Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनालस घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची केंद्रावर धावाधाव

लस घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांची केंद्रावर धावाधाव


जिल्ह्यातील लसीकरण केंद्र लसीअभावी बंद; केवळ तीन ठिकाणी
लसीकरण सुरू
,रविवारनंतर बीड जिल्ह्याला लस उपलब्ध झाली नाही
बीड | रिपोर्टर
जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक लस घेण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. मात्र लसीचा तुटवडा असल्याने आज जिल्ह्यात केवळ तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू असून अन्य सर्व केंद्र लसी अभावी बंद आहेत. आज मित्तीला आरोग्य विभागाकडे केवळ २६०० लस उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. लस केंव्हा येणार याबाबत अधिकृतपणे आरोग्य विभागालाही माहिती देता आली नाही. दुसरीकडे १ मे पासून राज्यात १८ वर्षापुढील नागरिकांनी लस द्यायची की नाही? याबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. त्यामुळे याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.
रविवार दि.२४ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यासाठी १५ हजार कोव्हिड शिल्ड तर कोव्हॅक्सीन २ हजार ६२० लसीची उपलब्धता आरोग्य विभागाला झाली होती. गेल्या २ दिवसापासून जिल्ह्यातल्या विविध लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होते. मात्र आज कोव्हिड शिल्ड लस संपल्यामुळे जिल्ह्यातील ३ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यामध्ये जिल्हा रूग्णालय, येळंबघाट आणि बीड शहरातील अन्य एका केंद्रावर लस देणे सुरू आहे. दुपारपर्यंत आरोग्य विभागाकडे २६०० लस उपलब्ध होत्या. कोरोना समुह संसर्ग जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी आता शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना लस मिळत नाही त्यामुळे ठिकठिकाणच्या केंद्रावर आरोग्य कर्मचारी आणि नागरिकात वादावाद होतांना दिसून येत आहे. एकूणच लसीचा पुरवठा योग्य आणि वेळेत होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेला अनेक वेळा अडचणी येत आहेत.
जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा रूग्णालयाची करणार पाहणी


बीड जिल्हा रूग्णालयातील कोव्हिड वार्डासह ऑक्सिजन आणि आदी बाबींची पाहणी आज दुपारनंतर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार करणार असून जिल्हा रूग्णालयातील विविध अडीअडचणी समजून घेत त्या तात्काळ सोडवण्याबाबत संबंधितांना ते सूचना करणार असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही दिवसापासून जिल्हा रूग्णालया बाबत तक्रारी वाढत असल्याने जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी लोकांचे प्रश्‍न कसे सुटतील यासाठी आज उपाय योजना करणार असल्याचे सांगण्यात येते.
लस मोफत मिळणार का? लॉकडाऊन वाढणार का?
कॅबिनेटच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

बीड जिल्ह्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा जसा जाणवत आहे तसा राज्यातील अनेक भागातही लसीचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी येत असून १ मे पासून राज्यात १८ वर्षापुढील सर्वांना मोफत लस दिली जाणार अशी माहिती ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी दिल्यानंतर राज्यभरात लसीकरण मोहिम कशी चालवायची याबाबत आज कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. त्याच बरोबर राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन वाढवायचे की नाही? यावरही चर्चा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागून आहे.

Most Popular

error: Content is protected !!