Tuesday, May 11, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख -निर्लज्जम्

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता असावी, ऑक्सिजनचा तुटवडा असावा, छे म्हणण्यापेक्षा थू म्हणण्याची वेळ आलीय.
निर्लज्जम्
गणेश सावंत
मो. नं. 9422742810
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम महाराष्ट्र भोगतोय, राज्य सरकारसह राज्यातला प्रत्येक व्यक्ती या अद़ृश्य शत्रुशी लढा देतोय. लपून-छपून वार करणारा कोरोना काही ठिकाणी विजय प्राप्त करतो परंतु काही ठिकाणी त्याला रोखण्यातही महाराष्ट्रातला प्रत्येक माणुस यशस्वी होतोय. भय ही संकल्पना महाराष्ट्राच्या मातीत नाही, आलेल्या संकटावर निर्भयपणे मात करणे आणि त्यावर विजय मिळवणे हेच ध्येय महाराष्ट्राच्या मातीचे असते. नैसर्गिक संकट असो वा मानवी संकट असो त्या संकटांना सामोरे जावून पुन्हा फिनिक्स पक्ष्या प्रमाणे उभारी घेणे हे महाराष्ट्राला नवे नाही. रोज महाराष्ट्राच्या गावागावांत कोरोनामुळे सरणे पेटत आहेत. बाधितांचे जीव वरच्यावरी आणि खालच्या खाली होत आहेत. अशा वेळी आरोग्य व्यवस्था ही सक्षम असायला हवी, इथे आरोग्य व्यवस्था सक्षम आहे, परंतु औषधाचा तुटवडा भयंकर आहे. कोरोना हे जागतिक संकट आणि त्याविरुद्ध परखड लढा महाराष्ट्राचा माणुस आणि सरकार देतोय. परंतु राजकीय विषवल्लीतून महाराष्ट्राच्या माणसांना थेट सरणावर नेण्याचं कारस्थान कोण करतय?

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

महाराष्ट्राची
माती निर्मनुष्य

करण्याचा घाट कोण घालतय? महाराष्ट्रातल्या माणसांना योग्य उपचार मिळू नयेत यासाठी धडपड कोण करतय, कोरोना वाढला तो केवळ ठाकरे सरकारमुळेच वाढला ही आवई उठवण्यासाठी औषध पुरवठा महाराष्ट्राला होणार नाही ही धडपड नेकी कोणाची? महाराष्ट्राला रेमडिसीवीर देऊ नये हे कंपनीला दिलेले आदेश नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होतात तेव्हा या प्रश्नाचं राजकारण म्हणून साधंसुधं उत्तर दिलं जातं. काल नवाब मलिकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला. रेमडिसीवीर महाराष्ट्राला देऊ नयेत, असे संबंधित कंपन्यांना त्यांनी आदेश दिल्याचे मलिकांनी म्हटले. मलिकांनी महाराष्ट्राच्या भाषेत तंबीही दिली. त्यावर ठाकरेंनी निर्लज्जपणा करू नये, अशी टोकाची भाषा केंद्रातील मंत्री पियुष गोयल यांनी केली. ठाकरेंचा निर्लज्जपणा तो काय, रेमडिसीवीर नाही, लसीचा तुटवडा, बेड नाही, ऑक्सिजन नाही हे सत्य महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर उघडपणे सांगतात आणि केंद्राकडे मदत मागतात, हा ठाकरेंचा निर्लज्जपणा आहे काय? महाराष्ट्रामध्ये कोरोनाने जो हाहाकार उडवून दिला आहे, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांसह महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे ज्या बाधितांचे मृत्यू होतात, त्यांचे जळत असलेले सरण आणि शांत झालेली राख हे निर्लज्जपणाचे पुरावे आहेत काय?किती हा किळसवाण्या राजकारणाचा अतिरेक भारतीय जनता पार्टीला अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना कोरोनावर मात करण्यासाठी लोकांना आधार द्यायचा आहे की, अस्वस्थ आणि त्रस्त झालेल्या महाराष्ट्राच्य नागरिकांना भेडवत विद्यमान सरकारला घेर्‍यात घ्यायचं आहे. हेच समजायला मार्ग नाही. अरे हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने कधी काळी हिमालयाची मदत केली. त्या महाराष्ट्राचे


सपुत दिल्ली दरबारी
पाणी भरण्यात धन्यता

मानतात. तेव्हा सह्याद्रीलाही आपल्या लेच्यापेच्या सपुतांबद्दल किव येत असेल. आज महाराष्ट्राचे सपुत म्हणून जे केंद्रात काम करतात ते नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, रावसाहेब दानवे या मंत्र्यांनी ज्या मातीत जन्मलो आहोत त्या मातीला आज कोरोनाने घेरलं आहे. त्या मातीतल्या माणसाला आज कोरोना सरणावर घेऊन जात आहे. हे पाहून थोडंही दु:ख वाटत नसेल. या लोकांचे जीव वाचवावेत म्हणून राजकारण बाजुला सारत राज्य सरकारच्या मदतीला धावावे, असे वाटत नसेल. विरोधी पक्षाचा धर्म हा सत्ताधारी पक्षाला सरळ रेेेषेत आणि इमानदारीने काम करण्यास भाग पाडण्याचा आहे. नुसता विरोध, अनागोंदी, आडवाआडवी करून सरकार जरी अडचणीत येत असेल. परंतु आज त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागत आहे, याचे भान या मंत्र्यांना काम नसावे. अंगाने आणि वजनाने भारदस्त असले म्हणजे कोणाचे वजनदार कर्तृत्व नसते. ईश्वराने ही संधी दिलीय, या संधीचं सोनं करायचं असतं की त्याचं पितळ होत स्वत:चं पित्त खवळून घ्यायचं हे ज्याने त्याने ठरवावं. एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता असावी, ऑक्सिजनचा तुटवडा असावा, छे म्हणण्यापेक्षा थू म्हणण्याची वेळ आलीय. माहिती घ्यायची नाही, केवळ आपला प्रतिस्पर्धी राजकीयदृश्ट्या बदनाम कसा होईल म्हणून मंत्रीच नव्हे तर भाजपाचे पदाधिकारीही बरळतात, बोलतात, आमच्या भगिनी देशाच्या भाजपाचं नेतृत्व करतात आणि तेही बीडला 20 लस आल्याची बोंब ठोकतात आणि पालकमंत्र्यांच्या डोक्यावर खापर फोडतात. अरे काय चाललय हे, दिल्लीत बसलेला तो दिल्लीश्वर महाराष्ट्राची जिकडून-तिकडून नाकेबंदी करतोय, मुस्कटदाबी करतोय आणि तुम्ही त्याच्याकडे पाणी भरताय. शिवरायांच्या महाराष्ट्रातले सपुत आहात. दिल्लीश्वराची गिल्लत धुडकावणार्‍यांची तुमची जमात आणि आज तुम्ही संकटकाळी राजकारण करताय. ठाकरे सरकार चुकत असेल तर त्याला टाळ्यावर आणा परंतु आज माणसं मरतायत, अनेकांचे घरेदारे उद्ध्वस्त होत आहेत. त्यासाठी आरोग्य सेवा कशी पुरेल याकडे लक्ष द्या. आठवा यशवंतराव चव्हाणांना आणि त्या सह्याद्रीला जे दिल्लीश्वर आज कुटनिती आणि राजनिती करत महाराष्ट्राला बदनाम करण्याहेतू रणसिंग फुंकतात त्याच महाराष्ट्राचा

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

सह्याद्री दिल्लीच्या
मदतीला धावला

होता. इ.स. 1965 साली चीनने अखंड हिंदुस्तानावर हल्ला केला, त्यावेळी निधड्या छातीने हाच आमचा सह्याद्रीचा छावा यशवंतराव चव्हाण धावून गेला आणि चीनींना घरचा रस्ता दाखवला. आज त्याच नतृदृष्ट चीनमुळे कोरोनासारखा आजार देशभरात पसरला आहे. अशा वेळी आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. जेव्हा देशाला महाराष्ट्राची गरज असते तेव्हा महाराष्ट्र धावून जातोच, परंतु आता तुमची गरज आहे तर तुम्ही धावून तर या. बरं तुम्हाला यायचं नसेल तर तुमच्या फालतू राजकारणामुळे महाराष्ट्राची नाकेबंदी तरी करू नका. राजकारण करा, आरोप प्रत्यारोप करा, राज्यात कोणाचं सरकार आहे, कोणाला पाडायचं आहे , ते काय करायचे तर करा परंतु महाराष्ट्रातील सामान्य जनतेला मदत होईल, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी काही उपाययोजना असतील तर ते तरी अगोदर करा आणि नंतर निर्लज्जपणावर भाष्य करा. महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आडून जे निर्लज्ज राजकारण भाजपा करतय त्याचा सोक्षमोक्ष आजच लागलाय. ज्या कंपनीकडे इंजेक्शन असताना ती कंपनी महाराष्ट्राला देत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने गुन्हा दाखल केला तर त्याला वाचवण्यासाठी दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात जावून बसतात, हे कशाचे द्योतक आहे. इथे महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातला रुग्ण एका रेमडिसीवीरसाठी मरमर मरत असताना भाजपाच्या कार्यकर्त्याकडे 50 हजार रेमडिसीवीर येतातच कसे? आणि भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत चॅरिटीसाठी आणल्याचे सांगतात. पक्ष हा इलेक्शन कमिशनशी संबंधित असतो, चॅरिटी कमिशनशी नसतो. केवळ महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचा हेतू भाजपाचा आहे, मग निर्लज्जपणा कोणाचा?

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!