अंबाजोगाईतून पळवलेली कार नांदेडमध्ये मिळाली
बीड (रिपोर्टर) अमली पदार्थांमुळे तरुण पिढीच्या आयुष्याची कशी धूळधाण होते, यावर वेध घेणारा ‘उडता पंजाब’ चित्रपट अलीकडे गाजला होता. कॅनडात वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका तरुणीचा नशेखोर पती पंजाबमधून नांदेडमार्गे अंबाजोगाईत पोहोचला आणि दरवाजाचे लॉक तोडून कार घेऊन पळाला. नांदेडपोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून चोरीच्या कारसह अंबाजोगाई पोलिसांच्या स्वाधीन केले. अमली पदार्थांच्या व्यसनाचे भयाण वास्तव यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.
लखवीरसिंग गुरमेजसिंग (26, रा. भैल दानावाला, 23 फतेहबाद, जि. तरतारन, पंजाब) असे त्या आरोपीचे नाव आहे. 29 डिसेंबर रोजी पहाटे श्रीकांत संतराम सुवर्णकार (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) या शिक्षकाची 75 हजार रुपयांची कार (एमएच 23 ई- 6840) लंपास झाली होती. याबाबत 1 जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, श्रीकांत सुवर्णकार यांनी कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कार कोठे आढळल्यास संपर्क करावा, असे आवाहन केले होते. ही कार नांदेडमध्ये असल्याची माहिती सुवर्णकार यांना मिळाली. त्यांनी अंबाजोगाई शहर पोलिसांना याची माहिती दिली. पो. नि. बाळासाहेब पवार व हवालदार किसन घोळवे यांनी तातडीने नांदेड पोलिसांशी संपर्क करून कार ताब्यात घेण्याची विनंती केली. तेथील पोलिसांनी कारसह संशयित लखबीरसिंग गुरमेजसिंगला ताब्यात घेतले. त्यानंतर अंबाजोगाई पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी लखबीरसिंगची दोन दिवस पोलिस कोठडी घेऊन चौकशी केली. त्याची गुन्हे पार्श्वभूमी नाही. अंबाजोगाई शहर ठाण्यात नव्या वर्षात नोंद झालेल्या कारचोरीच्या गुन्ह्यात लखबीरसिंगला पहिल्यांदा अटक झाल्याची माहिती हवालदार किसन घोळवे यांनी दिली. लखबीरसिंगची पत्नी कॅनडात वैद्यकीय शिक्षण घेते. त्याचे आईवडील मोठे जमीनदार आहेत. मात्र, लखबीरसिंगला चरस, गांजा यांसारख्या घातक अमली पदार्थांचे व्यसन जडले. त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठविण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. त्यामुळे तो नांदेडला पळून आला. रेल्वेत बसून तो पूर्णा, परळी येथे पोहोचला व तेथून अंबाजोगाईला आला. दरवाजा तोडून कार चोरी करत त्याने पुन्हा नांंदेड गाठले.