Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeक्राईमसासू समजावयाला गेली अन् जावयाने घात केला

सासू समजावयाला गेली अन् जावयाने घात केला


पत्नीला पाठवत नाही म्हणून खून केला, आरोपीच्या अटकेसाठी दोन पथकांची नियुक्ती
केज (रिपोर्टर):- केज-साळेगाव रोडवर काल दुपारी चाळीस वर्षीय महिलेचा कोयत्याने निर्घृणपणे खून करण्यात आला. या खुनाच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. या खुनाचे रहस्य समोर आले असून जावई मुलीला पाठवा म्हणून नेहमी तगादा लावत होता. थोड्या दिवसांनी मुलीला पाठवू, असं सासूचं म्हणणं होतं, त्यासाठी सासू जावयाला समजावण्यासाठी गेली होती आणि जावयाने मागचा पुढचा विचार न करता सासूवर कोयत्याने वार करत तिचा निर्घृणपणे खून केला. जावयाला पकडण्यासाठी केज पोलिसांनी दोन पथकांची नियुक्ती केली आहे.

phh


लोचनाबाई ऊर्फ सुलोचना माणिक धायगुडे (रा. धायगुडा पिंपळा) या महिलेचा काल दुपारी केज-साळेगाव रोडवर खून करण्यात आला. सदरील हा खून जावईने केल्याचे समोर आले. आरोपी जावई अमोल इंगळे हा पत्नीला सासरी पाठवा म्हणून सासुकडे तगादा लावत होता. गेल्या एक महिन्यापुर्वीच अमोलची पत्नी प्रसूत झाली होती. इतक्या लवकर आम्ही सासरी पाठवणार नाही, थोडं थांबा, अशी विनवणी सासू लोचनाबाई धायगुडे ही करत होती. त्यासाठी ती आपल्या पुतण्याला सोबत घेऊन जावई अमोल इंगळे यास समजावण्यासाठी गेली होती. समजावण्यासाठी गेलेल्या सासुवरच अमोल इंगळे व त्याच्या अन्य एका साथीदाराने कोयत्याने वार केले. यात ती गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाली. महिलेचा पुतण्या जखमी झाल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी केज पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलीसांनी अटक केली असून मुख्य आरोपी अमोल इंगळे हा फरार असल्याने त्याला पकडण्यासाठी डीवायएसपी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक त्रिभुवन यांनी दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!