Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीडकामगार संघटनांचा २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप

कामगार संघटनांचा २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप

beed reporter


बीड (रिपोर्टर)- भाजप राजवटीने कामगार कर्मचारी आणि शेतकर्‍यांना गंभीर आर्थिक संकटात ढकलले आहे. विविध क्षेत्रात असंघटीत कामगार, मजूर आणि किरकोळ व्यवसाय करणारे देशोधडीला लागले आहेत. त्यातच केंद्र सरकार काळे कायदे लागू करून अदाणी, अंबाणी, शहा यासारख्या मुठभर भांडवली कुटुंबाची संपत्ती दिवसेंदिवस कोट्यवधींनी वाढवत आहेत. अशा काळे कायदे आणि खासगीकरणाच्या विरोधात २६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय कामगार संघटना आणि स्वतंत्र कामगार संघटनेच्या वतीने देशव्यापी ंसंप पुकारण्यात आला आहे. या संपाची माहिती देण्यासाठी आज कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या वेळी बोलताना कम्युनिस्ट पक्षाचे नामदेव चव्हाण म्हणाले की, मोदी सरकारने काळे कायदे करून कारखानदारांना मोकळे रान आणि कामगारांवर बेरोजगारी लादली आहे. शेतीविषयक कायद्यामुळे देशभरातील शेतकरी या कायद्याविरोधात असल्याने भाजपने आपल्या बहुमताच्या जोरावर संसदीय प्रणालीचे संकेत अन् क्रम बदलून लोकसभेत आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेतले आहे. यामध्ये डॉ. स्वामीनाथन आयोग नाही, आधारभूत किमती अधांतरी आणि बाजार समित्यांचे अस्तित्व तकलादू ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापारी संप पुकारला असून यामध्ये उत्पन्न कर भरण्यास पात्र नसणार्‍या प्रत्येक कुटुंबास दरमहा ७५०० रुपयांचे अनुदान द्यावे, प्रत्येक गरजू व्यक्तीस १० किलो धान्य मोफत द्यावे, मनरेगा अंतर्गत प्रत्येक वर्षात २०० दिवस काम आणि ५०० रुपये मजुरी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात असल्याचे पत्रकार परिषदेत सांगगण्यात आले. या वेळी कॉ. नामदेव चव्हाण, राजकुमार घायाळ, अशोक थोरात, डी.बी. बोरडे, बबनराव वडमारे, शेरजमा पठाण, नवनाथराव नागरगोजे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!