Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनामढे झाकुनिया करती पेरणी, कुणबीयाची वाही लवलाहे ! निर्भय राहू, कोरोनाला हरवू!...

मढे झाकुनिया करती पेरणी, कुणबीयाची वाही लवलाहे ! निर्भय राहू, कोरोनाला हरवू! चला वेडात दौडू एकसाथ


बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवून सोडलाय, अंबाजोगाईसह बीड जिल्हा रुग्णालयात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच सरणावर 28 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. अशा भयावह स्थितीत कोरोनाविरुद्ध लढणार्‍या मनांमध्ये भीती वाढताना दिसून येते. आता कोरोनाला भ्यायचं नाही, सुरक्षित उपाययोजना करत कोरोनाशी दोनहात करायचे, निर्भय व्हायचं, कोरोनाशी लढायचं अन् कोरोनाला हरवण्यासाठी एकसाथ शासन-प्रशासनासह अखंड समाज व्यवस्थेने एकसाथ दौडायचं, चला उठा, निर्भय व्हा आणि कोरोना लढ्यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी व्हा. बीड जिल्हा कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा आहे आणि या सर्वांचे कर्तव्य ‘मढे झाकुनिया करती पेरणी कुणबीयाची लवलाही’ सारखे अभिमानास्पद आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा समुहसंसर्ग प्रचंड वाढत चालला आहे. त्यानुसार मृत्युची संख्याही वाढताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बीडची कमतरता आहे. ऑक्सिजनचा तुटवडा आहे, आरोग्य व्यवस्थेत माणसे कमी आहेत या परिस्थितीत जिल्हावासियांनी भिऊन जाण्यापेक्षा निर्भयपणे तोंड देणे गरजेचे आहे. आलेलं संकट नक्कीच बिकट आहे परंतु कुठल्याही संकटावर मात करणे, धैर्य ठेवत, संघर्ष करत यशाची पताका फडकावणं हे जिल्हावासियांच्या रक्तात आहे त्यामुळे आता कोरोनाला हरवण्यासाठी निर्भय राहू. कोरोनाला हरवू आणि शासन-प्रशासन व्यवस्थेसह समाज व्यवस्थाही एकसाथ दौडू, आता केवळ कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या जळत्या चिता पाहून दु:ख-खेद व्यक्त करत बसायचं नाही, आरोप-प्रत्यारोप करायचं नाही तर आता कुणीही मृत्युच्या दारात जाणार नाही यासाठी गावागावात आरोग्य व्यवस्था कशी उभी करता येईल याकडे लक्ष द्यायचं, बीड जिल्ह्यात अनेक लोक समोर येऊन क्वॉरंटाईन सेंटरसह कोविड सेंटर उभे करू लागले आहेत. आता ज्याच्याकडे दायित्व आहे, दानत्व आहे अशांनी पुढे येत कोरोनाला हरवण्यासाठी ठिकठिकाणी कोविड सेंडर उभारत आपल्या गाव अथवा तालुक्याच्या रुग्णांवर जिथले तिथे उपचार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अनेक जण समोर येत आहेत. काहींनी कोविड रुग्णालयही उभारले आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी आता कोरोनाच्या या लढाईत प्रत्यक्ष उतरून सहभाग घेण्याची गरज आहे.


मढे झाकून पेरणी करणारे आम्ही शेतकरी
कर्तव्य कर्माला शेतकरी किती महत्व देतो, हे सांगण्यासाठी जगद्गुरू संत तुकारामांनी आपल्या गाथेमध्ये ‘मढे झाकुनिया करती पेरणी कुणबियाची लवलाही’ हा अभंग लिहिला, या अभंगाचा अर्थ कितीही संकट असो, घरात माणूस मृत्युमुखी पडलेला असो, ज्या वेळेस पेरणीचे दिवस असतील त्या वेळेस घरातल्या मृत्युमुखी पडलेल्या माणसावर अंत्यसंस्कार करणार नाहीत परंतु आपले पेरणीचे कर्तव्य शेतकरी पार पाडतील. आताही बीड जिल्हा कोरोनाच्या संकटात आहे आणि बहुतांशी समाज हा कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर आहे त्यामुळे आम्ही मृत्युला घाबरणार नाहीत, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तटस्थपणे काम करू, असेे जिल्हावासियांनी आता ठरवायला हवे.

चिंतावरचा अनुसवार निघू देऊ नका
चिंता आणि चिता या दोन शब्दांमध्ये केवळ अनुसवार महत्वाचा आहे. या दोन्ही शब्दांना एकतर जवळ बाळगू नका, चिंता बाळगलीच तर त्यावरचा अनुसवार काढू नका, म्हणजेच चिंता करायची तर शासनाचे गाईडलाईन्स आपण तंतोतंत पाळतोत का? मास्क लावतोत का? लक्षणे दिसल्यावर तात्काळ टेस्ट करतोत का? याची चिंता बाळगा, अन्य चिंता बाळगू नका.


शासन काम करतय, प्रशासनाला मदत करा
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात कोरोनाबाबत अत्यंत सतर्क रहात काम करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांवर उपचार कमी पडू नयेत म्हणून निर्माण झालेले प्रत्येक प्रश्‍न ते सोडवत आहेत, आता तुम्हा-आम्हाला प्रशासनाला मदत करायचीय, शासनाच्या गाईडलाईन्स पाळून कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करायचे.

‘मानवलोक’ एक साथ दौडण्यासाठी उतरले मैदानात
अंबाजोगाई येथील मानवलोक सेवाभावी संस्था कोरोनाच्या या महाभयानक संकटात कोरोनाला हरवण्यासाठी मैदानात उतरली आहे. संस्थेने तब्बल अडीचशे रुग्णांसाठी चार ठिकाणी कोविड सेंटर उभारले आहे. कुसळंबमध्ये शंभर खाटांचं, बनसारोळा पन्नास, घाटनांदुर 50, अंबाजोगाई (मानवलोक) येथे शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले आहेत. अंबाजोगाईच्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे आणि सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. मानवलोक जसे उतरले तसे अन्य संस्थांनीही उतरावे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!