Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- आत्मनिर्भर मसनवाटा

अग्रलेख- आत्मनिर्भर मसनवाटा

गणेश सावंत
मो. नं. ९४२२७४२८१०
कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या देशवासियांच्या चिता रोज जळत आहेत. मृतदेहाने गजबजलेले मसनवाटे पाहून देशवासियांचे मन सुन्न होत आहेत. देशभरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. मसनवाट्यात पेटलेल्या चितांच्या धुराने आजुबाजुच्या देशांना व्यापून टाकलं आहे. आपण गुदमरत असल्याची प्रतिक्रिया वेगवेगळे देश देत आहेत. युनिसेफने तर भारतापासून जगाला धोका असल्याचे म्हटले आहे. भारतासाठी या प्रतिक्रिया भयावह आहेत. आत्मनिर्भरतेचा डांगोरा पिटवत आम्ही कधी मसनवाट्यात चिता पेटण्यासाठी आत्मनिर्भर झालो हे आम्हालाही कळले नाही आणि जेंव्हा डोळ्यांदेखत रोज चार हजारापेक्षा जास्त चिता पेटल्या जावु लागल्या आणि प्रत्येक तासाला देशवासियाचा मृतदेह दिसू लागला तेव्हा मात्र आत्मनिर्भरतेचा बुरखा टराटरा फाटला गेला. गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात ४५ हजारापेक्षा जास्त मृत्यू एकट्या भारतात झाले. तर इकडे बीडसारख्या छोट्याशा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात १३९ मृत्यू झाले. दिल्ली ते गल्ली मृतदेहांच्या खचांचे आकडे पाहून आम्ही खरच आत्मनिर्भर आहोत का? हा सवाल प्रत्येक भारतीयांना पडत राहिला. गेल्या सहा-सात वर्षांच्या कालखंडात अच्छे दिनचे नारे आणि आत्मनिर्भरतेचा धादांत आत्मघातकी आत्मविश्‍वास अंगी बाळगून आम्ही नेमके साध्य ते काय केले. असे एक ना अनेक प्रश्‍न आता विचारले जात आहेत. केंद्र सरकार ज्या पद्धतीने कोरोनाला हाताळत आला आहे आणि हाताळतोय ती पद्धत देशवासियांचे जीव वाचवणारी आहे की, मढ्याच्या टाळुवरचे लोणी खावून डकार देणारी आहे. हे समजायला मार्ग नाही. कोरोनाने


मृत्युचे तांडव
माजवलेले असताना या तांडवाला रोखण्यासाठी जे प्रयत्न केंद्र सरकारकडून व्हायला हवे होते ते प्रयत्न सुरुवातीपासून झाले नाहीत. उलट ज्या थोड्याफार गोष्टी करण्यात येऊ लागल्या, किंवा केल्या गेल्या त्याचे श्रेय घेण्याचे काम मात्र केंद्र सरकारकडून झाले. ५६ इंचच्या छातीत आत्मनिर्भरतेचे बीज रोवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या १६ महिन्यांच्या कालखंडात कदी थाळ्या आणि टाळ्या वाजवायला समोर आले तर कधी दीप प्रज्वलीत करायला समोर आले. परंतु कोरोना बाधीत रुग्णाच्या घरातला दीप विझला जातोय हे पहायला ते आले नाहीत. ते दीप विझवू नये यासाठी उपाययोजना करायला आले नाहीत उलट राज्या-राज्यात भेदभाव करत सत्ताकारणाची गोळाबेरीज करून वैद्यकीय सेवा पुरवण्याचा जो राजकीय धंदा केंद्राने मांडला त्या धंद्याने अनेकांचे हकनाक बळी गेले. ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही, जे राज्य भाजपासाठी सकारात्मक नाहीत त्या राज्याच्या लोकांना इंजेक्शनपासून ऑक्सिजनपर्यंत कसे अडलेनडले जातील हे पहितले गेले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या चुका झाल्या त्या चुका दुसर्‍या लाटेत सरकारकडून अपेक्षित नव्हत्या. मात्र दुसर्‍या लाटेत तर मत्सर, इर्ष्या, दुराग्रह ठेवून मृत्युच्या तांडवाला राज्या राज्यात नाचायला भाग पाडले. उघड्या डोळ्याने अवघा देश नव्हे तर जग केंद्र सरकारच्या या राजकारणाकडे पाहत होतं. सरशेवटी सर्वोच्च न्यायालयाला गेल्या आठवडाभरापासून यात हस्तक्षेप करावा लागला. आठ दिवसांपासून केंद्र सरकारला न्यायालय रोज


चाबकाने बडवतय.
काल-परवा तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देशातली परिस्थिती सुधारा, नाही तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा टोकाचा इशारा दिला. त्यावरही केंद्र सरकार हालचाल करत नाही हे पाहितल्यानंतर न्यायालयाने देशातल्या वैद्यकीय सुविधांसाठी एक समिती नेमली आणि ही समिती देशात ऑक्सिजन, इंजेक्शनसह अन्य वैद्यकीय सेवा व्यवस्थित पुरवण्याबाबत देखरेख करणार आहे. इतिहासात प्रथमच न्यायाालयाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारला झापले असेल. व्यवस्था हाती घेतली असेल. केवळ केंद्र सरकारच्या अहम-अहंकारीपणामुळे देशातली वैद्यकीय व्यवस्था दुबळी होत असेल आणि वैद्यकीय व्यवस्थेत राजकारण केलं जात असेल तर अशा सत्ताधीशांना शाब्दीक चाबकाचे नव्हे तर साक्षात यमाच्या चाबकाचे रटटे पडाला हवे. ज्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट संभाव्य असल्याबाबत जाणकार सरकारला सांगत होते. त्यावेळी त्या जाणकारांचे म्हणणे ऐकून न घेता केंद्रातलं सरकार सत्ता केंद्राचे ध्येय-धोरण राबवत होते. दुसर्‍या लायेमध्ये उभा देश होरपळत असताना पाच राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या जात होत्या. कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने शंखनिनाद होत होता. सत्ताकारणाच्या राजकारणात देशातला सर्वसामान्य मात्र बळी जात होता. आजपर्यंत गेल्या सात वर्षांच्या कालखंडात भारतीय जनता पार्टीकडून गांधी-नेहरू यांच्याबाबत टीका-टिपणी केली जात होती. मात्र आजच्या या भयावह परिस्थितीत


गांधी-नेहरूंच्या
व्यवस्थेने देशाला तारले

हे सत्य दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भक्तांना स्वीकारावा लागेल. आज जी आरोग्य व्यवस्था आहे ती आरोग्य व्यवस्था या सात वर्षांच्या कालखंडात नरेंद्र मोदींनी उभारलेली नाही, भारतीय जनता पार्टीने उभारलेली नाही ही व्यवस्था गांधी, नेहरू, व्ही.पी.सिंग, मनमोहनसिंग नव्हे नव्हे तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात उभारलेली आहे. आम्ही गेल्या सात वर्षांच्या कालखंडात केवळ स्वप्न दाखवले. मंदिर-मस्जिदचे प्रश्‍न समोर आणले, ते सोडवले यापेक्षा लोकांच्या मुलभूत गरजांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमके काय केले? हा सवाल आम्ही नव्हे तर आता उभे जग ओरडून विचारत आहे. आज मितीला देशात चार लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. रोज चार हजारांपेक्षा जास्त देशवासीय मृत्युमुखी पडत आहेत. गांधी-नेहरूंच्या कार्यकाळात या व्यवस्था उभ्या नसत्याच तर काय झाले असते याचा विचार करून आजच्या परिस्थितीवर मात करणारी खरी व्यवस्था कोणाची हे लक्षातच घ्यायला हवे. कोरोनाच्या या महामारीत कोणाला कोसण्यापेक्षा, कोणावर आरोप करण्यापेक्षा सत्य समोर मांडत परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांचं बीज पेरणं आज नितांत गरजेचं आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तरी सत्ताकारणापासून दूर राहत लोकांच्या मुलभूत गरजा देण्यासाठी पेरते होतील का? आज जी देशाची परिस्थिती झाली आहे आणि अवघ्या जगातून भारताच्या व्यवस्थेबद्दल प्रतिक्रिया येत आहे ती आत्मनिर्भरतेला आणि जागतिक महासत्ताकतेचे स्वप्न दाखवणार्‍या भाजपाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. अशा भयावह

स्थितीमध्ये
मदतीचा ओघ

अवघ्या जगातून सुरू झाला आहे. नेपाळ, भुतानसारखे छोटे-छोटे राज्य भारताला मदत करत आहेत. बांगलादेश रेमडिसीवीर देत आहे. श्रीलंका छोटा-मोठा हातभार लावत आहे. आम्हीही ते स्वीकारत आहोत. जेव्हा हे देश मदत करतात तेव्हा खरचं आम्ही आत्मनिर्भर आहोत का? हा प्रश्‍न आता देशवासियांना पडत आहे. आजची परिस्थिती ही भविष्याचा वेध घेणारी आहे आणि भारतीयांसह सत्ताधीशांना शिकवण देणारी आहे. आज आम्ही हा विषय एवढ्यासाठीच छेडलाय, बीडसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये कोरोनाची जी परिस्थिती आहे ती बीड जिल्ह्यातले मसनवाटे पाहितल्यानंतर लक्षात येते. १ मे ते ८ मे या कार्यकाळामध्ये एकट्या बीड जिल्ह्यात १३९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. हा आकडा पाहितल्यानंतर आम्हीच आमचे मारेकरी आहोत की, आमच्या मृत्युला व्यवस्था कारणीभूत आहे याचा शोध आणि बोध घेण्याची वेळ आता आली आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. भारताचा इतिहास हा रक्तरंजीत आहे. तसा तो एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत’ म्हणणाराही आहे. अशा या भारतात कोरोनाच्या हाहाकारावर आणि मृत्युच्या तांडवावर सत्ताधीशांनी ज्या आत्मनिर्भरतेने अंकुश ठेवायला हवा होता तो केवळ सत्तालालसीपणाने आत्मनिर्भरतेचा मुडदा पाडणारा ठरला. आता वेळ काळाच्या हातात गेली असल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकारने हे आव्हान स्वीकारत लोकांचे जीव वाचवण्यास महत्व द्यावे.

Most Popular

error: Content is protected !!