापनेसाठी त्याठिकाणीही कटशहा-कटाचे राजकारण करू पाहत असल्याने काँग्रेस आपल्या उमेदवारांना सुरक्षितस्थळी हलवणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.