बीड (रिपोर्टर) बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर रोज सकाळ-संध्याकाळ हजारो महिला-पुरुष व्यायामासाठी येतात. सर्वसामान्य लोक येथील ओपन जीमचा लाभ घेतात. मात्र ओपन जीमचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने अनेक साहित्य तुटले आहे तर काही मोडून पडले आहे. यामुळे येथे येणार्यांची निराशा होते. येथील ओपन जीम दुरुस्त करण्याची मागणी होत असून स्टेडियमवर स्वच्छता ठेवणेही गरजेचे आहे.
बीड शहरात दोनच स्टेडियम आहेत. जिल्हा स्टेडियमवर नेहमी स्पर्धा असतात. त्यामुळे तेथे लोक व्यायामासाठी जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर रोज हजारो महिला-पुरुष सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी येतात. तेथे स्वच्छता असणे गरजेचे आहे, मात्र स्टेडियमच्या आतील बाजूस प्रचंड घाण आहे. ती स्वच्छ करणे गरजेचे आहे. स्टेडियमच्या दोन बाजुला ओपन जीम आहेत. मात्र दोन्ही जीम नादुरुस्त झाल्या आहेत, काही व्यायामाचे साहित्य मोडले आहेत. जीमचे साहित्य बसवताना दर्जेदार वाळू, खडी, सिमेंट न वापरल्याने ते उखडून पडले आहेत. याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.