बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यात एकाच मतदाराने दोन अथवा तीन मतदारसंघात नावे नोंदवत बोगस मतदान केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संबंधित प्रकरणात जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही वाचवा देश वाचवा’ आंदोलन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये अनेक मतदारांची नावे मतदार यादीत आहेत. हे मतदार दोन्ही ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतात. एकाच ठिकाणी मतदान असावे आणि एकदाच मतदानाचा हक्क बजवावा, असा नियम असताना या नियमाला पायदळी तुडवण्याचे काम केले जात आहे. दोन ठिकाणी नावे असलेले 61 हजार 270 चेहरे समोर आले आहेत. यामध्ये गेवराई 8818, आष्टी 8857, परळी 9850, माजलगाव 10461, केज 12820 तर बीड तालुक्यात 12820 मतदार समान चेहर्याचे निदर्शनास आले आहेत. याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्याविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशााही वाचवा देश वाचवा’ आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ. गणेश ढवळे, शेख युनुस, शेख मुबीन, शेख मुश्ताक, सय्यद आबेद, मिलिंद सरपते, बलभीम उबाळे, किशकिंदा पांचाळ, प्रेरणा सुर्यवंशी, सय्यद सालेहा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.