Friday, October 22, 2021
No menu items!
HomeUncategorizedअग्रलेख- जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलू नका

अग्रलेख- जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलू नका

आल्या मगरी, अश्रु ढाळले, गरीब मरत आहेत,
मरू देत, आम्हाला काय त्याचे?

जिवंतपणी भडकत्या
चितेवर ढकलू नका

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०

राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार उडवून दिलाय. रोज कोरोना बाधितांचा आकडा राज्या-राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातला बाधितांचा आकडा तीन लाखांच्या वर जावून पोहचत आहे. निमोनियासारखा जीवघेणा आजार माणसांचे फुफ्फुसे निकामी करत आहे, लोकांचे अक्षरश: गळे दाबत आहे, श्‍वासोश्‍वास घ्यायला त्रास होत आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये रूग्णांची व्यवस्था करण्यासाठी आरोग्य व्यवस्था तेवढी सक्षम आहे का? हा प्रश्‍न एवढ्यासाठीच विचारावा लागतोय, रूग्णालयामध्ये सध्या ज्या आगी भडकू लागल्या आहेत त्या आगीत जीवंतपणी रूग्ण अक्षरश: तडफडून मरत आहे. ते अपघात असतील, दुर्घटना असतील परंतू ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, ऑक्सिजनमुळे लोकांचा जीव गुदमरून जातो. या मानव निर्मित अपघाताला कोण जबाबदार? देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जान आणि मालची जबाबदारी ही राज्य सरकारसह केंद्र सरकारची असते. ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारही स्पेशल अपयशी ठरत आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने परवा ऑक्सिजनबाबत केंद्र सरकारला चांगलेच फटकारले. परंतू इथे कोणाला फटकारून अथवा कोणाचे कान ओढून लोकांचे जीव अबाधित राहणार नाहीत. त्यासाठी आलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्या इरादे जो सकारात्मक अन् राजकारण विरहीत दृष्टीकोन हवा तो दृष्टीकोन सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी ठेवायला हवा.

रिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.
आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी
येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


रूग्णालयात जे
अग्निचे तांडव

एकापाठोपाठ एक सुरू आहे ते तांडव म्हणजे जीवंतपणी माणसांना भडकत्या चितेवर ढकलून देण्यासारखे आहे. नाशिकमध्ये जो प्रकार घडला, ऑक्सिजन टँक लीक होवून २७ पेक्षा अधिक लोक ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्युमुखी पडले. त्यांच्या कुटुंबातील लोकांना जेवढे दु:ख झाले असेल तेवढे दु:ख अन्य कोणालाही झाले नसेल. भंडार्‍यामध्ये जेंव्हा नवजात बालकांचा बडकत्या अग्नित जळून मृत्यु झाला तेंव्हाच राज्यातले आणि देशातल्या रूग्णालयामध्ये कुठलाही अपघात होणार नाही याची दक्षता राज्यासह केंद्र शासनाने घ्यायला हवी होती. मात्र अग्निचे तांडव याची देही याची डोळा पाहून मगरीचे आश्रु ढाळण्यासाठी तयार असलेल्या व्यवस्थेने या घटनाक्रमांकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच काल परवा मुंबई महानगरीत कोव्हिड रूग्णालयात असेच एक अग्निचे तांडव झाले. या तांडवात अग्निने अक्षरश: १४ लोकांचे जीव घेतले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे बाधित रूग्ण उपचार घेत होते. मात्र त्यांना पुसटशीही कल्पना नसेल की शॉर्टसर्कीटच्या नावाखाली आपला काळ दडून बसलाय. जे विरारमध्ये झालं त्यापेक्षा अधिक भयानक देशाच्या राजधानीने पाहिलं. तिथेही ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने प्राण वायु संपल्याने २२ लोकांचे तडफडून जीव गेले. ही देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहिली तर मन हेलावून जात आहे. कोरोनासारख्या महामारीने अजगरागत १३० कोटींच्या देशाला आपल्या विळख्यात जखडून ठेवलं आहे. हा विळखा एक दिलानं आणि एक साथीने सोडण्याइरादे प्रयत्न करायचं सोडून अशा घटनांवर राजकारण करणे आणि

हे पण वाचा

रोखठोक- सह्याद्रीच्या शिखरावर मृतदेहाच्या शिड्याकरून सत्तेचा ध्वज कोण फडकू पहातोय?शीराविना धड लढणारा महाराष्ट्र!
मगरीचे आश्रु
ढाळणे हे एकमेव काम सध्या राजकारण्यांनी सुरू केलं आहे. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी आणि विचारवंतांनी भारतातील कोरोना वाढीबाबत जे मत प्रकट करण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या गलिच्छ राजकारणावर त्या लोकांनी बोट ठेवलं आहे. होय हे उघड तिव्रार सत्य आहे. महाराष्ट्रामध्ये जेंव्हा कोरोना आटोक्यात आला होता त्यावेळी राज्य शासनाने म्हणण्यापेक्षा ठाकरे सरकारने गाफिल न राहता उपाय योजना कायमच्या सुरू ठेवल्या असत्या तर ही वेळ आली नसती आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने केवळ ठाकरे सरकार पाडायचं आहे म्हणून राजकारण केलं नसतं तर आज महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची अशी अवस्था झाली नसती. दुर्घटना घडतायत, माणसं मरतायत, अनेकांचे संसार उघड्यावर पडतायत अशावेळी राजकारणी केवळ मगरीचे आश्रु ढाळतायत. आज कोणावर बोट ठेवण्यापेक्षा राज्याची आणि देशाची आरोग्य व्यवस्था प्रबळ कशी होईल आणि लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. कोरोनामुळे मरणार्‍यांच्या संख्येपेक्षा वैद्यकीय व्यवस्था नसल्याने रूग्णांमध्ये जी भिती निर्माण होत आहे त्यातून मरणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते.

इथे पॅनिक
केलं जातं अथवा भितीदायक परिस्थिती निर्माण केली जाते. खरं पाहिलं तर प्रत्येक माणसाच्या शरिरामध्ये आत्मविश्‍वास ही सर्वात मोठी प्रतिकार शक्ती असते. मात्र गलिच्छ राजकारण आणि व्यवस्थेचे धिंदवडे पाहता तो आत्मविश्‍वास लोक गमावून बसले आहेत. आत्मविश्‍वास आणि मानसिकतेतील एक प्रकरण सर्व परिचित आहे. एका देशामध्ये दोन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते मात्र काही अभ्यासक हे दोन गुन्हेगार मरणार तर आहेत म्हणून त्यांच्यावर एक प्रयोग करतात. उद्या फाशी दिली जाणार असलेल्या गुन्हेगारांना सांगण्यात येते. तुम्हाला फाशी नाही तर तुमच्या खोलीमध्ये नाग सोडून त्याच्याद्वारे मारण्यात येणार आहे. त्या गुन्हेगारांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि एका अंधार्‍या खोलीत त्यांना सोडून खोलीमध्ये दोन साप सोडल्याचे त्यांना सांगण्यात येते. प्रत्यक्षातत साप सोडलेले नसतात. प्रयोग करणारा त्या दोघांच्या पायाला केवळ टाचणी टोचवत आश्‍चर्य दुसर्‍या दिवशी सकाळी हे दोघे ही गुन्हेगार मृत्यूमुखी पडलेले असतात. जेंव्हा त्यांचं शवविच्छेदन केले जात तेंव्हा त्यांच्या शरीरात विष तयार झालेलं असते. सांगायचं तात्पर्यं आत्मविश्‍वास आणि मानसिकता काय करू शकते? सकारात्मक असेल तर ती संकटावर मात करू शकते आणि नकारात्मक असेल तर पराभवाच्याच नाही तर मृत्यूची छायेत घेवून जाते. महाराष्ट्रात आणि देशात हेच होतय. इथं केवळ कुठल्या ना कुठल्या कारणावरून पॅनिक केलं जातय आणि लोकांना जिवंतपणी भडकत्या चितेवर ढकलून दिलं जातयं. जी स्थिती राज्याची आणि देशाची आहे

तीच स्थिती
बीड जिल्ह्याची
इथे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणार्‍या लोकांची वानव असल्याचे दिसून येते. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने शासन व्यवस्थेसह आरोग्य व्यवस्थेने कोरोना हाताळला त्या पद्धतीने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये कोरोना हाताळतांना व्यवस्थेला स्पेशल अपयश आले आहे. इथे कर्तव्य कर्म करणार्‍यांची कमी नाही परंतू ते कर्तव्य कर्म करत असतांना जा समाजसेवेचा भाव असतो तो भाव प्रशासन व्यवस्थेतील लोकांमध्ये प्रामुख्याने सध्या तरी दिसून येत नाही. म्हणूनच रोज कुठल्या ना कुठल्या परिस्थितीवरून बीडची आरोग्य व्यवस्था कु चर्चेत राहते. ही व्यवस्था सुधारण्यासाठी आत्मविश्‍वास आणि सकारात्मक दृष्टीकोनाची व्यवस्थेला गरज आहे. प्रशासनातील अधिकारी लोकांची कोंडी करत असतील तर ती कोंडी सोडवण्याची जबाबदारी शासनातील लोकप्रतिनिधीची आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी तरी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकांचे जीव वाचवण्याइरादे आता बाहेर पडायला हवे आणि राज्यासह केंद्र सरकारने दुर्घटना होणार नाहीत याला प्राधान्याने क्रम देवून लोकांना आरोग्य सेवा कमी पडणार नाही याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. माणसे मेली आणि त्यानंतर येवून जर कोणी दु:ख व्यक्त करत असेल तर तो प्रकार मगरीच्या आश्रु ढाळण्यागत असेल.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!