बीड (रिपोर्टर):- बीड, गेवराई, माजलगाव या तालुक्यातून आजही अवैधरित्या वाळुचा उपसा सुरुच आहे. वाळु उपसणार्यांविरोधात महसूल विभाग कारवाई करू लागलं. गेल्या काही दिवसांपासून बीड तहसीलदार वमने यांनी कारवाईचा धडाकाच सुरू केला. आज पहाटे त्यांनी कुक्कडगाव नदी येथे मिनी टिप्पर पकडे. काल त्यांनी गुंधा परिसरामध्ये वाळु साठ्यावर धाड टाकली होती. तहसीलदारांच्या या कारवाईमुळे वाळु माफियात एकच खळबळ उडाली.
राक्षसभुवन येथील तळ्याच्या ठिकाणी वाळु उपसली जात असल्याची माहिती तहसीलदार शिरीष वमने यांना झाल्यानंतर ते व नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, वाहनचालक भारत मुळुक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी काही लोक वाळु धूत असताना आढळून आले. या वेळी मिनी टिप्पर तहसीलदारांनी ताब्यात घेतले. कालच तहसीलदारांनी गुंदा परिसरातही अवैधरित्या साठा केलेल्या वाळुवरही छापा मारून कारवाई केली होती. तोच आज पहाटे कुक्कडगाव शिवारातील राक्षसभुवन परिसरात कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील ही कारवाई तहसीलदार वमने, सुरेंद्र डोके, अरुण गुरसाळी यांनी केली.