गेवराई (रिपोर्टर):- जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी रात्री निर्बंध लादल्याने व्यापार्यात संताप व्यक्त केला जात आहे. आज गेवराई शहरातील व्यापार्यांनी एकत्रीत येत तहसील कार्यालयासमोर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. लॉकडाऊन हटाव, व्यापारी बचाव असे म्हणत व्यापार्यांनी आपला निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

दहा दिवसांचे लॉकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्रीपासून कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधामुळे व्यापारी चांगलाच अडचणीत सापडला. कोरोनाच्या कार्यकाळात व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने व्यापारी संकटात असताना पुन्हा हे जाचक नियम लादल्याने शहरातील अनेक व्यापार्यांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. लॉकडाऊन हटाव, व्यापारी बचाव असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. आज सर्व दुकाना बंद ठेवण्याचे आदेश असले तरी अनेक व्यापार्यांनी दुकाने सुरू ठेवले होते. एकूणच निर्बंधाच्या विरोधात सर्वच व्यापार्यात संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे.