Friday, October 22, 2021
No menu items!
Homeक्राईमसडकफिर्‍यांनो आता रस्त्यावर फिरलात तर पोलीस कारवाईसह अँटीजेन टेस्टला सामोरे जा

सडकफिर्‍यांनो आता रस्त्यावर फिरलात तर पोलीस कारवाईसह अँटीजेन टेस्टला सामोरे जा


वाढत्या संसर्गावर कठोर लॉकडाऊनची लस
जिल्हाधिकार्‍यांनी पोलीसांना दिले कारवाईचे आदेश
लोकप्रतिनिधींसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांना लॉकडाऊनमध्ये सुट नाही
कारवाई करताना व्यवस्थेवर दबाव आणला तर कारवाई करू

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या लॉकडाऊननंतरही रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून दिलेल्या निर्णयाने बीडचे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. मध्यरात्री जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पुढील पंधरा दिवसांचा लॉकडाऊन कडेकोट करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले असून यापुढे विनाकारण बाहेर पडणार्‍या लोकांविरोधात कठोर कारवाईसह संबंधित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे आदेशात म्हटले आहे. लॉकडाऊनच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही पक्षाच्या पदाधिकार्‍यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना सुट देण्यात येऊ नये आणि कुठल्याही पक्षाच्या राजकीय पुढार्‍यांनी दोषी व्यक्तींना सोडवण्याबाबत यंत्रणेवर दबाव टाकू नये असे आदेशात स्पष्ट म्हटल्याने आता पोलीस कठोर कारवाई करायला मोकळे झाले आहेत.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बीड जिल्ह्यात सशर्त लॉकडाऊन चालू आहे. मात्र या कार्यकाळामध्ये पोलीस प्रशासनाकडून कडेकोट अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. बीडची जी परिस्थिती आहे तीच अन्य जिल्ह्यांची आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून लॉकडाऊन कठोर करण्याबाबत प्रशासनाने घ्यावयाची दक्षता आणि कारवाईबाबत निर्देश दिले. या निर्देशानंतर बीड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. रात्री उशिरा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी लॉकडाऊनबाबत नवे आदेश काढले असून विनाकारण बाहेर पडणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना बीड पोलीस दलाला दिल्या आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणार्‍या व्यक्तींना स्वत:चे आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय-निमवैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर यांनीही आधार कार्ड बाळगणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. हेल्मेटचा वापर करण्याच्या सूचना यात दिल्या असून घराबाहेर पडताना नाक व तोंडावर मास्क लावणे गरजेचे असल्याचे सांगून मास्क न लावणार्‍या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यात सांगितले आहे. एखादा व्यक्ती विनाकारण बाहेर पडल्याचे दिसून आले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याची अँटीजेन टेस्ट करण्याचे अधिकारही पोलीसांना देण्यात आले असून विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, मनपा, ग्रा.पं.,जि.प. सदस्य यांना निर्बंधातून सूट देण्यात येऊ नये. कुठल्याही राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांनी लॉकडाऊनमध्ये फिरणार्‍या व्यक्तींची शिफारस करू नये, अथवा व्यवस्थेवर दबाव टाकू नये, अशी सक्त ताकिदही यात देण्यात आली असल्याने आता बीड पोलीस प्रशासन कारवाई करण्यास मोकळी झाली आहे.

कडक लॉकडाऊनबाबत पोलीस प्रशासनाला आदेश दिले -जिल्हाधिकारी
मला जिल्ह्यातील एक-एक जीव महत्वाचा आहे. राज्य सरकारने १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. त्याच धर्तीवर जिल्हा प्रशासनाचेही आदेश असून आजपासून बीड जिल्ह्यामध्ये विनाकारण फिरणार्‍या मोकाट व्यक्तींवर पोलीसांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी, असेही लेखी आदेश दिलेले आहेत, असे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले.


आदेशानंतरही दुपारी शहरात रस्त्यावर दिसले सडकफिरे
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी कडक लॉकडाऊनबाबत रात्री आदेश काढल्यानंतरही आज सकाळी अकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागात रस्त्यावर फिरणारे सडकफिरे मोठ्या प्रमाणावर दिसून आले. आदेशानंतरही पोलीस यंत्रणा हरकतमध्ये आल्याचे पहावयास मिळाले नाही. त्यामुळे या आदेशाची कठोर अमलबजावणी होणार का? याकडे सर्वांचे लक्षलागून आहे.


एसपी म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांसह शासनाने
दिलेल्या आदेशांचे अंमलबजावणी करणार

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन असताना संसर्ग रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. अशा स्थितीत मध्यरात्री जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊनबाबत कडक अमलबजावणीचे आदेश दिले. त्यानंतर रिपोर्टरने जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांसह शासनाने दिलेल्या आदेशाची अमलबजावणी करणार.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!