मुंबई (रिपोर्टर) बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कुणाचा?, यावर निर्णय घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी आज उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्यावी, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीरोजी संपुष्टात आला आहे.
आज यावर मातोश्री येथे परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, शिंदे गटावर पुन्हा जोरदार हल्ला चढवला.उद्धव ठाकरे म्हणाले, गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा हा विकृतपणा आहे. मी दुसर्या शिवसेनेला मानतच नाही. राज्यात शिवसेना एकच आहे. केवळ निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नसतो. शिवसेनेची एक घटना आहे. त्या घटनेवर पक्ष चालतो. केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर पक्षाचे भवितव्य ठरत असेल तर उद्या कुणीही पैशांच्या जोरावर लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकतो. थेट पक्षावर दावा ठोकू शकतो. यामुळे लोकशाहीचा बाजार होऊ शकतो. निवडणूक आयोगाने असा बाजार होण्यापासून लोकशाहीला वाचवणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने मागणी केली त्याप्रमाणे आम्ही लाखो सदस्यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. केवळ गद्दारांनी दावा केला म्हणून पक्ष गोठवू नये. किमान आता तरी घटनेनुसार पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यास निवडणूक आयोगाने मान्यता द्यावी.