Friday, October 22, 2021
No menu items!
Homeसंपादकीयनरकयातना

नरकयातना


कोरोनाने रौद्ररुप धारण केले. देशात सध्या कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे. वेळीच ठोस उपाय योजना आखल्या असत्या तर आज इतके हाल देशातील नागरीकांचे झाले नसते. कोरोनामुळे इतक्या भीषण अवस्थेला तोंड द्यावे लागेल याचा विचार केला नव्हता. मात्र यंत्रणा पुर्णंता कोलमडल्यासारखी झाली. जो-तो कोरोना, कोरोनाच करतो. देशातील एकही राज्य असं नाही, ते अस्थिर झालेलं नाही. मरणारांची संख्या वाढू लागली. देशात रोज तीन हजारापेक्षा जास्त लोक मरू लागले. लाखो नवीन रुग्ण निघू लागले. ज्या रुग्णांना ऑक्सीजनची गरज आहे. अशा रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही. खाजगी आणि सरकारी दवाखान्यात काही ठरावीक बेडच आहे जिथं ऑक्सीजन आहे. दुसर्‍याची सुट्टी कधी होते आणि तिथं आपला रुग्ण कधी अ‍ॅडमीट करतोत याचीच जो-तो वाट पाहत असतो, इतकी विदारक अवस्था आरोग्य विभागाची झाली. काही जण ऑक्सीजनचे नळकांडे घेवून उघडयावर उपचार घेवू लागले. काहींचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. कित्येक जण आज ऑक्सीजनवर आहे. देशात ऑक्सीजनची टंचाई निर्माण झाली. ऑक्सीजनचे नवीन प्लॅन्ट तयार होवू लागले. इतर देशातून ऑक्सीजन मागवले जावू लागले. प्रत्यके दवाखाना खचाखच भरलेला दिसून येत आहे. रुग्णालयात जागा राहिली नाही, इतकी रुग्णांची संख्खा वाढली. गंभीर रुग्णांना जगवण्यासाठी त्यांचे नातेवाईक धडपड करतात. नाशिकच्या महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सीजन न मिळाल्यामुळे 24 जण मरण पावले. विरास मध्ये आगीत 13 जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत ऑक्सीजन अभावी 25 जणांचा मृत्यू झाला. या घटना मनाला सुन्न करणार्‍या आहेत. जीव वाचवण्यासांंठी रुग्ण रुग्णालयात दाखल होतात आणि रुग्णालाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांना मरणाच्या दाढेत ढकलले जाते. हा फक्त दुर्देवीच प्रकार नसून संतापजनक आहे. आपली आरोग्य सुविधा किती सक्षम आहे हे दिसतं. नसीब आहे ते रुग्णालय पुर्वीच बांधून ठेवलेले आहेत. सहा वर्षात आरोग्य विभागात नवीन काही सुधारणा झाल्या नाहीत. गाव पातळीवर सुज्ज रुग्णालय उभारले असते तर आज ही वेळ आली नसती. जात,धर्म, धार्मिक स्थळासाठी भांडणारांना आज फक्त रुग्णालय आठवत आहे.

prakhar logo


रांगा कमी झाल्या नाही
देशात नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सर्वसामान्य माणुस रांगा लावून बसतो. रांगेत बसल्याशिवाय त्याला काही मिळत नाही. मग ती रांग पाण्यासाठी असेल, राशनसाठी असेल किंवा रॉकेलसाठी असेल, सहजा-सहजी लोकांना काही मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात नोटबंदी केली आणि सर्वसामान्य नागरीकांच्या घरातील पैसा एका रात्रीत खोटा ठरविला गेला. कष्टाचा पैसा बदलण्यासाठी लोकांना बँकेच्या दारात बसावे लागले. दोन-दोन दिवस लोकांना आपल्या हक्काचे पैसे बदलून मिळाले नव्हते. पैसे बदलण्यासाठी देशात ज्या काही रांगा लागल्या होत्या. त्यात अनेकांचा बळी गेला. आता कोरोनामुळे लोकांना दवाखाने आणि मेडीकलसमोर रांगा लावण्याची वेळ आली. रेमडेसीवर हे औषध मिळवण्यासाठी सरकारी दवाखान्यासमोर रुग्णांचे नातेवाईक रात्र-दिवस रांगा लावून असतात. रांगा लावून त्यांना लवकर इंजेक्शन मिळत नाही. लोकांना आरोग्य सुविधा मिळत नसेल तर आपण नेमकं कोणत्या युगात वावरतोत, याचा विचार केला पाहिजे? राजकारणी नुसत्या मोठ-मोठया बाता मारत असतात. त्यांच्या बाता किती खोट्या आहेत हे आज कळलं. इतके दिवस, द्या तितके दिवस द्या देशाचा चेहरा बदलून टाकतो असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. विकासात चेहरा बदलला नाही पण कोरोनाच्या मृत्यूच्या वाढत्या घटनेने देशाचा चेहरा काळवंडला.
काय ती मन की,बात!!
पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांनी मन की, बात सुरु केली. देशाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोदी संबोधीत करत असतात. यात ते आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतात. बोलण्यापेक्षा कृतीवर भर दिला असता तर आज वेगळं चित्र दिसलं असतं. ज्यांना काही करायचं नाही, त्यांच्याकडे नेमक्या कुठल्या अपेक्षा करायच्या? निवडणुका आल्या की, ठरल्याप्रमाणे जाती-धर्माचे राजकारण करुन आपला स्वार्थ साधून घेतला जातो. आज जे लोक उपचाराविना मरतात, त्यांची कोणती जात आहे? मरतो तो फक्त माणुसच! संकटाच्या काळात माणसं माणसांच्या मदतीला धावून येतात, ही खरी माणुसकी आहे. सामान्य माणुसच खरा आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे ती माणसं घराचं दार बंद करुन निवांत बसली. सामान्य माणसामुळे मोठी होणारी फिल्म सिटी, उद्योगा मधील लोकं आप-आपल्या सोयीनूसार जगतांना दिसतात. काही हिरो-हिरॉईन,उद्योगपती मदत करतात हे ही खरं आहे पण इतराचं काय? फिल्म सिटीमधील वाचाळवीर शेतकरी मोर्चा किंवा अन्य कुठल्या ना कुठल्या कारणावरुन व्टिट करणारे लोकांच्या मदतीला धावून येतात दिसत नाही. कुणाची तरी हुजरेगिरी करायची आणि प्रसिध्दी मिळवायची हा काहींचा स्टंट असतो. त्यांचं ढोंग आज उघड पडलं. मदत करणारे जात-धर्म पाहत नाही. जाती-धर्माच्या भिंती ज्या काही बनवून ठेवल्या त्या आज पुर्णंता गळून पडल्या. कोरोनाने मरण पावल्याल्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम काही समाजसेवक करतात, अंत्यसंस्कार करतांना ते जाती-पाती मानत नाही, कित्येक मुस्लिमांनी इतर धर्मियांवर अंत्यसंस्कार करुन समाजात एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत माणुसकी दाखवली, ही माणुसकी अजरामर ठरणारी आहे. फक्त बोलघेवडं होवून फायदा नसतो. लोकांच्या कामी येणं हीच सगळ्यात मोठी देशसेवा आहे.
कोर्टाचा संताप
राजकीय व्यवस्था कशी आहे याचं चित्र रोजच समोर येत असतं. पुढार्‍यांना सामान्यांच्या बाबतीत तितका कळवळा नसतो. असतं ते फक्त ढोंगी प्रेम, त्यामुळे देशाचा विकास आज पर्यंत चांगला होवू शकला नाही. कोरोना जगात आहे. मात्र अनेक देशांनी आपल्या देशातील जनतेच्या हितासाठी ठोस निर्णय घेवून कोरोनाला थोपवण्याचं काम केलं. मग इस्त्रायल असेल,इंग्लड असेल या देशांनी कोरोनावर चांगली मात केली. माणसं मरत असतांना सयंम तरी किती दिवस राखायचा. काही कुटूंबाला वाली सुध्दा राहिले नाही इतके माणसं त्यांच्या घरातील मरण पावले, तरी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कोरोना आपली परिक्षा घेतोय. उपाय योजना आखल्या नाही तर आणखी किती ही वर्ष कोरोना आपली परिक्षाच घेत राहिल तो पर्यंत फक्त मृत्यूचा आकडा मोजत बसायचा का? कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेला माणुस घरी येई पर्यंत त्यांच्या नातेवाईकांना चिंता लागून असते. पाच राज्यातील निवडणुकीबाबत आपल्या राज्यकर्त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. स्मशानभुमीत जागा नाही इतक्या चिता रोज जळतात. पाच राज्यातील निवडणुकीच्या बाबतीत मद्रास हायकोर्टाने निवडणुक आयोगाला चांगलेच झाप झापले. कोरोना लाटेला निवडणुक आयोगाला जबाबदार धरले. आयोगाच्या अधिकार्‍यावर मनुष्य वधचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. निवडणुक आयोग स्वत:च्या मनानूसार न चालता सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावर चालवू लागले. त्यामुळे सगळा गोंधळ निर्माण झाला. राजकारण्यांनी सगळ्यांनाच विकत घेतले आहे? जेणे करुन निवृत्ती नंतर त्यांची राजकीय सोय केली जाते, हे अलीकडच्या काळात स्पष्ट दिसून आलेले आहे, मग ते सेवानिवृत्त न्यायाधीश असतील किंवा अन्य बडे अधिकारी असतील ते निवृत्ती नंतर ‘मालकाचे’ इनाम घ्यायला विसरत नाहीत. त्यामुळेच उच्च पदावर बसलेले अधिकारी आपल्या कर्तव्याला फाटा देत सत्ताधार्‍यांच्या कलेनूसार चालतात. राजकारण प्रशासनात किती भिनलं हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. अशा पध्दतीचं राजकारण प्रशासनात भिनत राहिलं तर हे हिताचं नाही.
लोकशाही विकसीत झाली नाही
लोकशाही म्हणजे लोकसेवा ही संकल्पना गेल्या सत्तर वर्षात मुळ धरु शकली नाही, हे देशाचं दुर्देेव आहे. लोकांना वेळोवेळी वेड्यात काढण्याचं काम राजकारणी करत आले. निवडणुकीत पैसा आणि बळाचा वापर करत निवडणूका जिंकायच्या आणि सत्ता भोगायची हेच आज पर्यंत होत आलं. लोकांच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवले गेले नाही. लोकांना कुठ्ल्या तरी आश्वासाच्या फेर्‍यात किंवा भावनेत आकडवून मुर्खात काढण्याचा वेडगळपणा होत आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय सुधारण्यापेक्षा सामाजीक सुधारणा महत्वाच्या मानत होते, पण आज फक्त राजकारणाचा विकास झाला. राजकीय पुढार्‍यांनी आपल्या कित्येक पिढयाची सोय करुन ठेवली. पुढार्‍यांनी ही कमाई कुठून केली. याचा जाब का विचारला जात नाही. समाजकारणात किती विकास झाला याचा विचार कुणी करत नाही. राजकारणातून समाजकारण पाझर नाही. सत्तर वर्षात समाज कारण झालं असतं तर ऑक्सीजन विना लोकं मेले नसते. रोम जळत असतांना निरो व्हॉयकीन वाजवत होता, असंच पंतप्रधान मोदी यांच्या बाबतीत म्हणण्याची वेळ आली. चाणक्यनितीनूसार आयोग्य नेत्याला निवडणार्‍यांच्या पदरी अपयश आणि नरकतुल्य अनुभव येतात. सध्या देशात तोच तर अनुभव जनतेला येत आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!