Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनास्वाराती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित; आवश्यकतेच्या 40% ऑक्सिजन रुग्णालयातच होणार निर्माण

स्वाराती रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित; आवश्यकतेच्या 40% ऑक्सिजन रुग्णालयातच होणार निर्माण

पालकमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले लोकार्पण

अंबाजोगाई (दि. 27) —- : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर उपाय म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट आज कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्लांट द्वारे दर दिवसाला 288 जम्बो सिलेंडर इतका ऑक्सिजन हवेतून वेगळा करून निर्माण होणार असून याद्वारे रुग्णालयास आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनच्या 40% ऑक्सिजन निर्माण होणार असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

ना. धनंजय मुंडे यांच्यासह ऊर्जा राज्य मंत्री प्रजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते एका व्हीडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्याधिकारी मोहन आव्हाड, स्वाराती चे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांसह आदी उपस्थित होते.

या ऑक्सिजन प्लांट मूळे रुग्णालयाला लागणारा 40% ऑक्सिजन मिळेल, उर्वरित ऑक्सिजनचा सध्या विविध माध्यमातून पुरवठा सुरू असुन, तो ऑक्सिजन देखील इथेच निर्माण केला जावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी एक ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून सत्यात आलेली ही संकल्पना अन्यत्रही राबविणार – श्री. तनपुरे

दरम्यान परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, जिल्हा प्रशासन व ऊर्जा विभागाशी चर्चा करून धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेत परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन निर्मिती प्लांट अंबाजोगाई रुग्णालयात शिफ्ट केला, याचा फायदा आरोग्य यंत्रणेला होईलच.

ऊर्जा विभागाने याच संकल्पनेतून परभणी येथेही असाच एक प्लांट शिफ्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच राज्यातील अन्य औष्णिक विद्युत केंद्रांतील प्लांट देखील शिफ्ट करून त्यांची मदत आरोग्य विभागाला होईल यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, असे यावेळी बोलताना ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्तदादा तनपुरे म्हणाले.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे शिफ्टिंग करणे शक्य नाही, मात्र तेथे सिलेंडर फिलिंग युनिट उभारून तेथून अन्यत्र सिलेंडर पुरवठा केला जाऊ शकतो, याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती धनंजय मुंडे यांनी श्री. तनपुरे यांना केली असून, याबाबतही ऊर्जा विभाग तातडीने सकारात्मक निर्णय घेईल असे श्री. तनपुरे म्हणाले.

ऊर्जा मंत्री ना. डॉ. नितीनजी राऊत, राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांच्यासह अंबाजोगाई येथे प्लांट शिफ्टिंग व उभारणीचे काम अत्यल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे यावेळी ना. मुंडे यांनी आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!