Friday, May 7, 2021
No menu items!
Homeसंपादकीयरोखठोक- सह्याद्रीच्या शिखरावर मृतदेहाच्या शिड्याकरून सत्तेचा ध्वज कोण फडकू पहातोय?शीराविना धड लढणारा...

रोखठोक- सह्याद्रीच्या शिखरावर मृतदेहाच्या शिड्याकरून सत्तेचा ध्वज कोण फडकू पहातोय?शीराविना धड लढणारा महाराष्ट्र!

गणेश सावंत -9422742810

मरण हे अटळ आहे. ते सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यू कवटाळणार आहे. परंतू हाच मृत्यू अकाली असेल, अकस्मात असेल अथवा याच मृत्यूला कोणी कारणीभुत असेल तेंव्हा मात्र तो मृत्यू नैसर्गिक नसतो तर तो मृत्यू खून असतो, हत्या असते. तेच खून आणि तीच हत्या सध्या महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे केली जातेय. कोण करतय ही हत्या आणि खून? या प्रश्नाचं सरळ उत्तर इथली व्यवस्था आणि इथले गलिच्छ राजकारण. भंडार्‍यात निष्पाप बालकांचा अक्षरश: कोळसा झाल्यानंतरही इथल्या व्यवस्थेला रूग्णालयातील व्यवस्था अबाधित ठेवण्याची गरज वाटली नाही. त्या लेकरांच्या किंकाळ्यांनी उभ्या महाराष्ट्राचं हृदय हेलावून गेलं, सह्याद्रीही ढसाढसा रडली परंतू महाराष्ट्राच्या सत्ताधार्‍यांना आणि विरोधकांना मगरीचे आश्रु ढाळण्यापेक्षा काही करता आलं नाही. याचंच ज्वलंत उदाहरण काल नाशिकमध्ये दुर्दैवी घटनेवरून पुढं आलं. माणसं मरतायत, सरणं पेटतायत आणि आमचे सत्ताधारी आणि विरोधक सरकार पाडण्यासाठी आणि सरकार अबाधित ठेवण्यासाठी धडपड करतय. नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये काल जो यमाच्या रेड्याने हैदोस घातला अक्षरश: उधळलेल्या या रेड्याने रूग्णालयातल्या बेड ना बेडवर जावून जो धुमाकूळ घातला आणि त्या धुमाकूळात निष्पाप 22 कोरोना बाधित रूग्णांचे मृत्यू झाले. आणि त्याच निमित्त ऑक्सिजनची गळती ठरली. या निष्पाप जिवांच्या मृत्यूला ऑक्सिजनची गळती जबाबदार आहे की बेजबाबदार व्यवस्था? ज्या लोकांनी आपले माणसे गमावली आहेत त्यांच्या दुखांकित आश्रुला ऑक्सिजनची गळती जबाबदार आहे की राजकारण्यांची मस्तवाल मगरूरी? असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले जाणारच. माणसे मरत असतांना, बेडवर तडफडत असतांना महाराष्ट्रात सरकार विरोधात आगडोम उसळणारा विरोधीपक्ष भाजप काय करत होता? हा आमचा नव्हे तर त्या 22 मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांचा सवाल आहे. जेवढी जबाबदारी राज्य सरकारची आहे तेवढीच जबाबदारी नाशिकच्या घटनेमध्ये भाजपाची आहे. कारण हे हॉस्पिटल महा पालिकेच्या ताब्यात आहे आणि तिथली महानगर पालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. परंतू इथं राजकारणापेक्षा लोकांचे जीव कसे वाचले जातील याकडे सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनी लक्ष दिले तर ते महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि माणसासाठी प्राणात्मक ठरेल. इथं रोज सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आरोप प्रत्यारोपाच्या गुळण्या करतात. महाराष्ट्रावरच कोरोना संकट

हे अतिगंभीर आहे. गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. गेल्या महिनाभरापुर्वी अखंड देशभरात रूग्ण संख्या कमी असल्याची बोंब मारत भारतीय जनता पार्टी आणि त्यांची पिलावळ महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मातीला केवळ ठाकरे सरकारमुळे नाव ठेवत होती, जगभरात डांगोरा पिटवत होती. परंतू आजची परिस्थिती पाहिली तर रोज देशामध्ये 3 लाखापेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हाच आकडा 60 तेे 65 हजाराचा आहे. कोरोना कुठला पक्ष बघत नाही, जात पाहत नाही, राज्य पाहत नाही, प्रांत पाहत नाही, स्त्री पाहत नाही की पुरूष पाहत नाही तो त्याचं कर्तव्य इमानदारीने करतो आणि लोकांना बाधित करून सोडतो. परंतू माणसासारखे माणसे असलेले तुम्ही-आम्ही त्या कोरोनाप्रमाणे इमानदारी दाखवणार आहोत का? इमानदारीने व्यवस्थेला मदत करणार आहोत का? किंवा व्यवस्थेतील लोक इमानदारी काम करणार आहेत का? त्या लोकांनी इमानदारी काम केले असते, व्यवस्थेने आपली जबादबारी ओळखली असती तर आज गावागावात मुडदे पडले नसते, लोक सरणावर गेले नसते. महाराष्ट्रामध्ये रोज शेकड्याने लोक मरत आहेत. आजपर्यंत कोरोना या जीवघेण्या विषाणुने माणसे मरत आहेत म्हणून दु:ख व्यक्त केलं जात होतं परंतू आता व्यवस्थेच्या बेजबाबदारपणामुळे माणसे मरतात तेंव्हा हा मृत्यू साधासुधा नाही तर हत्या आणि खूनच आहे असे म्हणावेच लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता समुह संसर्ग आणि त्याला रोखण्याबाबत होत असलेल्या उपाय योजनात घातला जाणारा

राजकीय खोडा

हा महाराष्ट्राच्या माणसांना मृत्यूच्या दारात नेवून ठेवत आहे. राजकारण नक्की करायलं हवं, विरोधकांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे परंतू राजकारण करतांना महाराष्ट्राच्या मातीतला माणुस भरडला जाणार नाही, त्याच्या केसालाही धक्का लागला जाणार नाही याची जाणीव विरोधकांना तर असायलाच हवी. सत्तेच्या मस्तीत खुर्ची उबवणारे सत्ताधारी डोळ्यावर पट्टी बांधून असतात ते दृष्टराष्ट्रासारखे आंधळे तर असतातच नसले तरी ते गांधारी होवून डोळ्यावर पट्टी बांधून बसलेल्या असतात. अशा वेळी विरोधकांनी डोळस होत सत्ताधार्‍यांच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणाला लगाम घालायचा असतो. परंतू इथं महाराष्ट्रात मात्र प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी सत्ताधार्‍यांच्या बेशिस्त आणि बेजबाबदारपणाला लगाम घालण्यापेक्षा ते सरकार कसे पडेल? ते सरकार कसे बदनाम होईल? याकडे अधिक लक्ष देतात. इथं ही त्यांनी लक्ष दिलं, सरकार पाडलं त्याचही देणंघेणं नाही परंतू हे सर्व करत असतांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या नरड्याला नख लावलं जात आहे. नव्हे-नव्हे तर त्यांचे नाक, तोंड दाबून खुदमरून त्यांची हत्या केली जात आहे. हे पाप कुठं फेडणार आहात? हा राजकीय खोडा का? रेमडीसीवर इंजेक्शनपासून अन्य वैद्यकीय सेवांपर्यंत केंद्र सरकारचे राजकीय हस्तक्षेप करून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करतय आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करतय. ती अस्थिरता एक ना एक दिवस देशातल्या भाजपाला अस्थिर करेल.

जळो तुमचं राजकारण

नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या टाकीचा वॉल लिकेज झाला आणि ऑक्सिजनची गळती सुरू झाली. यावेळी डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या बेडवर शेकडो रूग्ण प्राणवायुवर होते. जशीच गळती सुरू झाली तसा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. त्याचवेळी हॉस्पिटलच्या प्रत्येक वार्डावरील बेडवर जे हाल रूग्णांचे सुरू झाले, जी तडफड सुरू झाली त्या तडफडीने सह्याद्रीही हेलावून गेली. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस या घटनेने हादरून गेला. एक नव्हे, दोन नव्हे तर 22 लोकांचा केवळ ऑक्सिजन विना मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नव्हता, बेशिस्त आणि बेर्पवाह व्यवस्थेचा तो बळी होता. भंडार्‍याच्या आगीत ज्या बालकांचा कोळसा झाला त्या कोळशातली धग शांतही होत नसेल तोच नाशिकमध्ये व्यवस्थेने रूग्णांच्या नरड्यावर पाय दिला. मग याला सत्ताधारी जबाबदार की विरोधक जबाबदार? तिथली भाजपाची महानगर पालिका जबाबदार की राज्यातलं ठाकरे सरकार जबाबदार? याचं मरणार्‍यांच्या कुटुंबाला उभ्या महाराष्ट्राला आणि आम्हालाही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त या प्रकरणात दोषी असणार्‍यांना आणि बेजबाबदारपणा असणार्‍यांना तेवढीच मोठी शिक्षा व्हायला हवी. परंतू नाही, महाराष्ट्रात साधी माशीही उडाली आणि ती माशी देवेंद्र फडणवीसांच्या नाकावर जरी बसली तरी राज्य सरकारचा हात म्हणत आरोप करणार्‍या आणि राज्यभर रान उठवणार्‍या भाजपाने नाशिक महापालिका रूग्णालयात घडलेल्या या गंभीर घटनेबाबत शेपटं घातल्यागत प्रतिक्रिया दिली. यात राजकारण करू नका, घटना दुर्दैवी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आणि प्रविण दरेकर यांनी शोक प्रगट करत दु:ख व्यक्त केलं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मी नि:शब्द झालोय असे भावनिक होत पानवलेल्या डोळ्यांनी दु:ख झाल्याचा डांगोरा पिटवला. आम्हाला हे मगरीचे आश्रु नकोयत, अशा घटना घडू नयेत यासाठी काय करत आहात, काय करणार आहात आणि काय केलं? हे महाराष्ट्राला दाखवा. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने कोरोना काळात राजकारण सोडून समाजकारणाची भूमिका घेतली तर ती अधिक बरी होईल. नाशिकच्या

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

त्यादुर्दैवी घटनेतून सत्ताधारीविरोधक बोध घेणार का?

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शन नाही, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, अत्यंत काठावर ऑक्सिजनची आवश्यकता आणि रूग्ण असतांना भारतीय जनता पार्टीने आणि सत्ताधार्‍यांनी राजकारण खेळण्यात मग्न होवू नये. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजकारण कुठे करावे आणि कुठे नाही याचा बोध घ्यायला हवा. माणसे मारून त्यांच्या मृतदेहाच्या शिड्या करत महाराष्ट्राचं मंत्रालय चढु नये, सह्याद्रीच्या शिखरावर मृतदेहाच्या शिड्याकरून सत्तेचा ध्वज फडकू नये. 60 हजारापेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रात रोज आढळून येत असतांना महाराष्ट्राला लसीबरोबर रेमडीसीवर आणि ऑक्सिजनची उपलब्धती करून देण्या ऐवजी पंतप्रधानांनी परवा देशाशी संबोधीत करतांना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असू शकत नाही असं म्हणत जो गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तोही एक गलिच्छ राजकारणाचा भागच. आज 60 हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून येत असतांना लॉकडाऊन हा पर्याय नव्हता तर मग 600 रूग्ण आढळून येवू लागले म्हणून तुम्ही जे गेल्या वर्षी देशाचं लॉकडाऊन केलं तो पर्याय होता का? कोरोनाला हरवण्यासाठी ढोल, ताशे आणि घराघरात पराती वाजवायला लावल्या तो पर्याय होता का? देशवासियांना जे दिवे पाजळायला लावले तो कोरोना वरचा जालीम उपाय हाता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होणारच. केवळ सत्तेसाठी माणसाच्या मृत्यूची वाट पाहत असाल आणि त्यांच्या मृतदेहाच्या सिड्या करून एखाद्या राज्यावर आपल्याच पक्षाचा ध्वज फडकवण्याची मानसिकता करत असाल तर महाराष्ट्राच्या मातीत पडलेला मृतदेहही तुमचा पाय ओढल्याशिवाय राहणार नाही.

शिराविना लढणार्‍या हा धडांचा महाराष्ट्र

इथल्या माणसाला संकटे नवे नाहीत, शौर्याने, धैर्याने धडापासून शीर वेगळं झाल्यानंतरही नुसतं धड लढणारे बाजीप्रभु आठवले की महाराष्ट्राची माती लक्षात येते. तेंव्हाही घरभेद्यांनी आमची माणसे शहीद केली, धारातिर्थ पाडली आणि आताही सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणाच्या घरभेदीपणामुळे आमची माणसे शहीद होत आहेत नव्हे-नव्हे राजकारणामुळे तडफडून मरत आहे हे दुर्दैवं आहे. आज महाराष्ट्र नव्हे तर अखंड देशावर संकट आहे, अशा वेळी राजकारण बाजुला हवं, सर्वांनी एकत्रित येवून महाराष्ट्रातील माणसांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष द्यायला हवं. नाशिकमध्ये घडलेल्या घटनेनंतर राजभरात ऑक्सिजनची परिस्थिती काय? ऑक्सिजन अभावी माणसे मरणार नाहीत यासाठी सत्ताधार्‍यांनी आणि विरोधकांनी एकत्रित येवून प्राणवायु लोकांपर्यंत पोहचायला हवा. आज सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो तुम्ही सुपात आहात सर्वसामान्य जनता जात्यात आहे. परंतू याद राखा शीराविना लढणारा हा धडांचा महाराष्ट्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला (@beedreporter) जॉइन करा

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!