Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोरोनाला रोखण्यासाठी धनंजय मुंडे बीडमध्ये तळ ठोकून

कोरोनाला रोखण्यासाठी धनंजय मुंडे बीडमध्ये तळ ठोकून


जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सकांसोबत चर्चा; शंभर खाटाच्या कोविड सेंटरला भेट, कुठल्याही रुग्णाला आरोग्य
व्यवस्था कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, कोरोनाला हद्द करण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करा-ना.मुंडेंच्या सूचना

बीड (रिपोर्टर)- कोरोनाचा वाढता समुहसंसर्ग रोखण्यासाठी बीडच्या प्रशासन व्यवस्थेने कंबर कसलेली असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये तळ ठोकून कारोनावरील उपाययोजनांचा आढावा घेण्याचा सपाटा सुरू ठेवला असून आज सकाळी बीडमध्ये दाखल होत ना. मुंडेंनी जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली. दुपारी ते शहरातील आयटीआय सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या शंभर खाटांच्या कोविड सेंटरची पाहणी करून पुढील दोन-चार दिवसात सदरचे सेंटर प्रत्यक्षात चालू करण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या आहेत.


बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता समुहसंसर्ग पाहता काल दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून शहरातील नागरिकांना कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची परिकाष्ठा करत असतानाच दुसरीकडे शासन व्यवस्थेतील राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हेही बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोरोनाच्या महाभयंकर संकटात अडकलेल्या रुग्णांना कुठल्याही सुविधेची कमतरता भासू नये, आरोग्य व्यवस्था कमी पडू नये यासाठी ना.मुंडे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आज सकाळीच ते बीड शहरात डेरेदाखल झाले आहेत. शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत गित्ते यांच्यासोबत चर्चा करून बीडमधील कोरोना सेंटरसह जिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. काही सूचना करत रुग्णांना कुठल्याही अडीअडचणी भासू नयेत यासाठी सतर्क रहा, म्हणत ना.मुंडेंनी आयटीआय सेंटरमध्ये उभारण्यात येत असलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटरला भेट देत सदरचे सेंटर दोन ते चार दिवसात कसे सुरू करता येईल याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा केली. कुठल्याही रुग्णाला बेडची कमतरता भासू नये, आरोग्य सेवा सर्वांना सुरक्षित मिळावी यासाठी धनंजय मुंडे सातत्याने धडपड करत आहेत. आज त्यांनी जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना सूचना केल्या.

Most Popular

error: Content is protected !!