अपहरण, पोस्कोतला गुन्हेगार हातकडीसह पळाला
मध्यप्रदेशातून भुसावळ पोलीस आरोपीला घेऊन येत होते
काल सकाळी कन्हैय्या हॉटेलवर घडला थरार
दिवसभराच्या शोधानंतर आरोपीवर गुन्हा
नेकनूर (रिपोर्टर) अपहरण, पोस्को सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला मध्यप्रदेशमधून भुसावळ, जळगावकडे घेऊन जात असताना टॉयलेटचे निमित्त केले. तेव्हा पोलिसांनी सोलापूर-औरंगाबाद रोडवरील हॉटेल कन्हैय्या या ठिकाणी थांबा घेतला असता आरोपीने पोलीस कॉन्स्टेबलच्या हाताला झटका देऊन हातकडीसह कंपाऊंड भिंत ओलांडून डोंगरपट्ट्यात पळून गेल्याची खळबळजनक घटना काल सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. काल दिवसभर मांजरसुंबा घाटात पोलिसांनी आरोपीची शोधाशोध केली मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर नेकनूर पोलिसात सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, मध्यप्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातील बास येथील 21 वर्षीय मोहम्मद सादीक हाफीज या आरोपीवर अपहरण, पोस्कोसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काशीराम वाघमारे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने त्याला पकडून भुसावळ पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. संबंधित आरोपी हा गंभीर गुन्ह्यामध्ये असल्याकारणाने त्याच्या हाताला हातकडीही होती. भुसावळकडे जात असताना सोलापूर-औरंगाबाद महामार्गावरील मांजरसुंब्याजवळ आरोपी मोहम्मद याने टॉयलेटचा बहाना केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची जीप ही हॉटेल कन्हैय्या या ठिकाणी उभा केली. तेव्हा हातकडी घातलेल्या आरोपीला पोलिसांनी खाली उतरवले. त्याचवेळी पोलिसांची नजर चुकवून हाताला झटका देत मोहम्मद सादीक याने हातकडीसह हॉटेल कन्हैय्याच्या कंपाऊंड भिंतीवरून उडी मारली आणि तो डोंगरपट्ट्यामध्ये पळून गेला. सदरची घटना काल सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. काल दिवसभर भुसावळ पोलिसांसह नेकनूर पोलिसांनी या भागामध्ये संबंधित आरोपीचा शोध घेतला मात्र तो आरोपी मिळून आला नाही. अखेर त्याच्या विरोधात नेकनूर पोलिसात सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, नेमणूक भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास जमादार पवार करत आहेत.
लक्ष द्या, हा आरोपी भेटला तर तात्काळ पोलिसांना कळवा
अपहरण, पोस्कोसारख्या गंभीर गुन्ह्यातला हा आरोपी आहे. हा मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील बास येथील असून याचे नाव मोहम्मद सादीक हाफीज (वय 21 वर्षे) आहे. हा काल सकाळी सव्वा दहा वाजता मांजरसुंबा येथील कन्हैय्या हॉटेलपासून हातकडीसह पळून गेला आहे. फोटोमधील आरोपी कुणाला आढळून आल्यास अथवा पाहिल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नेकनूर पोलीस अथवा अन्य पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.