Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रअंगणवाडी सेविकांना ठाकरे सरकारने दिली खास भाऊबीज भेट

अंगणवाडी सेविकांना ठाकरे सरकारने दिली खास भाऊबीज भेट

मुंबई (रिपोर्टर):- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचार्‍यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. करोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; त्यामुळे या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार ३५३ अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले. करोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी या सर्वांच्या कामाची स्तुती केली. कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी या महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठीच दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!