Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- सुईया टोचण्याच्या उद्योगात राज्यवादाची लस

अग्रलेख- सुईया टोचण्याच्या उद्योगात राज्यवादाची लस

गणेश सावंत
शेतात काय पिकतय यापेक्षा बाजारात काय विकतय हे ज्या उद्योग-व्यवसाय करणार्‍या धंदेवाईक माणसाच्या लक्षात येते तेव्हा तो माणूस आपल्या उद्योग धंद्यात यशस्वी होत अदानी, अंबानी होतो. ज्या व्यक्तीला हे लक्षात येत नाही तो आडाणी. हे आजपर्यंत लक्षात येऊन चुकलं आहे. राजकारणाच्या धंद्यात आजपर्यंत समाजकारणाला अधिक महत्व दिलं जायचं. लोकांच्या मुलभूत गरजांकडे लक्ष केेंद्रित केलं जायचं. सत्ता कोणाचीही असो, अथवा सत्तेत असोत किंवा विरोधात असोत या आधीचे लोक, नेते, नेतृत्व करणारे लोकांच्या गरजा भागवण्याच्या फंद्यात पडायचे मात्र २०१४ नंतर या देशाचं राजकारण बदललं. राजकारणाचा अर्थ बदलला, सत्ता ही केवळ स्वहित जपण्यासाठी, अर्थकारण जमवण्यासाठीच आहे, असं आजच्या देशातील राज्यकर्त्यांना वाटू लागलं आणि तेथूनच लोकांच्या मुलभूत गरजांपेक्षा अखंड भारतात आपली सत्ता कशी असेल याकडे अधिक लक्ष देण्यात येऊ लागले. मग देशातील लोकांचे प्रश्‍न काय? त्यांच्या गरजा काय?  हे न पाहता लोकांना मुख्य विषयाकडून इतरत्र डायवर्ड करण्याहेतु उद्योग सुरू झाले मग ते जात-पात, धर्म-पंथाचे असतील, दिखाऊ देशभक्तीचे असतील, टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे असतील, दिवे पाझळण्याचे असतील, हे उद्योग तेजीत आले अन् चिंध्या पांघरुण सोनं विकणार्‍यांना इथं महत्व राहिलं नाही परंतु सोनं पाघांघरुण चिंद्या विकणार्‍यांना इथं परममहत्व प्राप्त झालं. ते केवळ आणि केवळ देशातल्या भाजप सरकारच्या राजकीय धंदेवाईकपणामुळे हे अत्यंत जबाबदारीने आम्ही म्हणतोय. शेतात काय पिकतय यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बाजारात काय विकतय याला अधिक महत्व देत सर्वप्रथम लोकांना अडचणीत आणायचे आणि नंतर ती अडचण आम्हीच सोडवणार, असे आश्‍वासन द्यायचे हे उद्योग सुरू केले. त्यातलाच
नवा उद्योग हा 
मोफत लसीचा
म्हणावा लागेल. बिहार हे राज्य अठराविश्‍व दारिद्रय असलेलं राज्य. जिथं सामाजिक, राजकीय, वैचारिक धोरण राबवलं जातय की नाही, हा सातत्याने वर्षानुवर्षे पडलेला प्रश्‍न. म्हणूनच पोट असलेले लोक पोटापाण्यासाठी बिहारच्या बाहेर अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. कोरोनाच्या कालखंडात अचानक भाजपाच्या देशातील सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली अन् परराज्यात अडकलेल्या हजारो लाखो बिहारी बांधवांना आपल्या प्रांतात जाण्यासाठी पायपिटा करावा लागला. हे उभ्या देशाने नव्हे तर जगाने पाहितले. या पायपिटात अनेकांचे मृत्यू झाले, अनेकांचे हाल हाल होऊन कित्येक दिवस उघड्यावर, रस्त्यावर अन्न-पाण्यावाचून त्यांना दिवस काढावे लागले. त्यामुळे अचानक घोषीत केलेलं लॉकडाऊन हे बिहारी लोकांच्या तणा-मनात घर करून बसले. त्यात बिहार विधानसभेची निवडणूक घोषीत झाली आणि भाजपाला कुठल्याही स्थितीत या राज्यात आपली सत्ता असावी या हेतु राजकारण करणे भाग पडले आणि तिथे लोकांच्या मुलभूत गरजांपेक्षा लोकांची मानसिकता ओळखत भाजपाने इथेही धंदेवाईकपणा करून सरळ सरळ मोफत लस देण्याची घोेषणा केली नव्हे नव्हे तर आपल्या वचननाम्यामध्येही ते स्पष्टपणे सांगितले. या घोषणेवरून भाजपाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बिहार हिंदुस्तानचा भाग मग इतर राज्य पाकिस्तान बलुचीस्तानचे भाग आहेत का? असा सवालही उपस्थित केला गेला. भाजपाचे हे उद्योग नवे नाहीत, लोकांना पोटभर अन्न मिळतय का याचं त्यांना देणंघेणं नाही. स्वच्छ पाणी पिण्यास आहे का, बेरोजगारांना नोकर्‍या आहेत का, महिला सुरक्षित आहेत का? चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळते का? किती लोकांना घरे आहेत? माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात  किती खेडेगावांमध्ये आजही वीजपुरवठा नाही, नळ कनेक्शन नाही, या विषयी ब्र शब्द न काढता भाजपाने बिहारच्या निवडणुकीत
फुकट सुया
टोचण्याचा जो उद्योग केला तो त्यांच्या धंदेवाईकपणाचा एक भाग आहे. नक्कीच निवडणूक जिंकण्यासाठी अटकेपारचे उद्योग करावे लागतात आणि ते करायलाही हवेत, परंतु भाजपाकडून जे उद्योग केले जातात त्या उद्योगातून एकतर जात-पात, धर्म-पंथांमध्ये तेढ निर्माण होते अनेक वेळा प्रांतवाद उफळून येतो. हे या देशासाठी आणि देशातील एकात्मतेसाठी सातत्याने धोकादायक ठरलेले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याबाबत वक्तव्य केल्याचे आम्हाला आंवते, त्याबरोबरच बिहारच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी फुकट सुया टोचण्याचे उद्योग केल्याचेही दिसून आलेले आहे. कोरोनासारख्या महामारीने देशाला नव्हे तर अवघ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. गेल्या सहा-सात महिन्यांच्या कालखंडात यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. आजही लस सापडली की नाही यावर ठोस उत्तर मिळून येत नाही. सापडली…सापडली… असे वाटत असतानाच पुन्हा त्या लसीचे नाव समोर येत नाही. त्यामुळे देशभरातील जनता या कोरोनानो दहशतीच्या सावटाखाली आहे आणि याच दहशतीच्या वातावरणामध्ये देश चालवणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार नेत्यांनी एका राज्याला मोफत लस द्यायची घोषणा करायची आणि दुसर्‍या राज्याकडे ढुंकूनही पहायचे नाही अथवा ब्र शब्दही काढायचे नाही, अशा वेळी अन्य देशवासियांच्या मनात भीतीचे वादळ उठणे साहजिक आहे.
हिंदुस्तान हा 
आजाग्र देश 
आहे. या देशाची लोकसंख्या १३० कोटींपेक्षा अधिक आहे. या देशासाठी आणि देशातील १३० कोटी लोकांसाठी जेव्हा लस टोचण्याची वेळ येईल तेव्हा रोज किती लोकांना लस टोचण्याची क्षमता सरकारमध्ये असेल याचा अभ्यास केला अथवा विचार केला तर अंक गणिताचीही दमछाक होईल. ज्येष्ठ पत्रकार गिरीष कुबेर यांनी आपल्या एका लेखात मोफत लसीचे गणित मांडले आहे. ते म्हणतात, जर आपण असे ग्रहीत धरले, दिवसागणिक २५ लाख लोकांना ही लस दिली गेली तर चार दिवसात १ कोटी लोकांना ही लस मिळेल. मग १३० कोटी लोकांना लस देण्यासाठी ५२० दिवस लागतील. याचाच अर्थ सव्वा वर्ष सुया टोचण्यात जाणार आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते ही जी कुठली लस येईल तिचा एक डोस घेऊन भागणार नाही तर दोन डोस घ्यावे लागणार आहेत. बिहारमध्ये ही लस मोफत दिली जाणार असेल आणि इतर राज्यात ती विक्री होणार असेल तर ही लस घेण्यासाठी कशी मारामार होईल याचा विचार न केलेला बरा. परंतु याचा विचार केेंद्र सरकारला करावाच लागेल. इथंही भाजपाने लोकांच्या या मुलभूत प्रश्‍नांकडे आणि कोरोना लसीच्या निकडीकडे न पाहता धंदेवाईकपणा सुरू ठेवला तर स्वत:चा जीव वाचवण्याइरादे देशात जी आराजकता माजेल ती पराकोटीची असेल. म्हणूनच केंद्रातल्या सरकारने सुईया टोचण्याच्या उद्योगात राज्यवादाच्या रोगाची उत्पत्ती करू नये. माणसाला माणूस म्हणून पाहण्याचे धोरण आखत राजकारणाबरोबर समाजकारणाला प्रथम प्राधान्य द्यावे. देशातल्या जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेता अन्न-वस्त्र-निवारा, शिक्षण आणि गेल्या सहा महिन्यांच्या कालखंडात बेसुमार वाढलेली सुशिक्षित बेरोजगारी पाहता लोकांच्या हाताला काम आणि पोटाला भाकर कशी मिळेल ते उद्योग केले तर ते अधिक बरे होईल. लॉडकडाऊनमधील अवघ्या देशातील असंघटीत अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला मात्र संघटीत अर्थव्यवस्थेला तो फटका बसला नसल्याचे अंबाणींच्या जीयोला झालेला फायदा पाहता लक्षात येते. म्हणूनच देशातील भाजप सरकारने अदाणी, अंबाणींचे पोटापाण्याचे प्रश्‍न पाहण्यापेक्षा गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या पोटापाण्याचे प्रश्‍न हाती घेत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात धन्यता मानावी. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!