Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनाअकार्यक्षम आरएमओमुळे रुग्णालय मृत्युशय्येवर राठोडांना हाकला, रुग्णांंना ‘सुख’ आणि ‘देव’ पाहू द्या

अकार्यक्षम आरएमओमुळे रुग्णालय मृत्युशय्येवर राठोडांना हाकला, रुग्णांंना ‘सुख’ आणि ‘देव’ पाहू द्या


लोक हंबर्डा फोडतायत, अश्रुंना वाट मोकळी करून देतायत
बीड (रिपोर्टर):- जिल्हा रुग्णालयातल्या कोविड वार्डातील वस्तूस्थिती दाखविणारे अनेक व्हिडिओ काल व्हायरल झाल्यानंतर जिल्हाच नव्हे संपुर्ण महाराष्ट्र हादरून गेला. जिल्हा शल्यचिकित्सकासह निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुखदेव राठोड यांच्या निगरगट्टपणामुळे जिल्हा रुग्णालयातील संपुर्ण व्यवस्था कोलमडून गेली असून राठोड केवळ खुर्ची उबवण्यात आणि भरती प्रक्रियेत हात ओले करण्यात मग्न असल्याचे दिसून येते. त्यांच्या या उद्धट आणि अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे जिल्हा रुग्णलायातील कोविड वार्डात रुग्णांना व्यवस्थीत उपचार मिळत नाहीत. डॉक्टर-कर्मचार्‍यांअभावी रुग्ण मृत्युच्या दारात जात आहेत. याची गंभीर दखल जिल्हाधिकार्‍यांसह पालकंमंत्र्यांनी घेत कर्तव्यदक्ष आरएमओची नियुक्ती करावी.


बीड जिल्हा रुग्णालयाची संपुर्ण जबाबदारी ही आरएमओ डॉ. सुखदेव राठोड यांना देण्यात आलेली आहे. कुठल्या वार्डात डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, कुणाला कुठे नियुक्त करायचे, ऑक्सिजन आहे की नाही, लसीकरण यासह अन्य लोकांच्या जीवन-मरणाचे उपाययोजन हे सुखदेव राठोड यांच्याकडे आहेत. मात्र बीड जिल्हा रुग्णालयाची सध्याची परिस्थिती पाहता डॉ. राठोड यांच्या अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे लोक थेट मरणाच्या दारात जावून पोहचत आहेत. रुग्णांचे नातेवाईक टाहो फोडत आहेत. अश्रूंना वाट करून देत आहेत. वैद्यकीय व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करत आहेत. ही जिल्हा रुग्णालयातील विदारक परिस्थितीचा व्हिडिओ काल व्हायरल झाला आणि जिल्हाच नाही तर महाराष्ट्र हादरून गेला. रुग्ण तडफडत असताना वार्डात डॉक्टर उपलब्ध नाही. एक नर्स दहा ते वीस बेड पाहते ही सर्व विदारक परिस्थिती केवळ बेजबाबदार आणि अकार्यक्षम अधिकार्‍यांच्या नेतृत्व गुणामुळे जिल्हा रुग्णालयावर आली आहे. डॉ. सुखदेव राठोड यांनी शंभर टक्के रुग्णालयात ठाण मांडून रुग्णालयातील सर्व त्रुटी भरून काढण्याचे काम करणे अपेक्षित असते, मात्र डॉ राठोड हे दिवसातून केवळ एक-दोन तासांसाठी रुग्णालयात येतात. त्यामुळे अधिकारी, कर्मचार्‍यांवर जी कमांड असायला हवी ती दिसून येत नाही. त्यातून रुग्णालयाची स्थिती अशी गंभीर होते. डॉ. राठोड हे उद्धट आणि हेकेखोर असल्याच्या तक्रारीही प्राप्त असून जिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय घडी व्यवस्थीत बसवायची असेल तर सुखदेव राठोड यांना पदावरून हाकलून त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष आरएमओला बसवावे, तेव्हाच बीडच्या रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबेल.

भरती प्रक्रियेत हात ओले
कोविड वार्डामध्ये काम करण्यासाठी एक तर कोणी पुढे येत नाही, अशा स्थितीतही भरती प्रक्रिया जेव्हा होते तेव्हा ऑर्डर देण्यासाठी डॉ. सुखदेव राठोड हे पैशे घेतात. एखाद्या उमेदवाराने पैसे देण्यास असमर्थता दाखविली तर वार्डबॉयसाठी दहावीला ७० टक्के पाहिजेत, असे एक ना अन्य तुघलकी कारणे पुढे करत त्याची ऑर्डर रोखली जाते. साफसफाई करणार्‍या वार्डबॉयला खरच ७० टक्के गुणांची गरज आहे का? यातूनच राठोड यांची भूमिका दिसून येते.

कागदोपत्री ड्युटी करणार्‍या सिव्हीलच्या अधिकृत डॉक्टरांचं काय?
३५ पेक्षा अधिक डॉक्टर जिल्हा रुग्णालयामध्ये अधिकृत आहेत मात्र यामधील २५ ते ३० डॉक्टर वेगवेगळे कारणे देऊन रुग्णालयामध्ये येत नाहीत, रुग्णसेवा देत नाहीत, काहींचे खासगी रुग्णालये आहे त्यांनी रजा टाकल्या आहेत. काही शस्त्रक्रियेच्या नावाखाली आदित्य डेंटल असल्याचे सांगतात परंतु डिलेव्हरीच्या शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद आहेत हे सर्व आरएमओ सुखदेव राठोड यांना माहित असताना याकडे ते दुर्लक्ष करतात. याचाच अर्थ राठोडांना रुग्णालयातील रुग्णांना देणेघेणे नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!