आठवड्यातून दहा कामांची होणार पाहणी; बेलुरा, काकडहिरा, तळेगाव येथील फळबाग,
विहिरी, रस्ते, नर्सरीची केली पाहणी, चांगल्या कामाचे कौतुक; बोगस कामे करणार्यांना चपराक
बीड (रिपोर्टर) रोजगार हमी योजनेतून बीड तालुक्यात फळबाग, नर्सरी व रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. प्रत्यक्षात कामे किती प्रमाणात सुरू आहेत याची पाहणी करण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे शेतकर्यांच्या बांधावर पोहचले होते. आज सकाळी त्यांनी बेलुरा, तळेगाव, काकडहिरा येथील कामांची पाहणी केली. जिल्हाधिकारी यांनी कामाची पाहणी केल्याने बोगस कामे करणार्यांची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली आहे. जिल्हाधिकारी आठवड्यातून दहा कामांची पाहणी करणार आहेत.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे प्रत्येक आठवड्याला एका तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामाला भेटी देणार आहेत. या भेटी किमान त्यांनी दहा कामांना द्यावेत, असे राज्य सरकारच्या सूचना आहेत. त्यानुसार आज त्यांनी याची सुरुवात करत बीड तालुक्यातील बेलुरा या ठिकाणी अनेक शेतकर्यांनी रोजगार हमी योजनेतून तुतीची लागवड केली आहे, फळबागांचीही लागवडी केाल्या आहेत. शेततळेही रोजगार हमी योजनेतून खोडलेले आहेत. मातोश्री पांदण रस्त्याच्या कामांना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मंजुरी आली होती. या पांदण रस्त्यामुळे शेतकर्यांना शेतामध्ये जाणे-येणे सोपे होणार आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पांदण रस्त्याची कामे बारकाईने बघत ज्या ठिकाणी रस्त्याच्या कामात शेतकर्यांमध्ये किरकोळ वादावादी असेल अशा ठिकाणीही समोपचाराने बसून तोडगा काढण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. पावसाळ्यामध्ये शेतकर्यांना या पांदण रस्त्यामुळे खते, बी-बियाणे शेतापर्यंत पोहच करणे सोपे होते. अनेक ठिकाणी रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्याकडेही शेतकर्यांचा कल मोठ्या प्रमाणात असल्याचे या वेळी जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आले. कृषी विभागालाही मोठ्या प्रमाणात रोगार हमी योजनेतून कामे हाती घ्यावी, असेही या भेटीत जिल्हाधिकार्यांनी कृषी विभागाच्या अधिकार्यांना सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत अधिक्षक कृषी अधिकारी जेजुरकर, बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, नरेगा विभागाचे गटविकास अधिकारी आणि अभियंता अक्षय गवते आणि आहाद शेख, अभियंता हजारे, पवार हेही उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या या भेटीमुळे रोजगार हमी योजनेतून होणार्या कामांचा दर्जा निश्चितच उंचावेल आणि बोगस कामे रोजगार हमी योजनेतून होणार नाहीत, असे संकेत मिळाले.